अनिरुद्धला हवे मदतीचे बळ : जीबीएस व्हायरसने हातपाय निकामी
नागपूर : तसा 'तो' धाडसी, संकटांशी दोन हात करायला सदैव तयार असलेला. याच धाडसीवृत्तीमुळे त्याने अगदी ठरवून पत्रकाराची (वृत्तछायाचित्रकार) नोकरी पत्करली. प्रसंगी जीव धोक्यात टाकून अनेक वाईट गोष्टींचा पर्दाफाश केला. रोज रात्री झोपताना त्याच्या डोक्यात दुसर्या दिवशीच्या धाडसी कल्पना आकार घेत असायच्या. अशाच एका धाडसी कल्पनेसह तो त्या दिवशीही झोपी गेला. परंतु मध्यरात्री केव्हा तरी त्याला अचानक जाग आली तेव्हा त्याचे सतत धावणारे पाय निकामी झाले होते. तो हादरला. डॉक्टरकडे पोहोचेपर्यंत हातातली संवेदनाही हरवली. अखेर निदान झाले ते जीबीएस' या दुर्धर आजाराचे. हा लढवय्या वृत्तछायाचित्रकार आज पैशांअभावी जीवनाची लढाई लढतो आहे. अनिरुद्ध कापटकर असे त्याचे नाव.
स्थानिक दूरचित्रवाहिन्यांमध्ये फोटो र्जनालिस्ट अनिरुद्ध अख्ख्या शहराला परिचित आहे. १५ वर्षांहून अधिक काळापासून तो हे धाडसी काम करीत होता. १ जूनला अनिरुद्ध आपले कार्यालयीन काम आटोपून घरी परतला. रात्री अचानक तो उठला तेव्हा त्याचे पाय निकामी झाले होते. घरच्यांच्या मदतीने त्याला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार सुरू असतानाच व्हायरसने त्याच्या हातांनाही निकामी केले. डॉक्टरांनी त्याच्या तपासण्या केल्यानंतर 'जीबीएस' व्हायरसने त्याच्या शरीरावर अटॅक केल्याचे निष्पन्न झाले. आजाराचे निदान झाल्यावर तो प्रचंड खचला. डॉक्टरांनी उपचारावर सांगितलेल्या अवाढव्य खर्चामुळे तो खचला. अनिरुद्ध घरी एकटा कमावता आहे. त्याच्यावर आई, मुलगा व पत्नीची जबाबदारी आहे. सावित्रीबाई फुलेनगरात तो राहतो. अनिरुद्धला झालेल्या आजारामुळे त्याची आई व पत्नीला जबर धक्का बसला आहे. एवढा मोठा खर्च करणार कसा, याची चिंता त्यांना भेडसावू लागली आहे. नुकतीच त्याच्यावर 'प्लाझ्मा थेरपी' झाली आहे. यात जवळपास सव्वालाख रुपये खर्च झाले आहे. यापुढचा उपचार 'इमोनोग्लोबीन इंजेक्शनचा' आहे. पाच दिवसांचा हा उपचार आहे. परंतु प्लाझ्मा थेरपीने त्याच्या हृदयावर परिणाम झाला आहे. पोटॅशियम लेव्हल कमी झाली आहे. त्याला आजारातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला तीन लाख रुपयांवर खर्च लागणार आहे. आर्थिक बळ नसल्याने उपचारात अडचण निर्माण झाली आहे. या कठीणप्रसंगी अनिरुद्धला आपल्या मदतीची गरज आहे.
...
अनिरूध्द यांची पत्नी दीपमाला पुरूषोत्तम जाधव यांचे युनियन बँकेच्या मानेवाडा शाखेत ५४३००२०१००१४७९१ या क्रमांकाचे खाते आहे. यावर धनादेश किंवा धनाकर्ष पाठवून मदत करावी. त्यांना ८२३७२३९१५२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल...