पत्रकार संघ कोणासाठी?

औरंगाबाद शहरातील स्व. प्रमोद महाजन मराठी पत्रकार भवनामध्ये शहरातील विविध दैनिकांच्या युवा पत्रकारांनी एकत्र येऊन अभ्यास वर्ग सुरू केला. त्यास आज 26 एप्रिल रोजी 3 महिने पूर्ण झाले. वेगवेगळ्या विषयांतील तज्ञ, अभ्यासक आतापर्यंत येथे हजेरी लावून गेले. आजच्या अभ्यास वर्गात खैरलांजी, सोनई, खर्डा व जवखेड्यासह महाराष्ट्रभर घडलेली जातीय अत्याचारांची प्रकरणे हाताळणारे कार्यकर्ते केशव वाघमारे यांचे 'जातीय अत्याचार आणि वास्तव' या विषयावर भाषण आणि सादरीकरण झाले. परंतु आजच्या अभ्यास वर्गासाठी पत्रकार भवनाची चावीच मिळाली नाही. त्यामुळे पत्रकार भवनाच्या ओसरीत हा कार्यक्रम घ्यावा लागला.
शहरातील तरुण पत्रकार काही चांगला उपक्रम राबवत आहेत. त्यांना बळ मिळून तो उपक्रम चांगल्या पद्धतीने चालायला हवा. पण चाव्या मिळण्यासाठीच जर ते असे अडत असतील, तर ती अतिशय खेदाची बाब आहे.
तीन महिन्यापासून हा वर्ग नियमित चालतो, हे सर्वाना माहित आहे. पत्रकार संघाच्या अध्यक्षांनी नेमलेल्या सेवकांकडे सभागृहाची चावी असते. त्याने न चुकता रविवारी हॉल उघडून देणे गरजेचे आहे. आज तो सेवक सिल्लोडला चावी घेऊन गेला होता. कुलुपाची दुसरी डुप्लिकेट चावीही नाही.  अध्यक्ष आणि सेवक या दोघांनाही नियमित अभ्यास वर्गाची पूर्वकल्पना कल्पना आहे. सर्वजण प्रत्येक वेळी त्यांना आठवण करून देतात. कोणी नसेल तर त्या सेवकाच्या घरी जाऊन चावी आणतात. तरीही असे घडते हे नक्कीच दुर्दैव आहे.
पुण्याहून खास आलेल्या वक्त्याच्या उपस्थितीत औरंगाबादच्या पत्रकार संघाची ही शोभा झाली. तरीही पाहुणे अतिशय चांगले होते. पत्रकार संघाच्या सभागृहासमोर ओसरीवर बसून त्यांनी मार्गदर्शन केले.
अभ्यासवर्ग उत्तम झाला. पण हा चावीचा संदर्भ पुण्यापर्यंत गेला, याचे खुप वाईट वाटले.
नेमकी आज याच पत्रकार भवनात भारतीय बौध्द महासभेचीही पत्रकार परिषद होती. त्यांनीही मग पत्रकार भवनाच्या पटांगणात मोकळ्या जागेतील लिंबाच्या झाडाखाली सतरंज्या टाकून पत्रकार परिषद घेतली. अध्यक्षांना पूर्वसूचना दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
असो. घडलेल्या प्रकारचे वाईट वाटले. बाकी काही नाही.   आजच्या अभ्यास वर्गात युवा पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थिती लावली. हा उपक्रम चांगला आहे. तो पुढे चालावा. त्यातून चांगले पत्रकार घडावेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फार मदत कुणाची झाली नाही तरी किमान त्यात खोडा तरी घालू नये, ही अपेक्षा.