निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय :राज्यपाल राव

नागपूर : राज्यात अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि मारपकवार परिवारातर्फे दिल्या जाणार्‍या दलित मित्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचा वितरण समारंभ शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे सहायक संपादक गजानन जानभोर यांना राज्यपालांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी वरिष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे आणि नितीन तोटेवार यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांना जीवनगौरव पुरस्काराने यावेळी गौरवान्वित करण्यात आले.
यावेळी मंचावर प्रफुल्ल मारपकवार, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्मशंकर त्रिपाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मारपकवार यांनी केले. संचालन जोसेफ राव यांनी तर चैतन्य मारपकवार यांनी आभार मानले.

पुरस्काराची रक्कम प्लॅटफॉर्म शाळेला
■ गजानन जानभोर यांनी पुरस्कार स्वरूपात मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कम नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेला देणगी स्वरूपात दिली. घरून पळून गेलेल्या, वाममार्गाला लागलेल्या रेल्वे स्थानकावरील अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम ही शाळा करीत असते.