अतिरेकी पञकारितेचा दहशतवाद

याकूबला झालेली फाशी आणि त्या निमित्तानं वृत्तवाहिन्यांनी केलेला नंगानाच आपण सगळ्यांनी पाहिला. यावर सोशल मीडियात आणि सर्वसामान्य लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
खरंतर कसाबची फाशी सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली नाही याचं वृत्तवाहिन्यांना बरंच शल्य होतं. म्हणून याकूबची संधी सोडायची नाही, असा जणू चंगच चॆनेलवाल्यांनी बांधला होता. 
मग काय? सुरु झालं, फाशीचं सुपरफास्ट कव्हरेज.
राञभर हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्यांच्या डोळ्याला डोळा नव्हता. फाशी देणार हे जाहीर होताच यांच्या नाकात जणू वारं भरलं आणि त्यानंतर यांनी सात- आठ तास जो काही ब्रेकिंगचा हैदोस घातला, तो पञकारितेला शरमेनं मान खाली घालायला लावणारा होता.
भल्या पहाटेपासून तुमच्या आमच्या TV वर ब्रेकिंग आदळायला लागल्या.
"फाशीची सगळी तयारी पूर्ण... थोड्याच वेळात याकूब फासावर लटकणार"
"याकूब दोन दिवसांपासून उपाशी"
"याकूबने आज नाश्ता केला"
"याकूबने कुराण वाचलं, नमाज अदा केली"
" अखेर याकूबला फासावर लटकवलाच"
" याकूबला अर्धातास फासावर लटकतच ठेवणार"
" अखेर याकूब मृत घोषीत, आता पोस्टमॉर्टेम"
"याकूबच्या फाशीचं शुटिंग केलं"
"याकूबचा मृतदेह विनामतळाकडे रवाना, थोड्याच वेळात मुंबईत पोहोचणार" वगैरे वगैरे वगैरे...
TRP च्या नशेत बेधुंद झालेले हे लोक कव्हरेज करताना आपण ते कुणासाठी करतोय? कुणाची बातमी देतोय? कशी देतोय? कशासाठी देतोय? त्यातून समाजमनावर काय परिणाम होतोय? याचं कसलंही भान त्यांना नव्हतं... होती ती फक्त स्पर्धा... सगळ्यात पुढे राहण्याची...
याकूबच्या बातमीचं कव्हरेज करताना चेकाळलेल्या वृत्तवाहिन्यांनी काही दिवसातच समाजाचं प्रचंड मोठं नुकसान केलं. थुतराट स्पर्धेपायी अप्रत्यक्षपणे समाजात दूही पसरवण्याचं पाप केलं. एवढंच नाही तर या अर्धवटरावांनी पञकारितेच्या मुल्यांना आणि लोकांच्या विश्वासाला पायदळी तुडवत पञकारितेलाच शरमिंदा केलं.
याकूबनं फासावर जाण्याआधी कुराण वाचलं, नमाज अदा केली ही ब्रेकिंग देऊन यांना काय साधायचं होतं? ही बातमी दिल्यावर कुराणावर श्रद्धा व्यक्त करणाऱ्यांच्या मनात याकूबबद्दल काय भावना निर्माण होईल, याचा एकदाही मनात विचार आला नसेल? आपण दाखवतोय त्याचे समाजाच किती गंभीर आणि खोलवर दूरगामी परिणाम होतात याची साधी जाणीवही नसावी, हे स्वत:ला पञकार म्हणवून घेणाऱ्यांसाठी लांच्छनास्पद आहे.
याकूबला अर्धातास फासावर लटवतच ठेवणार ही ब्रेकिंग न्यूज होती. कशासाठी? त्याला खायला दिलं, आंघोळ घातली, कपडे दिले, केक दिला हे सगळं सगळं सांगितलं जात होतं आणि सगळा देश हे घरात बसून बघत होता.
फिल्डवर तर पञकारांनी कहरच केला. याकूबला फाशी झाल्यानंतर त्याच्या भावांचा "बाईट" घेण्यासाठी जे पाठलाग करून छळलं जात होतं ते संतापजनक होतं. ते दोघे हात जोडून विनंती करत होते. "प्लिज आम्हाला एकटं सोडा, आम्हाला काहीही बोलायचं नाही. आमचा न्यायव्यवस्थेवर, अल्लावर पूर्ण विश्वास आहे." पण ऐकतील ते पञकार कसले? सांगा! बोला! काही तरी बोला! असा धोशा सुरुच होता. समजा उद्या या पञकारांच्या भावालाच जर काही तासात फाशी दिली जाणार असेल तर अशावेळी ते काय बोलतील? काय प्रतिक्रिया देतील? किती हा असंवेदनशीलतयपणा?
फाशीनंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हॉटेलमधून बाहेर आलेल्या दोन भावांच्या चेहऱ्यावर काय भावना होत्या असा प्रश्न एँकर रिपोर्टरला विचारत होता. 
याकूबचा मृतदेह घेऊन जाणारी अँम्ब्यूलन्स दिसताच रिपोर्टर अक्षरश: तुटून पडले, राञी गाडीच्या मागे कुञे धावतात तसे. एम्ब्युलन्सच्या काचांवर आदळणारे आणि आतल्या मृतदेहाला जवळून शूट करण्याचा प्रयत्न करणारे चॅनेलवाल्यांचे कॅमेरे म्हणजे किळसवाणा प्रकार होता.
याकूबच्या मृतदेहाला तुरुंगापासून फॉलो केलं जात होतं. एका नंबर वन वृत्तवाहिनीच्या बड्या पञकारांनी तर लाजच आणली. हे महाशय थेट विमानात घुसले. याकूबचे भाऊ विमानातून मुंबईला कसे येत आहेत, हे सांगत सुटले. त्यांच्या शोध पञकारितला खरोखर सलाम. हे सगळं पाहून घरातल्यांची सर्वसामान्य भावना होती, अरे कोणीतरी आवरा रे यांना. मृतदेह कसा येणार, कुठून येणार, कधी येणार याची प्रत्येक अपडेट मिळत होती.
इकडे मुंबईत परिस्थिती सामान्य होती. सगळं काही सुरळीत सुरु होतं. ते कोणीच दाखवलं नाही. उलट रॅपिड अॅक्शन फोर्सच्या गाड्या कशा तैनात केल्या जाताहेत हेच वारंवार दाखवलं जात होतं. जणू कुठल्याही क्षणी दंगल भडकेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आभास TVतून होत होता. हे खरोखरंच भीषण होतं.
इकडे बडा कब्रस्तानमध्ये तर पञकारांची आणि त्यांच्या ओबी व्हॅन्सची जञाच भरली होती. याच बडा कब्रस्तानमध्ये याकूबला कसं दफन केलं जाणार, याचं रसभरीत विश्लेषण केलं जात होतं. काही चॆनेल्सनी तर दिल्लीहून खास कबरस्तानात मेकअप करून अँकर उतरवल्या होत्या. हे सगळं उबग आणणारं, कोणत्याही विवेकी माणसाला अस्वस्थ करणारं, चीड आणणारं होतं..
या बेताल नंगानाचात वेगळी वाट निवडली ती एरवी आक्रस्ताळेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या टाईम्सनं. त्यांनी आश्चर्यकारकरित्या योग्य संयम बाळगला. कठोर निर्णय घेतला. त्याचं खरंच कौतूक आहे. इकडे मराठीतलं सनसनाटी चॅनेल अशी ओळख असलेल्या टीव्ही नाईननं आम्ही देशद्रोह्याची बातमीच दाखवणार नाही असा वेगळाच बाणा दाखवला. याची प्लेट चालवून त्याचंही वेगळं मार्केटिंग केलं. पण तरीही या बेताल गर्दीत ते वेगळे वाटले. म्हणून हजारो लोकांनी त्यांच्या भूमिकेचं कौतूक केलं.
एकीकडे या दोन चॅनेल्सचं ट्विटर, फेसबूक, वॉट्सअॅप या सोशल मीडियावर कौतूक होत होतं तर दुसरीकडे याकूबच्या बिभत्स, बिनडोक कव्हरेजवरून इतर चॅनेलवाल्यांची फूल टू धुलाई सुरु झाली होती. या सगळ्यांचं वस्ञहरण सुरु झालं, तेव्हा कुठे ही मंडळी थोडी भानावर आली. मग त्यांना डॉ. कलाम यांच्या अंत्यविधीच्या बातमीची आठवण झाली. त्यातच मुंबई पोलिसांचं उशीराचं शहाणपण अर्थात अॅडवायझरी आली. त्यानंतर त्यांना बोऱ्याबिस्तरा उचलावा लागला. त्यामुळे आपल्या सुदैवानं याकूबला कसं कबरमध्ये टाकलं हे चॅनेलवाल्यांना शूट करता आलं नाही. तरी काहीजणांनी याकूबच्या अंत्यविधीतले गर्दीचे फोटो दाखवण्याचा निर्लज्जपणा केलाच.
अशा प्रकारे चॅनेलवाल्यांनी फाशी सेलिब्रेट केली. याकूबची महायोद्ध्यासारखी बित्तंबातमी दाखवून एकप्रकारे त्याला हिरो केला. त्यातून याकूबला विनाकारण सहानुभूती मिळाली. या गदारोळात मुस्लिम तरूण दुखावला गेला. दोन समाजात द्वेशाची बीजं पेरली गेली, हे नाकारता येणार नाही.
खरंतर याकूबच्या फाशीची बातमी आलेल्या दिवसापासूनच चॅनेलवाले भानावर नव्हते. सत्तेच्या खुर्चीसाठी प्रेतांवर राजकारणाचे डाव मांडणारे, फुटकळ प्रसिद्धीसाठी मिरवणाऱ्या बिनडोक माथेफिरूंचे बाईट घेऊन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुच होता. त्याला अनावशक प्रसिद्धी दिल्यानं वेगळं वातावरण तयार झालं. दुर्दैवाची बाब ही की, याकूबच्यापुढे यांना कलामही खुजे वाटले असावेत कदाचित. कारण ते आम्हाला अधुनमधूनच दिसले. यातच या माध्यमांचं बौद्धिक खुजेपण दिसून आलं. हे सगळं करणारे पञकार कुठलं जर्नलिझम करताहेत हेच कळत नाही. आता ज्यांनी कंबरेचं काढून डोक्याला गुडाळलंय त्यांना नैतिकता सांगायची कुणी आणि कशी हा प्रश्न आहे.
यांना सालटून काढलं की, हा व्यवसाय आहे, यात अर्थकारण आहे, इथं स्पर्धा आहे अशी नेभळत कारणं सांगितली जातील. पण असं असेल तर इथूनपुढे माध्यमांवर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला म्हणू नका. आमच्या धंद्यावर झालेला हल्ला म्हणा. मग इतरांना उपदेशाचे आणि तत्वज्ञानाचे डोस पाडण्याच्या भानगडीत पडू नका. पतीव्रतेचा आव तर आणूच नका.
लोकांची चामडी सोलून काढता काढता यांची संवेदना त्या अतिरेक्यांइतकीच बोथट झालीय. काही माणसांना मारून दहशत पसरवणं, समाजात दुही माजवणं हा दहशतवाद्यांचा हेतू असतो. आज माध्यमांचा हा अतिरेक फक्त माणसं मारत नाही इतकंच.
- एक प्रेक्षक