प्रहारमधील ज्यनिअर्सची संभ्रमावस्था आणि घुसमट..!

मोतेवार सुरु करीत असलेल्या मी मराठी दैनिकात प्रहारमध्ये कर्मचार्‍यांना छळणार्‍या जोडगोळीतील एक जण थेट सहायक संपादक पदावर रुजू झाल्याने मुंबईतील अनेक फ्रेशर्स तसेच ज्युनिअर सबएडिटर संभ्रमात सापडले आहेत.
प्रहारमध्ये जो जाच सहन करावा लागत होता, तीच वेळ पुन्हा येईल ही चिंता त्यांची पाठ सोडायला तयार नाही. प्रहारची अधिकाधिक टीम फोडून भावेंना अडचणीत आणन्याचा प्रयत्न मी मराठीत नव्याने जॉईन झालेले मंडळी करीत आहेत, पंरतू त्याला काही फारसे यश मिळताना दिसत नाही. राणेंसारखे खंबीर व्यवस्थापन प्रहारला लाभले असतानाही तेथील सिनिअर्सनी आपल्या हातखालच्या कर्मचार्‍यांचा वेळोवेळी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
भावेंनी प्रहारच्या संपादकपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर ही जोडगोळी कार्यालयात नाही, हे पाहून अनेकांनी भावेंच्या केबीनमध्ये जावून तिथली परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला, परंतू जोडगोळीच्या कानावर ही बाब जाताच त्यांनी धडाधड प्रत्येकाच्या मोबाईलवर एसएमएस धाडून चिडीचिप राहण्याचे बजावले. बहुतांश दैनिकांमध्ये हल्ली हेच सुरु असल्याने मिडीयात नव्याने पाऊल ठेवणार्‍या अनेक पोरांच्या वाट्याला हे भोग येतात. (पुढारीचे पद्मश्री याबाबतीत अपवाद म्हणावे लागतील, त्यांचा आपल्या कंपनीतील बहुतांश कर्मचार्‍यांशी थेट संपर्क असतो.) अनेकदा व्यवस्थापन वरीष्ठ पातळीवर लक्ष घालते, तेच राणे करीत होते परंतू त्यामुळे खालच्या पातळीवर काय गोंधळ सुरु आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. भावे असोत, संजय राऊत असोत की, कुमार केतकर या मोठ्या नावांचे आकर्षण असल्याने अनेक जण ते जिथे काम करतात त्या दैनिकांचे दरवाजे ठोठावतात. त्यांना काम करण्याची संधी देखील मिळते परंतू जेंव्हा चमकदार कामगीरी करण्याची वेळ येते, तेंव्हा मात्र मधले सिनिअर्स वरिष्ठांपर्यंत पोहचू देत नाहीत. त्यामुळे अनेक गुणवान पोरांचे नुकसान झाले आहे. ही दरी कमी करण्याचे आव्हान मोतेवार यांच्यासमोर राहणार आहे. कारण फक्त मोठ्या मंडळींना खेचून आणून दैनिके चालत नाहीत, तर आपल्या संस्थेतील प्रत्येक कर्मचार्‍यांशी उत्तम समन्वय साधणे हे एचआर चे साधे सुत्र कितपत अवलंबवतात त्यावर या दैनिकाचे भवितव्य अवलंबून असेल.