प्रति,
श्री. गिरीश कुबेरजी
स.न.
१६ डिसेंबरच्या ‘लोकसत्ता’ मध्ये आपण लिहलेले ‘बळीराजाची बोगस बोंब’ हे संपादकीय वाचले. संपादक गिरीष कुबेर यांच्या स्टंटबाजीचा हा भाग आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. अनेकदा अकारण वाद निर्माण करून, स्वत;कडे लक्ष वेधून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. आताचा हा अग्रलेख याच रणनीतीचा भाग असावा. अन्यथा अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून स्वत:ची ओळख सांगणा-या आपल्यासारख्या संपादकाने एवढे बिनबुडाचे व पोरकटपणाचे लेखन करावे हे पटत नाही. हा अग्रलेखच असा आहे की, शेतक-यांच्या प्रश्नाशी संबंधित प्रत्येकाला याची दखल घ्यावीच लागते. या अर्थाने गिरीष कुबेरजी आपण ‘व्हिलन’ च्या रुपात का होईना, सर्व मिडीयात, विधीमंडळात गाजत आहात. एका दृष्टीने आपला चमकण्याचा हेतू सफल झालेला दिसतो.
मुळात कोणत्याही वृत्तपत्राला व त्याच्या संपादक, मालकाला शेतक-यांबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. कारण शेतकरी हा त्यांचा ग्राहकच नाही. वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारे कोणी शेतकरी असतील तर, ते नक्कीच बडे शेतकरी असले पाहिजेत. जाहीरातीचा व्यवसाय शेतक-यांकडून मिळण्याची अजिबात शक्यता नाही. बहुतेक वृत्तपत्र मध्यवमर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, नोकरदार हेच विकत घेऊन वाचतात. त्यामुळे वृत्तपत्र याच वर्गाच्या मानसिकतेचं प्रतिनिधीत्त्व करतात. ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखात याच मानसिकतेचं जागो-जागी प्रतिबिंब दिसतं. संपादकीयाची सुरुवात करतानाच आपण नोंदवतात, ‘शेतकरी म्हटला की, तो गरीब बिचारा असायलाच हवा आणि तो नाडला जाणारच वा गेलेला असणारच असे मानण्याची प्रथा आपल्याकडे चांगलीच रूढ झाली आहे.’ हे विधान वेड पांघरून पेडगावला जाणारे आहे. कारण जे जळजळीत वास्तव आहे त्याला आपण प्रथा म्हणून दुर्लक्षू इच्छिता. मराठवाड्यातील कुठलंही एक गाव आपण निवडावं आणि शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांची नेमकी काय परिस्थिती आहे ते डोळ्यांनी पाहावं म्हणजे आपल्याला नक्कीच स्वत;च्या विधानाची कीव करावी वाटेल. पुढे आपण नोंदवता, ‘शेतकरी प्रत्यक्षात लुटला गेलेला असो वा नसो. शेतकरी लुटण्यासाठीच असतात आणि आपण प्रत्येकजण त्या लुटीस हातभार लावण्याचेच काम करीत असतो, हा समज असतो.’ हा समज नाही तर हे वास्तव आहे. शेतीसाठीच्या बियाणे, खतापासून जी शेतक-यांची लूट होते, ती बाजारात माल आणेपर्यंत. आपला माल उत्पादीत करणारा प्रत्येक उत्पादक त्याच्या मालाची किंमत स्वत: ठरवत असतो. खर्चामध्ये नफा मिसळूनच ही किंमत ठरते. मात्र शेतीमालाच्या बाबतीत शेतक-यांच्या हातात काहीच नाही. कधीतरी चांगले पैसे मिळण्याची परिस्थिती तयार होते तेव्हा सरकार त्या शेतीमालाची आयात करुन भाव पाडते. हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. कांदा भावाबद्दल ओरड करणारे सगळे मध्यम-उच्चवर्गीय शेतक-यांचे शत्रूच आहेत आणि शेतक-यांच्या लुटीत ते सर्वजण अप्रत्यक्षपणे सहभागी होतात हे वास्तव आहे. अनेक दशकांपासून चालू असलेली शेतक-यांची ही लुटमार अर्थतज्ज्ञ असणा-या आपल्यासारख्या विद्वानाला दिसत नाही असे थोडेच आहे? मात्र आपण जाणीवपूर्वक वेडेपणाचे हे सोंग घेतले आहे.
शेती हा किती जोखमीचा धंदा आहे, याचे सामान्यज्ञान आपल्यासारख्या अभ्यासू संपादकाला असू नये याचे आश्चर्य वाटते ! केवळ कोरडवाहू शेतीचा विचार केला तर, बियाणे, खते व कीटकनाशके यापासून फसवणूक सुरू होते. पेरणीसाठी आवश्यक असणा-या या वस्तु कधी चढ्या भावाने मिळतात तर कधी त्या बोगस मिळतात. बोगस बियाणे उगवत नाही तेव्हा वृत्तपत्रात बातम्या येतात पण प्रत्यक्षात किती जणांना नुकसानभरपाई मिळते? किती व्यापा-यांवर कारवाई होते? याचे उत्तर ‘नाही’ असेच मिळते. बियाणे न उगवल्याची किती मोठी किंमत त्या शेतक-याला मोजावी लागते, हे आपल्याला कसे कळणार? बियाणे पेरले तर त्याला वेळेवर व पुरेसा पाऊस पडावा लागतो. पाऊस पुरेसा झाला नाही तर, चिमण्या, कावळे, मोरं हे बियाणे उकरून खातात. गेल्या खरीप पेरणी हंगामात अचानकपणे गोगलगार्इंची प्रचंड प्रमाणात पैदास झाली. त्यांनी हजारो हेक्टरवरील बियाणे खाऊन फस्त केली. शेतक-यांना आधी या गोगलगाई मारण्याची मोहीम हाती घ्यावी लागली व दुस-यांदा पेरणी करावी लागली. याला काही सरकारने मदत केली नाही. जिथे एकदाच दर्जेदार बियाणे मिळण्याची खात्री नाही तिथे दुस-यांदा पेरणी करण्यासाठी बियाणे मिळवताना शेतक-यांचे काय हाल झाले असतील? याची कल्पना आपल्यासारख्या बाबुला कशी येणार? उगवण नीट झाली म्हणजे पीक हातात आले असे नाही. पीकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर रोगराईचे आक्रमण असते. त्याला नियंत्रणात आणण्या-साठी फवारणी करावी लागते. शिवाय प्रत्येक टप्प्यावर पाऊस पडावा लागतोच. बहुतेकदा वेळ चुकवून पाऊस पडतो. त्यामुळे उत्पादनात घट होते. कधी सोयाबिन काढणीच्या वेळी अतिवृष्टी होते, त्यामुळे मोठा फटका बसतो तर एखादा अवकाळी पाऊस पांढ-या शुभ्र ज्वारीचे रुपांतर काळ्या ज्वारीत करतो. अवर्षण, अनियमितता, अतिवृष्टी, वादळ, गारपीट ही संकटं नेहमी अचानकपणे उद्भवतात. एका तासात होत्याचे नव्हते होते. शेतीत ही जोखीम क्षणाक्षणाला आहे. याशिवाय उंदीर, मोरं, वानरं, रान-डुक्कर असे अनेक पशु-पक्षी हे आपापल्या परीने शेतीचे नुकसान करीत असतात. शेतकरी म्हणून हे त्याला आनंदाने सहन करावेच लागते.
‘होत्याचं नव्हतं होणं’ म्हणजे काय?हे आपल्याला कळण्याचं कारण नाही. दु:ख, दैन्य, दारिद्र्यता, पराधिनता, विवशता व लाचारीचा अनुभव हा फक्त शेतक-यांच्याच वाट्याला येतो. अंगावर दागदागिने घालून मिरवणारे शेतकरी आपण कुठे पाहिले आहेत, हे मला माहित नाही. पण दैन्यावस्थेत जगणारे, आजही मिरचीबरोबर भाकरी खाणारे, पायात प्लॅस्टिकचा बुट घातलेले किंवा नागड्या पायाचे, कळकट कपडे घातलेले व कसे-बसे आयुष्य ओढत चाललेले शेकडो शेतकरी मी आपल्याला गावोगाव दाखवू शकतो. त्यांच्या आयुष्यात जगणं हीच फक्त चैन आहे. ज्या बागायतदार शेतक-यांवर आपण तोंडसुख घेतले आहे, ते शेतकरी दरवर्षी किती मोठी जोखीम घेऊन शेती करतात, याची आपल्याला कल्पना नाही. पाच-पंचवीस लाखाची बाग उद्धवस्त होणा-या शेतक-याला हेक्टरी पंचवीस हजाराची मदत मिळते, हे वास्तव आपल्याला माहित नाही, असे थोडेच आहे. तरीही आपण धनदांडगे म्हणून त्यांना अवमानित करताय, ही नेमकी कुठली पत्रकारिता आहे? कुठल्या तरी मूठभर राजकारणी बागायतदारांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन आपण हे बोलत असाल तर स्वत:चीच फसवणूक करुन घेत आहात. तीन-चार वर्षे जीवापाड जपलेल्या बागेला गारपिठीचा फटका बसतो, लाखोचं नुकसान होतं, बाग नष्ट होते तेव्हा कुबेरसाहेब, त्या शेतक-याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो. कॅमेरा दिसला म्हणून नाटक करायला शेतकरी काही सिनेकलाकार नाहीत !
कुबेरसाहेब आपण अर्थतज्ज्ञ आहात. इतर व्यावसायिकाइतकेच शेती व्यवसायातही धोके आहेत असे म्हणता. असे मोघम विधान करु नका. शेतीइतकी जीवघेणी जोखीम असणारे कोणकोणते व्यवसाय आहेत त्याची यादी द्या. कोणता व्यवसाय अवर्षणाने, अतिवृष्टीने, वादळाने, गारपिटीने, रोगराईने संपूष्टात येतो ते सांगा? शेतक-यां-एवढी फसवणूक कोणत्या व्यावसायिकांची होते ते सांगा? शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल आपण वारंवार गळा काढताय, स्वत: अर्थतज्ज्ञ आहात. आकडेवारीने सांगा की, आतापर्यंत शेतक-यांना किती वेळा आणि किती रकमेची कर्जमाफी दिली व उद्योजकांना किती कर्जमाफी दिली. तेही सांगा. उद्योजकांची कर्जमाफी आणि शेतक-यांची कर्जमाफी याची तुलनात्मक आकडेवारी द्या पण आपण हे करणार नाही. कारण इथे तुमचे ढोंग उघडे पडते. शेतक-यांना फक्त एक-दोन वेळा कर्जमाफी दिली आहे ती ही ठराविक दहा-पंधरा हजाराच्या रकमेपर्यंतची. दुष्काळसदृश्य परिस्थिती म्हणून सरकारने कर्जावरील व्याजमाफी दिली आहे.त्यामुळेही आपल्या पोटात दुखते आहे. परंतु ५० हजारांपर्यंतचे शेतीसाठीचे कर्ज व्याजमूक्त असेल अशी घोषणा यापूर्वीच्या सरकारनेच केली होती. तेव्हा शेतक-यांच्या नेमक्या कोणत्या कर्जाला व्याजमाफी मिळणार? वीजबीलाच्या माफीचेही असेच गौडबंगाल आहे. मुळातच शेतीसाठीची वीज पाच-सहा तास मिळते. प्रत्यक्षात वीजबिल आकारणी मात्र चोवीस तासाची होते. दुष्काळामुळे आधीच पाणीटंचाई त्यात वीजमोटारीचा वापर तो किती होणार? वीजेचे बील तरी किती असणार? पण आपल्याला मात्र ही वीजबीलमाफी म्हणजे शेतक-यांसाठी असलेली मेजवानी वाटत असावी.
शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा आपण अतिशय कोडगेपणाने मांडला आहे. आपण केलेली तुलना चुकीची व गैरलागू आहे. शेतकरी आत्महत्येची धमकी देत नाहीत तर तो आत्महत्या करतोय. गेल्या ८-१० वर्षात देशभरातील लाखो शेतक-यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाच्या कारणावरून आत्महत्या केल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल होऊनही या आत्महत्या सुरूच आहेत. पुरोगामी महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे, इतर व्यवसायातही शेती-इतकेच धोके असतील तर इतर कोणत्याही उद्योग व्यवसायात अपवादानेही आत्महत्या का होत नाहीत? आपल्या दृष्टिप्रमाणे, शेती हा श्रीमंतीचा व चैनीचा व्यवसाय असेल तर करोडो शेतकरी शेतीतून का बाहेर पडत आहेत? दिवसेंदिवस शेती का ओस पडत आहे? शेतीसाठी मनुष्यबळ का उपलब्ध होत नाही? शेतक-याच्या घरातला मुलगा शेती करायला का तयार नाही? याची उत्तरं आपण कधी शोधली आहेत का? ती शोधली असती तर ख-या अर्थानं आपण शेतीप्रश्नाची चिकीत्सा करू शकला असता. परंतु.....
लेखाचा समारोप करताना आपण वापरलेली भाषा आपल्या शेतक-यां-विषयीच्या विकृत मनोवृत्तीची द्योतक म्हणावी लागेल. ‘कथित बळीराजाचे खरे अश्रू कोणते अन् बनावट कोणते हे शोधण्याचा प्रामाणिकपणा सरकारने दाखवावा आणि नुकसान भरपाया आणि कर्जमाफ्या जाहीर करीत हिंडायची प्रथा बंद करावी. स्वतःच्या मुर्खपणामुळे कोणत्या तरी जत्रेत चेंगराचेंगरी होऊन कोणी गेले दे आर्थिक मदत. वादळात, गारपिटीत पीक पडले रे दे आर्थिक मदत, ही प्रथा भिकेला लावणारी आहे. ज्यांना ती पाळायची आहे त्यांनी स्वतःच्या खिशातून मदत देऊन पाळावी या कथित बळीराजाची बोंब देखील बोगस असू शकते हे मान्य करण्याचे धैर्य सरकारने दाखवावे आणि जनतेचा पैसा वाया घालवणे थांबवावे.’ ही आपली भाषा अत्यंत उद्दामपणाची व अहंकारी आहे. शेतक-यांना पुन्हा पुन्हा कथित बळीराजा म्हणून हिनवण्याचे धाडस आपल्यासारखा शेतकरी-द्वेष्टाच करू शकतो. शेतकरी हा काही स्वतःला बळीराजा म्हणवून घेत नाही. राजा म्हणवून घेण्याची त्याची ऐपतही नाही. त्याच्याच जीवावर जगणारी सगळी बांडगूळं मात्र राजासारखी जगतात. आपणही एक बांडगूळच आहात. शेतकरी एका दाण्यापासून हजार दाण्याची निर्मिती करतो. काळ्या मातीतून नवं उत्पादन काढतो. यासाठी तो अहोरात्र कष्ट घेतो. पैसा निर्मिती तर शेतकरीच करतो. शेतक-यांनी शेती सोडली तर आपली ही सगळी बांडगूळी व्यवस्था संपायला फारसा वेळ लागणार नाही.
वादळ,गारपीट, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस शेतक-यांच्या मुर्खपणामुळे येत नाही. या आपत्तीशी शेतक-याचा काहीही संबंध नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीत शेतक-यांना मदत करणे हे लोकशाहीतील प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. भारतातच नाही तर जगभरात अशा आपत्तीत शेतक-यांना ते-ते सरकार मदते. याची आपल्याला माहिती नसावी हे ही एक आश्चर्यच. अशा आपत्तीत शेतक-यांना मदत करू नये असे म्हणणे म्हणजे सरळसरळ शेतक-यांना शेती व्यवसाय सोडा म्हणून सांगण्यासारखे आहे. हे परवडणारे आहे काय? याचा सरकारने जरूर विचार करावा. खरे शेतकरी कोणते? खोटे कोणते? कथित बळीराजा कोणता? याचा शोध कुबेरसाहेब आपल्यासारख्या ख्यातनाम पत्रकारांनी नक्कीच घ्यायला हवा. मात्र आपल्या लेखणीची खाज जिरवून घेण्यासाठी मिळून मिळून आपल्याला बिचारा शेतकरीच मिळावा हे आपले दुर्दैवच ! अस्मानी आणि सुलतानी संकटाने जो आधीच मरून पडलाय त्याचं आणखी काय उघडून बघणार? आपल्यासारख्या वृत्तींच्या लोकांमुळे जर शेती व्यवसाय संपलाच तर आपल्याला लोकसत्तेची पानं खाऊनच जगावं लागेल ! आपण पत्रकार आहात. लोकसत्तेसारख्या वृत्तपत्राचे संपादक आहात त्यामुळे महान आहातच ! प्रत्येक विषयाप्रमाणे शेतकरी व शेतीची चिकीत्सा करण्याचा आपल्याला अधिकार आहेच. तशी ती व्हायलाही हवी. मात्र आपला हेतू चिकीत्सा करण्याचा नाही तर शेतक-यांची टिंगल-टवाळी करण्याचा, त्यांना अप्रामाणिक, खोटारडे ठरवण्याचा, सरकारकडून अनुदान लाटून मजा करणारे, खोट्या दुःखाचं भांडवल करणारे आहेत असे दाखवण्याचा आहे. त्यामुळेच आपण शेत-क-यांबद्दल अत्यंत सवंग, बालिश विधाने केली आहेत. निरुपाय म्हणून, नैराश्यग्रस्त बनून आत्महत्या करणा-या शेतक-यांची खिल्ली उडवली आहे. प्रत्येक सजीवाला आपला जीव सर्वात प्रिय असतो. माणसांना तर जीवापेक्षा दुसरे काहीच प्रिय नसते. असे असताना लाखो शेतकरी सरकारी मदत लाटण्यासाठी आत्महत्या करताहेत असे आपल्याला वाटणे हेच आपल्या विकृत बुद्धीचे लक्षण आहे. आत्महत्या करणा-या शेतक-याच्या जागी आपण स्वतःला कल्पिला असतात तर असा आगाऊपणा करण्याचे धाडस आपल्याला झाले नसते. वृत्तपत्र मोठे असते म्हणजे त्याचा संपादक मोठा असतोच असे नाही. उलट अनेक कद्रुही अशा पदावर जात असतात हेच आपण या लेखनाने दाखवून दिले आहे. शेतक-यांबाबतची एवढी असंवेदनशीलता माझ्या पाहण्यात यापूर्वी आलेली नाही.
एक शेतकरी म्हणून मी आपल्या या लेखनाचा जाहीर निषेध करतो ! आपण शेतकरीद्वेष्टे आहात याची खात्री पटली असल्यामुळे आपण संपादक असेपर्यंत मी ‘लोकसत्ता’ हा पेपर हातातही धरणार नाही. मला माहित आहे यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही. पण निषेध करण्याचा एवढाच मार्ग माझ्यापुढे शिल्लक आहे.
...........................
- महारूद्र मंगनाळे
लातूर
मो.9422469339
* महारूद्र मंगनाळे हे महाराष्ट्र टाइम्स आणि चित्रलेखाचे माजी प्रतिनिधी असून,सध्या त्यांचे बातमी मागची बातमी नावाचे साप्ताहिक सुरू आहे.त्याचबरोबर त्यांनी आधुनिक शेती सुरू केली आहे
Maharudra Mangnale