सकाळने घेतला विरोधकांचा समाचार


सकाळच्या पुणे 'बस डे' आणि इतर उपक्रमाबाबत सोशल मीडियावर बदनामी सुरू होती.त्याची दखल बेरक्याने घेवून,सर्वप्रथम सकाळची बाजू मांडली.त्यानंतर सकाळनेही त्याचा समाचार घेतला असून,आजचा संपादकीयच त्यावर आहे. काय आहे, हा संपादकीय लेख तो वाचा...
............................................................................................................
हा भविष्यवेध समाजाच्या भल्यासाठी
धन्यवाद, आमच्या सगळ्या वाचकांना, सकाळच्या प्रत्येक उपक्रमात आपलं घरचं काम असल्यासारखं सक्रिय होणाऱ्या प्रत्येकाला, समाजबदलाच्या संघर्षात आपलं योगदान द्यायला पुढं आलेल्या सगळ्यांना! महाविद्यालयीन तरुणांच्या कल्पनांना वाव देणारा ‘हम मिलकर भारत बदलेंगे’ हा उपक्रम आज जाहीर होतो आहे. त्यालाही असाच प्रतिसाद मिळेल, याची खात्री आहेच.
‘सकाळ’च्या या समाजाभिमुख उपक्रमांच्या वाटचालीत चांगल्याला चांगलं म्हणून साथ देणारे भेटतात, तसं मूठभरच का असेनात नाकं मुरडणारे, खुसपटंं काढणारेही असतात. सगळी वृत्तपत्रं बातम्याच देतात. ‘सकाळ’ त्याशिवाय समाजबदलाचे उपक्रम सगळ्या शक्तीनिशी का राबवतो, हा शंकासुरांचा नेहमीचा प्रश्‍न आणि जोडही असते, आम्हाला बातम्या द्या हो... कधीतरी सांगायलाच हवं, ‘सकाळ’ हे सगळं का करतो. आमची भूमिका स्पष्ट आहे, काळ बदलतो तसं माध्यमं आणि त्यांचं कामही बदलायला हवं. काल काय घडलं हे समजायला हवंच; पण उद्या काय होईल आणि उद्या कसा हवा, यात माध्यमांनी सक्रिय राहायलाच हवं. आणि आमचे उपक्रम भरात असतानाही सर्वंकष बातम्यांचं भान कधीच सुटलं नाही.
पाणी असेल नाहीतर पुण्यातला बसेसचा मुद्दा; आम्ही लोकांना घेऊन रस्त्यावर उतरतो... कशासाठी? आमच्या मते हे माध्यमांचंही काम आहे. हाच आमचा वारसाही आहे. ‘सकाळ’ आला तोच वृत्तपत्रसृष्टीत नव्या युगाची द्वाही फिरवत. वेगळं, समाजाच्या भल्याचं जेव्हा जेव्हा आम्ही काही करतो तेव्हा स्थितिशील शंकेखोरांची टीका होते, हेही ‘सकाळ’च्या जन्मापासून घडत आहे.
‘सकाळ’ नाव लोकांना विचारून निवडलं त्यावर टीका झाली. पेपरचं नाव ठरवू न शकणारे पेपर काय चालवणार, असं म्हणणारे काळाच्या ओघात फेकले गेले. ‘सकाळ’ची घोडदौड सुरूच आहे. ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक नानासाहेब परुळेकरांनी कधीच असल्या प्रवृत्तीची फिकीर केली नाही. ‘सकाळ’च होता पहिल्यांदा बाजारभाव प्रसिद्ध करणारा, ‘सकाळ’नेच सुरू केली गावोगावी बातमीदार नेमून गावच्याही बित्तंबातम्या देण्याची प्रथा, मध्यपूर्व आणि युरोपातील राजकीय स्थितीवर प्रत्यक्ष फिरून सरकारला अभ्यासपूर्ण अहवाल देणारे नानासाहेब होते, साऱ्या जगातल्या घडामोडींची माहिती भाषेचा बडेजाव न मिरवता देणारा ‘सकाळ’च तर होता.असले कितीतरी पायंडे ‘सकाळ’नं पाडले, यासाठी ‘सकाळ’वर टीका करणारे, खिल्ली उडवणारे नंतर याच वाटेनं गेले.
थोडं इतिहासात डोकवायचं कारण एवढंच, की उद्याच्या समाजाला काय हवं, हे समजण्याची कुवत आणि त्यासाठी रूढ मार्ग सोडून पावलं टाकण्याचं धाडस सकाळ समूहाच्या डीएनएचाच भाग आहे, हे एकदा समजलं, की ‘सकाळ’ पुण्यात ‘बस डे’ का साजरा करतो, राज्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा म्हणून आटापिटा कशासाठी आणि महिलांना एकत्र करणारं तनिष्का व्यासपीठ किंवा आता महाविद्यालयीन तरुणाईच्या खळाळत्या ऊर्जेला वाव देणारं ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ कशासाठी उभं करतो, याची उत्तरं समजतात. आता ‘सकाळ’ला पाठिंबा मिळतो तो आमच्या कमावलेल्या, जोपासलेल्या विश्‍वासार्हतेमुळे, त्यामुळेही पोटदुखी झालेले कमी नाहीत. विश्‍वासार्हता अचानक मिळत नाही. विकत घेता येत नाही आणि टीका करून, बदनामीच्या मोहिमा चालवून संपवताही येत नाही.
‘सकाळ’ला मिळणाऱ्या प्रतिसादानं पित्तप्रकोप झालेले काही ही भडास सोशल मीडियाच्या सार्वजनिक घाटावर काढू लागले आहेत. या बिननावाच्या उठवळांची दखल घ्यायचं कारण नाही; पण यानिमित्तानं आमचा वारसा पुन्हा सांगायलाच हवा. ‘सकाळ’ला काय पडलं आहे समाजाच्या प्रश्‍नांचं, असं वाटणाऱ्यांच्या आठवणीसाठी... पुणं बदलायचं तर चांगले लोकप्रतिनिधी निवडून यायला हवेत म्हणून नागरी संघटनेच्या माध्यमातून नगरपालिकेसाठी उमेदवार ‘सकाळ’च्या पुढाकारानंच परुळेकरांनी दिले. त्यांच्यासाठी रकाने खर्ची घातले.
टीका तर तेव्हाही झाली. त्याला त्यांनी भीक घातली नाही. आजही रिकामटेकड्या आक्षेपांना, त्यांच्याआडनं पोळी भाजू पाहणाऱ्या; हात काळे झालेल्या स्पर्धकांना भीक घालायचे कारण नाही. मुद्दा हेतूच्या शुद्धतेचा तेव्हाही होता; आताही आहे. आमच्यासाठी तोच शास्त्रकाटा आहे. पारदर्शकता हा ‘सकाळ’च्या सगळ्या सामाजिक उपक्रमांतला ठळक धागा आहे. ‘सकाळ’च्या लोकप्रियतेनं पोटदुखी झालेल्या संशयात्म्यांसाठी काही उदाहरणं... पुण्यात ‘बस डे’ साजरा झाला त्या वेळी पुणेकरांनी दिलेल्या आर्थिक मदतीचा आणि झालेल्या खर्चाचा ताळेबंद प्रसिद्ध करणारा ‘सकाळ’च होता. आजवर कोणी असा उपक्रम घेऊन त्याचा आढावा दर महिन्याला दिला आहे? आम्ही ते उत्तरदायित्व मानले आणि ते निभावतो आहोत.
सकाळ रिलीफ फंड ५० वर्षे आपत्तीत अडकलेल्यांच्या मदतीला धावतो आहे, तसाच तो पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर कडा कोसळला तेव्हाही सक्रिय झाला. त्यात जमलेल्या देणग्यांतून त्या परिसरात लोकोपयोगी कामच होईल, यात ना देणगीदारांच्या मनात शंका आहे ना वाचकांच्या. तनिष्काच्या चळवळीत हजारो महिला स्वखुशीनं सहभागी झाल्या. आता या नेटवर्कचं कुतूहल राज्य आणि देशांच्या सीमा ओलांडून बाहेर पसरत आहे. ज्या जलदिंडीच्या अपूर्व यशानंतर रिकामटेकड्यांची कुजबूज मोहीम सुरू झाली त्यावर सांगायलाच हवं... राज्यातील घराघरांत जलसंपन्न महाराष्ट्राचा सांगावा या मोहिमेनं नेला. त्यानंच टाळकं सटकलेले त्यात जमा झालेल्या देणग्यांवर कुजबुजू लागले. होय, यात देणग्या घेतल्या. त्यातून पाणीप्रश्‍नावरच होणाऱ्या कामांचा तपशील नक्की जाहीर करू आणि देणग्या मागण्याआधी ‘सकाळ’नं २० कोटी रुपये याच प्रश्‍नासाठी दिलेत, याचं अप्रूप लोकांना आहे.
वृत्तपत्र हे आपल्याला ज्या प्रकारचा समाज भविष्यात हवा त्या दिशेनं वाटचाल करण्याचं साधन आहे, असं आम्ही मानतो. हा भविष्यवेध, उपक्रम आणि चळवळी चालवण्याची प्रेरणा समाजाच्या भल्याची आहे. यात साथ देत आलात त्याबद्दल धन्यवाद! प्रत्येक चांगल्या बाबींत संशय घेणारे सर्व काळांत असतात. असल्या खुसपटबहाद्दरांनी ना ज्ञानेश्‍वर माउलींना छळायचं सोडलं ना संतश्रेष्ठ तुकोबारायांना. रामायणात अग्निपरीक्षा द्यायला लावणाऱ्या प्रवृत्ती असल्याच होत्या. या संशयजंतूंमुळे ना ‘सकाळ’चं काम थांबलं ना प्रतिसाद कमी झाला.
खात्री बाळगा, समाजाच्या भल्याचं घेतलं व्रत टाकणार नाही, स्तुतीनं हुरळून जाणार नाही आणि शंकासुरांच्या करंटेपणानं नाउमेदही होणार नाही. ‘जर्नालिझम टू पॉझिटिव्ह ॲक्‍टिव्हिजम’ हे आम्हीच मांडलेलं सूत्र लोकांच्या साथीनं जगण्याचा प्रयत्न आहे. नव्या जमान्याची नवी क्षितिजं धुंडाळण्याच्या या प्रवासात सर्वांचं स्वागतच आहे!
esakal