'महाराष्ट्रा'त मराठी वृत्तवाहिनी क्षेत्रात 'नव जागृती'!

एका नव्या मराठी वृत्तवाहिनीसाठी सुरू असलेला पत्रकारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. वाहिन्यांच्या ग्लॅमरची चमकदार स्वप्ने पाहात बसलेली ताजी ताजी पत्रकारिता प्रशिक्षित मुले. त्यातील अनेकांचा तर हा पहिलाच अनुभव. एकेक मुलगा आत जातोय. आत मी मी म्हणणारे ज्येष्ठ पत्रकार. ते मुलाखत घेताहेत आणि मग मोठय़ा उदारपणे त्या मुलांना सांगताहेत - तुम्हाला वृत्तवाहिनीत काम करण्याची संधी मिळते आहे हीच कितीतरी मोठी गोष्ट. तुम्हाला येथे तीन महिने प्रशिक्षण देण्यात येईल. मात्र त्यासाठी वेतन मिळणार नाही..
बातमीदारीपासून विपणनापर्यंतच्या कामाकरीता असे स्वस्तात गुंडाळता येणारे मनुष्यबळ, त्यांना आकर्षित करण्यासाठी प्रारंभी दाखविण्यासाठी जमा केलेले नामवंत चेहरे आणि 'साखळी मार्केटिंग', 'चीट फंड' यांसारख्या व्यवसायातून जमा केलेली माया या बळावर वृत्तवाहिन्या काढण्याचा एक नवा उद्योग महाराष्ट्रात सुरू झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे एरवी नाकाने नैतिकतेचे कांदे सोलत जग जिंकण्यास निघालेली पत्रकार मंडळीही या उद्योगात सहभागी असल्याचे पाहावयास मिळत आहे. अशा मंडळींचा सहभाग असलेल्या वाहिन्यांपैकी काहींचा पाया डळमळू लागलेला असतानाच येत्या काळात सुमारे चार नवीन मराठी वृत्त वाहिन्या दाखल होणार असल्याने या उद्योगाविषयी माध्यमक्षेत्रातही एकंदरच कुतुहलाचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांत सत्ताबदलापासून नव्या सत्तेच्या स्थिरस्थावर होण्यापर्यंत अनेक घटना वेगाने घडत गेल्या. त्यामुळे देशभरात वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या जशी वाढली तसाच वृत्तवाहिन्यांकडे येणाऱ्या जाहिरातींचा टक्काही वाढला. 'फिक्की'च्या अहवालानानुसार प्रादेशिक वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांमध्ये २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये मोठी वाढ झाली होती आणि हे प्रमाण यापुढेही वाढत राहणार आहे. १४.१ टक्के प्रेक्षक सध्या मराठी वाहिन्यांना पसंती देतात. यातही वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. 'ट्राय'चा बारा मिनिटांच्या जाहिरातीचा नियम सगळ्याच वाहिन्यांकडून पाळला जात नाही. त्यामुळे जाहिराती, टेली मार्के टिंगच्या प्रक्षेपणातून मिळणाऱ्या उत्पन्नातही चांगलीच वाढ झाली असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. यामुळेच या व्यवसायाकडे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक यांच्यापासून चीट फंड चालविणाऱ्या कंपन्यांच्या चालकांपर्यंत अनेकांचे लक्ष वळले असल्याचे सांगण्यात येते. किमान ५०० ते ८०० कोटींच्या भांडवलात सुरू केलेली वृत्तवाहिनी जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टिकवणे सहज शक्य असल्याने त्या बळावर वृत्तवाहिन्या काढण्याचा नवा 'फंडा' सुरू झाला असून, हा घाट घालत असताना चार व्यावसायिक पत्रकारांना एकत्र करायचे आणि शिकावू पत्रकारांना कमीतकमी मानधन देऊन वाहिनीचा कारभार सुरू करायचा, अशी नीती अवलंबिली जात असल्याचे जाणकार सांगतात. अर्थात येणारी प्रत्येक वाहिनी हेच करते असे नाही, अशी पुस्तीही ते
जोडतात.
आजघडीला सात मराठी वृत्तवाहिन्या कार्यरत असून, दिल्ली ते बेळगावपर्यंत विविध भागातील काही व्यावसायिक आणखी सुमारे चार वृत्तवाहिन्या घेऊन येत आहेत. यातील एक वाहिनी 'इनाडू' समूहाची असून, हा समूह थेट माध्यमक्षेत्राशी संबंधित आहे. असे अपवाद मात्र कमीच
आहेत.
स्वस्त मनुष्यबळाचे कारखाने
गेल्या काही वर्षांत एकूणच माध्यमांबद्दलचे लोकांचे आणि खासकरून तरूण पिढीचे आक र्षण वाढते आहे. शिवाय, पत्रकारिता या विषयात आता तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमापासून अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. हजारो रूपये भरून 'बीएमएम' किंवा तत्सम पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडाही तितक्याच वेगाने वाढतो आहे. सध्या फक्त मुंबई विद्यापीठातून दरवर्षी तब्बल पाच ते सहा हजार बीएमएमचे विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. हे मनुष्यबळ सहज स्वस्तात उपलब्ध होते.
साभार : लोकसत्ता