मुंबई - कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप लेखातून केल्याप्रकरणी दैनिक मुंबई मित्र या वृत्तपत्राविरोधात अब्रूनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. लालबागचा राजाने दै.मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे, कार्यकारी संपादक उन्मेष गुजराथी आणि महेश वेंगुर्लेकर यांच्याविरूद्ध आज शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला असून येत्या 14 ऑक्टोबरला या खटल्याची सुनावणी दंडाधिकारी न्यायालयाने निश्चित केली आहे.
नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान राजाच्या दर्शनासाठी एक कोटीच्या आसपास भाविकांची अफाट गर्दी उसळते. लाखोच्या संख्येने भाविक राजाकडे साकडे घालतात तर तितक्याच संख्येने भाविक आपल्या श्रद्धेप्रमाणे नवसही फेडतात. यादरम्यान राजाच्या संपत्तीत कोट्यवधींची भर पडते आणि त्या निधीचा मंडळाच्या वतीने रूग्ण सहाय्य निधी, डायलिसिस सेंटर, पुस्तक पेढी, ग्रंथालयसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात तरी महेश वेंगुर्लेकर यांनी मुंबई मित्र या दैनिकाला चुकीची बदनामीकारक माहिती दिल्याचा आरोप करीत त्यांच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 499, 500, 501 आणि 34 अन्वये फौजदारी खटला अॅड.गीतांजली गोलतकर, अॅड . निखील राजेशिर्के आणि अॅड. कुणाल राणे यांनी दाखल केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी दिली.
बदनामी करणाऱ्यांना अद्दल घडणार
लालबागच्या राजाचे जगभरात कोट्यवधी भाविक आहेत आणि त्याची बदनामी करून स्वस्तात प्रसिद्धी मिळविण्याचा हा महेश वेंगुर्लेकर यांनी दैनिकाच्या माध्यमातून खोडसाळ प्रयत्न केला आहे. मंडळाचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक आहे. लालबागच्या राजाच्या आशिर्वादाने सुरू असलेले सामाजिक कार्य यापुढेही सुरूच राहिल. राजाच्या पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनामी करणाऱ्यांना अद्दल घडावी म्हणूनच आम्ही त्यांच्याविरूद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे आणि न्यायालय त्यांना अद्दल घडवेल, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी केली आहे.