औरंगाबादेत पुढारी खरंच सुरू होणार का ?

औरंगाबादहून लवकरच पुढारी सुरू होणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे.युनिट हेड म्हणून कल्याण पांडे जॉईन झालेले आहेत.परंतु खरंच औरंगाबादेत पुढारी सुरू होणार की ही चर्चा हवेत विरणार,हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
औरंगाबादेत पुढारी सुरू होणार असल्याची चर्चा गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे.गेल्या दहा वर्षात तीन वेळा प्रयोग फसलेला आहे.प्रत्येक वेळी माणसे भरती केली गेली आणि नंतर काढण्यात आली.त्यामुळे या चर्चेवर कोणाचाच विश्वास बसत नाही.पुढारी दिव्य मराठीच्या अगोदर सुरू झाला असता तर मोठी स्पर्धा झाली असती,परंतु ती वेळ आता निघून गेलेली आहे.
दिव्य मराठी सुरू होताना,लोकमत आणि सकाळपेक्षा दुप्पट पगार देवून कर्मचारी भरती करण्यात आले.त्यामुळे नंतर लोकमत आणि सकाळला नाईलाजस्तव पगारवाढ करावी लागली.तेवढी क्षमता पुढारीमध्ये नाही. पुढारीमध्ये लोकमत,सकाळ आणि दिव्य मराठीपेक्षा कमी पगारी आहेत.दुसरे असे की पुढारीत व्यवस्थापन नावाचा प्रकार नाही.आले मालकाच्या मना,तेथे कोणाचे चालेना,अशी अवस्था आहे.मालकाने अनेकांना तडकाफडकी कमी केल्याचे अनेक उदाहरणे आहेत.त्याचा अनुभव अनेकांना आहे.त्यामुळे औरंगाबादेत पुढारीला चांगले माणसे मिळतील की नाही,प्रश्नचिन्हच आहे.अगोदरच तीन वेळा प्रयोग फसल्यामुळे आणि पगार कमी असल्यामुळे अनुभवी कर्मचारी मिळणे पुढारीला अवघड आहे.नवी टीम घेवून पुढारीला काम भागवावे लागेल.इतर दैनिकाबरोबर स्पर्धा करणे अवघड जाणार आहे.
एकीकडे औरंगाबादेत पुढारी सुरू होणार असल्याची चर्चा असताना,लोकमतने कोल्हापूर,मुंबई आणि नाशिकमध्ये पुढारीची माणसे फोडण्याची व्यूहरचना सुरू केलेली आहे.कोल्हापुरात लोकमत आणि पुढारीमध्ये टोकाचे भांडण सध्या सुरू आहे.त्याचा वचपा काढण्यासाठी लोकमत पुढारीवर घाला घालण्यासाठी प्रयत्न करत आहे.त्यात लोकमतला कितपत यश येते,याकडे लक्ष वेधलेले आहे.