जळगाव - येथील 'खानदेश सेन्ट्रल मॉल'मध्ये असलेल्या 'बिग बझार' शोरूममध्ये
काल, 29/12/2014 रोजी पुन्हा गरीब बिचाऱ्या पत्रकारांना मॉल प्रशासनाकडून
'विशेष वागणूक'दिली गेली नाही. त्यामुळे या नि:पक्ष व निर्भय पत्रकारांनी
फसवणूक, लुबाडणूक झाल्याची तक्रार केली तर बिघडले कुठे? त्यांनी थोडासा
आवाज चढविला आणि 'आता आम्ही तुम्हाला बघून घेवू,' असा सौम्य
इशारा दिला तर बिघडले कुठे? काल हे 'दिव्य' घडले ते एका एजन्सीच्या
आकडेवारीच्या आधारे शहरात सर्वाधिक खप असल्याचा दावा करणाऱ्या
वर्तमानपत्राच्या क्राईम रिपोर्टरबाबतच! आता क्राईम रिपोर्टरच तो त्याने
घेतला फोटोग्राफरला बोलावून! या मंडळींनी जी वस्त्रे घरच्यासाठी नेली होती
त्यात म्हणे काहीतरी एक्स्चेंज करताना बिलाच्या तफावतीचा लफडा झाला! 'बिग
बझार'वाल्यांनी एव्हढ्या मोठ्या इन्व्हेन्टरी स्टोकमधील गडबड मान्य करून
मैन्युअल बिलिंग सुधारणा करून देत आघाडीच्या वर्तमानपत्राच्या जोडीचा
व्यवस्थित'पाहुणचार' केला; तरीही हे बिचारे नाखूषच!! खरे आहे,
अशा'मॉल'वाल्यांना धडाच शिकवायला हवा!
आमची तर मागणी आहे की पत्रकार एखाद्या मॉलमध्ये खरेदी करायला जात असतील तर
त्यांना पोलीस सरंक्षण पुरवायला हवे; न जाणो कुणी हल्ला केला तर.
पत्रकारांना विशेषाधिकार द्यायला हवेत. पत्रकारांसाठी ओरिजिनल प्राईस शॉपीज
उघडायला हव्यात. त्यांना कोणताही नफा न कमविता खरेदी किमतीत व्यापाऱ्याने
माल विकायला हवा. देशासाठी इतक्या झटणाऱ्या आणि जीवाचे रान करणाऱ्या
पत्रकाराप्रती समाजाने संवेदनशीलता दाखवायला हवी. पत्रकारांनी एक्स्चेंज
मागितल्यास कोणत्याही दुकानदाराने त्याला ते एक्स्चेंज द्यावे व वर मूळ
किंमत पूर्ण रिफंड करावी. पत्रकारांना न आवडलेल्या वस्तूबाबत समाजाने
एव्हढा त्याग करायला हरकत आहे?