पुणे - ‘सकाळ‘मध्ये शरद पवार यांच्या विचारांना जेवढे प्राधान्य दिले जाते, तेवढेच प्राधान्य माझ्या आणि आमच्या पक्षाच्या विचारांनाही मिळत असून, हा "सकाळ‘चा निष्पक्षपातीपणा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात खऱ्या अर्थाने "सकाळ‘चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखालील "सकाळ जलयुक्त शिवार‘, "तनिष्का‘ अशा उपक्रमांद्वारे समाजपरिवर्तनाचा विचार पुढे नेत आहे,‘‘ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे काढले.
पुण्यभूषण फाउंडेशनच्या "पुण्यभूषण‘ पुरस्कार वितरण समारंभात फडणवीस यांनी "सकाळ‘च्या भूमिकेचा, तसेच त्याच्या उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘जलयुक्त शिवार योजना‘ सुरू करून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला. त्यासाठी ठिकठिकाणी विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले. या योजनेत "सकाळ माध्यम समूहा‘चे काम पथदर्शी असेच आहे.‘‘
फडणवीस म्हणाले, ‘ज्या ज्या ठिकाणी या योजनेचे काम चाललेले आहे, तेथे "सकाळ‘च्या तनिष्का भगिनी मदतीला येतात. हे सामाजिक भान समाजात निर्माण करण्याचे काम "सकाळ‘ आणि प्रतापराव पवार यांनी केले आहे. ते महत्त्वाचे आणि तितकेच मोलाचेही आहे. आपण किती कार्य करतो, यापेक्षा लोकोपयोगी, चांगल्या कामांसाठी किती लोकांना प्रेरित करतो, हे अधिक महत्त्वाचे असते. जे लोक असे इतरांना प्रेरित करू शकतात, तेच खरे त्या त्या क्षेत्रातील नेतृत्व असते. असे नेतृत्व पवार यांनी उभे केले, म्हणूनच त्यांना "पुण्यभूषण‘ हा अतिशय मानाचा सन्मान मिळाला.‘‘
‘उद्योग, सामाजकारण, पत्रकारिता अशा क्षेत्रांतील प्रतापराव पवार यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. विशेषतः "सकाळ माध्यम समूह‘ हे माध्यम वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांपुरते मर्यादित न ठेवता, त्याला त्यांनी वेगळे रूप दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजपरिवर्तन ही माध्यमांची भूमिका होती. समाजासमोर स्वातंत्र्याचे बीजारोपण झाले पाहिजे, या पद्धतीचा माध्यमांचा विचार होता आणि स्वातंत्र्योत्तर काळात प्रतापराव पवार आणि आमचे मित्र अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखालील "सकाळ‘ समाजपरिवर्तनाचा विचार पुढे नेत आहे. सामाजिक परिवर्तनासाठी माध्यमे किती सकारात्मक पद्धतीने काम करीत असतात, हेच या उदाहरणातून पाहायला मिळत आहे,‘‘ असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, ‘अलीकडच्या काळात अनेक दैनिके मुखपत्रे बनत आहेत; पण "सकाळ‘ने निष्पक्षपातीपणा पाळला आहे. समाजाला काय अपेक्षित आहे, कशाची आवश्यकता आहे, याचा विचार करून मूलभूत गोष्टींमध्ये काम करायचे, हीच "सकाळ‘ची यशस्वी वाटचाल आहे. "तनिष्का‘, "ऍग्रोवन‘सारखे निरनिराळे उपक्रम "सकाळ‘ने सुरू केले. हे कौतुकास्पद आहे.‘‘