'दुष्काळी' संपादकांना दर्डाशेठचा 'दिलासा'

औरंगाबाद - मराठवाड्यात सध्या १९७२ पेक्षा भयंकर असा 'दुष्काळ' पडलेला आहे.या दुष्काळाबाबत इतर दैनिकांपेक्षा चांगले कव्हरेज करता यावे म्हणून महाराष्ट्राच्या मानबिंदूने एक खास पद निर्माण केले असून,त्याचे नाव आहे 'दुष्काळी संपादक'...
या पदावर अर्थातच संजीव उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.उन्हाळे हे लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीत दीड वर्षे कार्यकारी संपादक होते.सन २०१२ मध्ये आले आणि सन २०१३ मध्ये गेले.दर्डाशेठनीच त्यांना 'नारळ' दिला होता आणि दर्डाशेठनीच पुन्हा त्यांना 'दिलासा' आहे.
अर्थात उन्हाळे यांचा दुष्काळावर अभ्यास चांगला आहे.त्यांनी अनेक उन्हाळे पाहिले असल्यामुळे दुष्काळी संपादक म्हणून ते चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे.
काही का असेना,लोकमतला कोणते पद केव्हा निघेल हे सांगता येत नाही,हेच खरे.मात्र दर्डाशेठनी उन्हाळे यांना 'दिलासा' देवून एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत.एक तर उन्हाळे हे पुन्हा 'गावगाडा' हे साप्ताहिक सुरू करणार होते.त्यासाठी श्रीकांत भराडे आणि प्रज्ञा देशपांडे हे लोकमतचे दोघेजण 'गावगाडा'मध्ये गेले होते.ही गळती थांबविण्यासाठी आणि उन्हाळे यांना 'दिलासा' देण्यासाठी 'दुष्काळी संपादक'पद निर्माण केले गेले, अशी चर्चा लोकमत भवन परिसरात सुरु आहे.
उन्हाळे यांची 'दिलासा' नावाची मोठी सामाजिक संस्था आहे.या संस्थेमार्फत शासनाची करोडो रूपयाची कामे सुरू आहेत.अर्थात यामुळे उन्हाळे यांना दिलासा कामासाठी लोकमतचा 'दिलासा' मिळाला की दर्डाशेठना दुष्काळी कामासाठी उन्हाळे यांचा 'दिलासा' मिळाला,हे कोडेच आहे.