बूंद से गई, वो हौद से नही आती’...

गोष्‍ट म्‍हणाल तर जुनी आणि म्‍हणाल तर ताजी. आता आताची. मागच्‍याच महिन्‍यातील. राज्‍यातील 'बीजेबी माझा' आणि 'बाप' माणूस असलेल्‍या एका माजी कुलगुरूची. त्‍याचं झालं असं की, अर्थतज्‍ज्ञ असलेल्‍या या माजी कुलगुरूंच गणित चुकलं अन् त्‍यांनी आपल्‍या पुस्‍तकाच्‍या प्रकाशन समारंभाला वैचारिक दृष्‍ट्या विळ्या भोपळ्याचं वैर असलेल्‍या सरसंघ चालकांना बोलवलं. इथंच माशी शिंकली. दोन तलावारी एका मॅनमध्‍ये पाहून माध्‍यमांसाठी ही 'न्‍यूज' ठरली. आपणच सगळ्यांपेक्षा पुढं अशी शेखी मिरवणाऱ्या बीजेपी माझाच्‍या तर नाकात वारं घुसलं. लागलीच त्‍यांनी कुठलीही खातरजमा न करता या माजी कुलगुरूंच्‍या नावानं दिवसभर चुकीची 'ब्रेकिंग न्‍यूज' चालवली. (सुरुवातीला ही बातमी आपल्‍याकडं का नाही म्‍हणून त्‍यांच्‍या प्रतिस्‍पर्ध्‍यांनी आपल्‍या रिपोटर्सची खरडपटी काढली. नंतर मात्र कौतुक केलं.) आपली बदनामी झालीय, या विचारानं कुलगुरूंचं अगोदरच सपाट असलेलं डोकं चांगलंच तापलं. थयथयाट झाला. त्‍यांनी तत्‍काळ बीजेबी माझाच्‍या संपादकांना फोन केला. चांगल झापलं. ब्रे‍किंग न्‍यूज बंद झाली. पण, त्‍यांनी कोट्यवधी रुपयांच्‍या मानहानीचा दावा टाकण्‍याची धमकी दिली. मग बीजेपी माझ्याच्‍या टीमनं कशी तरी त्‍यांची समजूत काढली आणि त्‍यांच्‍याच करवी या न्‍यूजचा खुलासा आपल्‍या चॅनलवरून दाखवला. या माजी कुलगुरूंनी संधीचं सोनं करत बीजेपी माझावरूनच बीजेपी माझाची पिसं काढली. पार बोडखं करून टाकलं राव.आता काय करावं, चूक कशी दुरुस्‍त करावी. त्‍यांनी मानहानीचा दावा टाकू नये, यासाठी खल झाला. मग माजी कुलगुरू हे सूत्रधार असलेली 'संविधाना'वर आधारित नवीन मालिका सुरू करण्‍यात आली. अनपेक्षित मिळालेल्‍या या प्रसिद्धीमुळं माजी कुलगुरूही सुखावले. त्‍यांनी आपण दावा टाकणार नसल्‍याचं सांगितलं. पण, एव्‍हाणा दोघांनीची महाराष्‍ट्रभर भरपूर बदनामी झाली होती. ही गोष्‍ट जेव्‍हा अकबरने बिरबलाला सांगितली तेव्‍हा बिरबल म्‍हणाला, ‘खाविंद, बूंद से गई, वो हौद से नही आती’...