अरे वा, केवढे नॉलेज आहे यांना...

गेल्या काही वर्षांपासून मराठीमध्ये ज्यांना पत्रकार म्हणून करियर करायचे आहे, त्यांच्यासाठी काही पात्रतेच्या अटी ठरल्या आहेत.
१. संबंधित व्यक्तीला यस सर, यस सर करण्याची सवय हवी.
२. त्याच्याजवळ स्वतंत्र दृष्टिकोन नसला तरी चालेल.
३. गल्लीच्या बाहेर जग किती मोठे आहे याचा विचार करताना तो त्याला क्राईम, क्रिकेट, सिनेमा एवढ्या पातळीवरच करता आला पाहिजे.
४. गल्लीतल्याच राजकारणावर अधिकारवाणीने लिहिता-बोलता आले पाहिजे.
५. कधी-कधी एकदमच मला संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आणि इतरही जड विषय किती सहज हाताळता येत आहेत याचा साक्षात्कार होत राहिला पाहिजे.
६. मग अशा विषयांवर लिहिताना-बोलताना चुका करा पण दामटून लिहा-बोला हा नियम पाळता आला पाहिजे. इत्यादी-इत्यादी.
एक काळ असा होता की मराठी न्यूज चॅनेल्स आणि पेपरमध्ये येणाऱ्या बातम्या, दर्जेदार माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येत असे. मात्र अलीकडच्या काळात विशेषतः राज्यातल्या गल्लीबोळात रमलेल्या आणि टीआरपीच्या आकड्यांच्या खेळात रमलेल्या आक्रस्ताळे मराठी माध्यमांवर आता विश्वास बसत नाही. म्हणूनच आजच्या विद्यार्थ्यांना मराठी पेपर-न्यूज चॅनेल नियमित वाचा-पाहा आणि अपडेट राहा असे सांगणेही कठीण होऊन बसले आहे. ज्यांची क्षमता नाही असे बरेचजण आज स्वतःला धडाडीचे पत्रकार म्हणवून घेत आहेत आणि हमखास प्रेझेंटेशनमध्ये चुका करतआहेत.या चुका विशेषतः वर उल्लेख केलेल्या विषयांमध्ये प्रकर्षाने होताना दिसताहेत. या चुका लक्षात आणून दिल्या तरी त्याची त्यांना स्वतःला आणि त्यांच्या मालकांना खंतही नाही याचे वाईट वाटते. हे विषय मराठी माणसाला समजतात कोठे अशी त्यांची भावना असते. त्यामुळे त्यात चुका झाल्या तरी हरकत नाही, असे त्यांचे मत बनलेले असते. या विषयांचा वापर त्यांच्यासाठी फक्त स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यापुरताच असतो. चार लोकांना सांगितले की, ते अरे बापरे हा विषय... असे उग्दार काढतात, तेव्हा असे पत्रकार एकदम हुरळून जात असतात. त्यामुळे आतरराष्ट्रीय घडामोडींचा अर्थ आजच्या मराठी माद्यमांसाठी कसा आहे,
१. अमेरिकेत काही खुट्ट झाले की ती आंतरराष्ट्रीय महत्त्वाची घटना.
२. युरोप, जपान आणि गेल्या काही वर्षांपासून चीन येथे कोणी कोणतेकपडे घातले आहेत, कोण किती किलो जेवण करते, इत्यादी-इत्यादी म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना.
३. अलीकडच्या काळात, चीन भारताला घेरतोय हे वाक्य मराठी पत्रकारांना पाठ झाल्यामुळे चीनही आंतरराष्ट्रीय घडामोडींमद्ये येऊ लागला आहे.
४. मराठी पत्रकारांच्या नकाशामध्ये अमेरिका, ब्रिटन, जपान, चीन, ऑस्ट्रेलिया असे ठराविकच देश आहेत. त्यामुळे अन्य जगाची त्यांना माहितीच नाही.
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी पत्रकारितेत एक प्रथा रुढ झाली आहे. जे विषय आपल्याला झेपत नाहीत, समजत नाहीत, ते विषय वाचकाला दर्शकाला आवडत नाहीत असे म्हणायचे आणि तिकडे दुर्लक्ष करायचे. अशा गुणवैशिष्ट्यपूर्ण मराठी पत्रकारितेची क्षमता पाहू.
१. एप्रिल 15 मध्ये येमेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यावर तेथून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने तातडीने पावले उचलली. काही पेपर्सनी आज किती भारतीयांची सुटका करण्यात आली अशा छोट्याशा बातम्या दिल्या, तर काहींनी ग्लॅमरस बातम्यांमधून जागा-वेळ शिल्लक राहिल तशा दाखवल्या-छापल्या.काही दिवसांनी भारताच्या या अजब कारवाईचे अमेरिकेने कौतुक केल्यावर या माध्यमांना अचानक त्यातलं महानपण लक्षात आलं आणि त्याला महत्त्व मिळू लागलं. त्याआधी लिबिया, लेबनॉनमधील अशाच मोहिमांच्यावेळीही झाले होतं.
२.मराठी पत्रकारांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक म्हणून मिरवायचे असेल, तर ओबामांच्या दौऱ्याच्यावेळी त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवलं म्हणजे झालं. फारफार तर चीन भारताला कसा घेरतोय याची फक्त उदाहरणं पाठ झाली म्हणजे आपली पत आणखी वाढते.उरलेल्या वेळात मग आहेच, उथळ बातम्यांच त्यांना दिसत राहतात. जसे, अमेरिकेतल्या कोणी एकाने आपल्या प्रेयसीला कसे प्रपोझ केले, ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनानुसार लोक अमूक एक खाऊन कसे ताजे जवाने राहतात इत्यादी-इत्यादी. पण त्याच चीनला शह देण्यासाठी भारताची शूर सैन्यदले करत असलेल्या उपाययोजना त्यांना दिसत नाहीत. कारण त्यांची दृष्टीच कूपमंडूप असते. ते हाडाचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक असतात आणि न्यूज चॅनेल्सवर तावातावाने बोलूही लागलेले असतात.
३. भारतीय नौदलासाठी मुंबईत बांधल्या जात असलेल्या स्कॉर्पिन पाणबुडीची बातमी देताना मराठी न्यूज चॅनेल्समध्ये भारी स्पर्धा पाहायला मिळाली. कोणी या पाणबुडीच्या गोदीतील एका विभागातून दुसऱ्या विभागात पाठविण्याला जलावतरण म्हटले, तर कोणी तिला चक्क अणुपाणबुडी ठरवून टाकले, आणखी कोणी या पाणबुडीला थेट ५० दिवस पाण्याखाली राहण्याचा मान मिळवून दिला.आणि असे सांगितले जाते की, म्हणे या बातम्यांनंतर या पाणबुड्यांच्या फ्रेंच कंपनीने भारतातील संरक्षण मंत्रालयाला फोन करून माहिती घेतली की, आमच्या पाणबुड्या एकदम ५० दिवस पाण्याखाली ठेवण्याचे तंत्रज्ञान कसे आत्मसात केले आहे. आम्हालाही द्या की ते तंत्रज्ञान. आणि त्यांनी मराठी माध्यमांचे आभारही मानले की, त्यांची पाणबुडी अणुपाणबुडी असल्याची माहिती त्यांना करून दिल्याबद्दल.
४. पाठोपाठ आणखी एक बातमी आली. भारतीय नौदलासाठी मुंबईत बांधल्या जात असलेल्या विशाखापट्टणम या अत्याधुनिक युद्धनौकेच्या जलावतरणाची. आता इथे मराठी न्यूज चॅनेल्सनी तिला चक्क नौदलात दाखलही करून टाकले. वा किती छान वाटले हे ऐकून की ज्या युद्धनौकेवर अजून एकही शस्त्र नाही, तिची बांधणीही अजून अर्धवट आहे ती थेट नौदलात दाखल झाल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.
प्रत्येक न्यूज चॅनेल स्वतःची निष्पक्ष, निर्भीड, अचूक, बेधडक इत्यादी-इत्यादी विशेषणांची स्वतःच जाहिरात करत असतात. पण सगळेच एकाच माळेतील मणी झाले आहेत. आचार-विचारापासून प्रेझेन्टेशनपर्यंतसगळंच कसं साचेबद्ध, उथळ. आणि अशा चुका करणाऱ्यांचीच परत चलती. कारण लोकांना कुठं समजतंय.एकच ताल, एकच लय, एकच सूर, एकच दृष्टी यामुळे सर्वच पेपर-न्यूज चॅनेल रटाळ झालेले आहेत.
आजही मराठीमध्ये या विषयांचे खरे जाणकार, अभ्यासक अस्तित्वात आहेत. पण त्यांची संख्या अत्यल्प आहे आणि या विषयांची लई भारी क्रेझ असणाऱ्यांच्यामध्ये त्यांचा आवाजच येत नाही. बातमी देण्यापेक्षा सगळेच सगळ्या विषयांमधले विश्लेषक झालेले आहेत.

आणखी एक-दोन ताजी उदाहरणे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला मध्य आशिया आणि शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्स शिखर परिषदांच्या निमित्ताने रशियाचा दौरा केला. मात्र या दौऱ्याकडे देशातील प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केले. त्याचे ठळक कारण म्हणजे त्या दौऱ्यातील देशांना ग्लॅमर नाही. सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे संबंध वाढवणारा हा दौरा असला तरी ग्लॅमर नसल्याने आमच्या माध्यमांनी लोकांना त्यात इंटरेस्ट नाही अशी स्वतची समजूत करून घेत आपल्या बौद्धीक अक्षमतेवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. ग्लॅमरस दौऱ्याच्यावेळी यांना तास-न-तास, पानंच्यापानं कमी पडतात. वाट्टेल तिथं जागा शोधून त्या बातम्या घुसडल्या जातात. पण मध्य आशियासारख्या गंभीर दौऱ्याच्या वृत्तांकनासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. पण या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आले आणि या माध्यमांना पुन्हा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा पुळका आला. कारण त्या पलीकडे त्यांची वैचारिक झेप जात नाही. त्यांच्या जगाच्या नकाशावर दोन-चार देशच आहेत ना. मग बसले की सूट-बूट घालीन आणि पेनं आणि खुर्च्या पकडून. त्याच दिवशीशांघाय सहकार्य संघटनेचे सभासदत्व भारताला मिळाले, तरी त्याचे महत्त्व त्यांना समजले नाही आणि मग नेहमीचीच कारणं - लोकांना त्याच्यापेक्षा या भेटीत इंटरेस्ट जास्त होता. प्रत्यक्षात मध्य आशियाचा दौरा ग्लॅमरस नसल्याने त्याचे महत्त्व समजण्यासाठी आणि ते प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी डोक्याचा वापर करावा लागणार होता. अरे बापरे.... इथंच तर खरी अडचण आहे आमच्या खासगी माध्यमांची. त्यांना ते जमत-समजत नाही म्हणून ते प्रेक्षकांनाही आवडत नाही.
त्या आधी काही दिवस भारताच्या युद्धनौका आग्नेय आशिया, सेशल्स आणि मॉरिसशमध्ये काही काळ तैनात आहेत. पण त्याचीही बातमी द्यायला जागेची अडचण. एकीकडे चीन भारताला घेरतोय या पलीकडे यांची वैचारिक झेप जात नाही तर दुसरीकडे अशा बातम्या दिसण्याची क्षमता नाही, हेच खरे.
आम्हाला सामान्य प्रेक्षक-वाचकांना यापेक्षा वेगळी सर्वांगीण बातमीपत्र आवडतात. पण ते या खासगी प्रसारमाध्यमांना कोण पटवून देणार ?- एक वाचक