खंडणीखोर पत्रकारांना रंगेहात अटक

मुंबई - मानखुर्द पोलिसांनी २ खंडणीखोर पत्रकारांना रंगेहात पकडले आहे. मानखुर्दमधील मंडाला अधिकृत शिधावाटप दुकानदाराकडे त्यांनी धान्याचा काळाबाजार उघड करण्याची भीती दाखवून खंडणी मागितली होती.गणेश जयराम जैसवाल व रुपकुमार रघुवंशी असे अटक करण्यात आलेल्या पत्रकारांची नावे आहेत.
       मानखुर्द मधील मंडाला परिसरामध्ये गुप्ता यांचे अधिकृत शिधावाटप दुकान आहे. या पत्रकारांच्या विरोधात २४ सप्टेंबर रोजी त्यांनी मानखुर्द पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार केली होती. त्यामध्ये पत्रकार खंडणी मागत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक गारे यांच्याकडे होती. दिनांक २९ सप्टेंबर रोजी पुन्हा गुप्ता यांना या पत्रकारांनी फोन करून पैशाची मागणी केली. त्याची माहिती मानखुर्द पोलिसांना गुप्ता यांनी दिली. पैसे देतो असे सांगून त्यांनी पत्रकारांना बोलावले. त्यावेळी पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात खंडणीचे पैसे स्वीकारताना या दोन्ही पत्रकारांना अटक करण्यात गारे आणि त्यांचे सहकारी  यशस्वी झाले.