नगर :
दैनिक देशदूतची नगर आवृत्ती बंद करण्याचा निर्णय अखेर देशदूत प्रशासनाने
घेतला आहे. आजचा अंक निघाला नाही. उत्पन्न व खर्चाचा मेळ जमत नसल्याने
आवृत्ती बंद करण्यात येत असल्याचे देशदूतचे सरव्यवस्थापक आर. के. सोनवणे
यांनी कालच सर्व कर्मचार्यांना सांगितले होते. देशदूतचे कर्मचारी दैनिक
सार्वमतमध्ये विलिन करण्यात आले असून, संपादक नंदकुमार सोनार यांच्या
अधिनस्त आता त्यांना काम करावे लागणार आहे. देशदूतचे व्यवस्थापक सुनील
ठाकूर यांची नाशिकला पीए टू एमडी या पदोन्नतीवरील पदावर बदली करण्यात आली
आहे.
शिवाजी शिर्के संपादक असताना त्यांनी काँग्रेसनेते भानुदास कोतकर
यांचे अशोक लांडे हत्याकांड बाहेर काढले होते. या कोतकरप्रकरणाने तत्कालिन
पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश प्रसाद जसे हिरो ठरले तसेच देशदूतही रातोरात
नगरमध्ये यशोशिखरावर गेला होता. शिर्के यांचे आक्रमक संपादकीयत्व व उत्तम
टीमवर्क यामुळे देशदूत जिल्ह्यातील तिसर्या क्रमांकाचे दैनिक झाले होते.
तथापि, कार्यालयातील पेशवाईचा शिर्के यांना फटका बसला. त्यामुळे शिर्के यांना बाजूला व्हावे लागले. त्यानंतर देशदूतची धुरा कार्यकारी संपादक
पुरुषोत्तम सांगळे यांच्याकडे आली. शिर्केचाच कित्ता गिरवत देशदूतचे
बाजारपेठेतील स्थान कायम ठेवण्यात सांगळे यशस्वी झाले. परंतु,
त्यांच्याहीविरुद्ध कार्यालयातील पेशवाई गटाने षडयंत्र रचून त्यांची रवानगी
नाशिकला करण्यात हा गट यशस्वी झाला. ही बदली स्वीकारण्यापेक्षा सांगळे हे
देशदूतच्या बाहेर पडले व पुन्हा अकोला देशोन्नतीला निवासी संपादकपदी रूजू
झाले. सांगळे यांच्यानंतर जाहिरात व्यवस्थापक रविंद्र देशपांडे व
वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी यांच्याकडे या आवृत्तीची धुरा आली. देशपांडे
यांना प्रभारी कार्यकारी संपादक नेमण्यात आले होते. परंतु, अंकाचे घसरते
सर्क्युलेशन, संपादकीयचा दर्जा व खालावणारा व्यवसाय रोखण्यात
देशपांडे-कुलकर्णी ही जोडगोळी अपयशी ठरली. इतरांबद्दल तक्रारी करणे सोपे
असते, प्रत्यक्षात ती जबाबदारी पेलणे किती अवघड असते, याचा अनुभव या
जोडगोळीला आयुष्यात पहिल्यांदाच आला. वाढती वित्तीय तूट, घसरलेले
सर्क्युलेशन व वाढता खर्च पाहाता, नगर आवृत्ती तातडीने बंद करण्याचे आदेश
व्यवस्थापकीय संचालक विक्रम सारडा यांनी दिले. नाशिकवरून त्यांचा हा निरोप
घेऊन काल सरव्यवस्थापक आर. के. सोनवणे हे नगरमध्ये दाखल झाले. प्रारंभी
व्यवस्थापक सुनील ठाकूर, सार्वमतचे संपादक नंदकुमार सोनार यांच्यासोबत
दीर्घ चर्चा केल्यानंतर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सर्व
कर्मचार्यांना आवृत्ती बंद करण्यात येत असल्याचा निरोप दिला. तसेच, सर्व
कर्मचारी सार्वमतमध्ये विलिन करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यामुळे
ऑपरेटर, संपादकीय कर्मचार्यांसह सर्व कर्मचार्यांची पायाखालची वाळू
सरकली. नगर जिल्ह्यात पूर्वीच सार्वमत हे स्वतंत्र दैनिक चांगले चालत
असताना, विक्रम सारडा यांनी देशदूत हे बॅनरदेखील जिल्ह्यात आणले होते.
जिल्ह्याच्या उत्तरेत सार्वमतचा सर्वाधिक खप आहे. तर दक्षिणेत हे दैनिक
चालत नव्हते. त्यामुळे देशदूत हे दैनिक दक्षिणेची बाजारपेठ काबिज
करण्यासाठी टाकण्यात आले होते. शिर्वेâ व सांगळे यांनी दक्षिणेवर चांगली
पकड निर्माण केली होती. परंतु, पेशवाईच्या गटबाजीने या दोघांनाही बाहेर
पडावे लागले. परिणामी, देशपांडे-कुलकर्णींच्या उपस्थितीत आवृत्ती बंद
करण्यात येत असल्याचा निरोप देशदूत प्रशासनाला आपल्या कर्मचार्यांना
द्यावा लागला. देशदूतचे बहुतांश संपादकीय कर्मचारी यापूर्वीच संपादक
नंदकुमार सोनार यांच्या डोक्यात बसलेले असून, महिना-दोन महिन्यात त्यांची
घरी रवानगी केली जाणार आहे. पत्रकारितेतील या पत्रकारांचे चारित्र्य
पाहाता, त्यांना कुठेही संधी मिळणे तसे अवघड आहे. यापूर्वी दैनिक एकमत,
दैनिक व्हिजनवार्ता ही दैनिके अशीच बंद पडली होती. त्यांच्या पंगतीत आता
देशदूत जावून बसले आहे.