चांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये म्हणून..

हाराष्ट्रातील वयोवृध्द पत्रकारांना आम्ही पेन्शन का मागतो आहोत ? याचं कोडं ज्यांना पडलं असेल अशा शहाण्यांनी  ज्येष्ठ पत्रकार दिनू ऱणदिवे यांच्या घरी जाऊन त्यांची मुद्दाम भेट घेतली पाहिजे. दादरमधील घुमट हाऊसमध्ये गेली अनेक वर्षे ते वास्तव्य करून आहेत.आपल्या लेखणीच्या बळावर एकेकाळी महाराष्ट्र दणाणून सोडणारा, निधड्या छातीचा हा पत्रकार आज  एकाकीपणे जगतो आहे.90 वर्षाचे दिनू रणदिवे आणि 85 वर्षांच्या सविताताई  असा दोघांचा संसार दहा बाय दहाच्या दोन खोल्यात "बंदिस्त" झाला आहे.जगाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही.जगालाही त्यांच्याकडं ढुंकुन बघायला सवड नाही.त्यामुळं खिडकीतून भलेही दादरमधील गर्दीचा गोंगाट ऐकायला येत असेल पण या गोंगाटाशी आता या दाम्पत्याच काही देणे घेणे उरलेले नाही .घरात पाऊल ठेवताच या दाम्पत्याच्या एकाकीपणाची जशी जाणीव होते तशीच त्यांची आर्थिक स्थितीही समजून येते.अस्ताव्यस्त पडलेल्या पुस्तकांनी  आणि वर्तमानपत्रांनी घर खचाखच भरून गेलेय .दोन पलंग आहेत पण त्यावरही पेपर पडलेलं असल्यानं बसायलाही जागा नाही अशी स्थिती.कधी काळी महाराष्टानं या पत्रकाराला डोक्यावर घेतलं असावं याचं स्मरण करून देणार्‍या काही टॉफीज दिसतात पण त्याचंही मूल्य शून्य झाल्यानं त्याही धन्या सारख्याच एकाकी आणि धुळ खात पडलेल्या आहेत.   धिम्या गतीनं फिरणारा पंखा सोडला तर आधुनिक जगाला अत्यावश्यक  झालेल्या कोणत्याही वस्तू घरात दिसत नाहीत.आदरातिथ्यात मात्र कोणतीच टंचाई नाही.दाराची कडी वाजविल्यावर स्वतः रणदिवे दारात येतात.अंगावर पांढरा सदरा,सदर्‍याची  वरची बटणं उघडी,खाली विजार.दाढी वाढलेली आणि केस विस्कटलेले.चेहर्‍यावर विषण्णतेचे भाव.ओळख नेसल्याने आम्हाला पाहून कोण आपण ? असा प्रश्‍न त्यांच्या चेहर्‍यावर स्वाभाविकपणे उमटतो. मात्र बरोबर असलेल्या अभय मोकाशींना ते ओळखतात. मग थोडे सैल होतात.चेहर्‍यावरचे भावही बदलतात.थोडं हास्य उमलतं.आम्हाला मग आपलेपणानं आत घेतात. दोन खोल्यातच रस्ता काढत आम्ही त्यांच्या मागोमाग मग आतल्या खोलीत जातो.त्यांच्या समोर तिघेही नतमस्तक होतो. (अनेकजण भाषणात टाळी  मिळविण्यासाठी म्हणत असतात, "ज्यांच्या पायाला स्पर्श करावा असे पाय आता दिसत नाहीत" .दिनू रणदिवे यांच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं नाही).आम्ही आमची ओळख करून देतो.,सोबत नेलेला पुप्पगुच्छ त्यांना दिला.येण्याचं प्रयोजन थोडक्यात सांगितो.."मराठी पत्रकार परिषदेने आपणास जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरविलं असून आपण तो स्वीकारावा अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो आहोत" असं त्यांना किऱण नाईक सांगतात.त्यावर हा तत्वनिष्ठ माणूस म्हणत होता "कश्यासाठी हे सारं करताय.?" हे बोलताना उसणेपणा नाही.मी तृप्त आहे,कोणतीही आसक्ती नाही हे त्यांना यातून सूचवायचं असतं.पुरस्कारांसाठी लॉबिंग कऱणारे कुठे आणि कश्यासाठी करताय  हे सारं? असा आपलेपणाचा प्रश्‍न विचारणारे दिनू रणदिवे कुठे.पत्रकारितेत आजही अशी माणसं आहेत हे पाहून आम्हीही धन्य झालो."आपण महाराष्ट्रासाठी जे केलंय,जे भोगलंय त्यातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळं कृपया आपण नाही म्हणू नका" अशी वारंवार विनंती केल्यानंतर ते कसे तरी तयार होतात.
त्यानंतर मस्त तासभर गप्पा रंगतात. त्यांच्या मुखातून जे अनुभव बाहेर पडत होते ती आमच्यासाठी मेजवाणीच होती.किती बोलू आणि किती नाही अशी दिनू रणदिवेंची अवस्था झाली होती.एक जाणवलं त्यांच्या वयानं नव्वदी पार केलेली असली तरी त्यांची स्मरणशक्ती मात्र साबुद आहे.बारिक सारीक तपशीलही त्यांना बरोबर आठवतात.दिनू रणदिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात स्वतःला झोकून देत लेखणीच्या माध्यमातून मोठी जनजागृती केली होती.त्यावेळेस त्यांना अनेकदा अटक झाली,लाठ्या काठ्याही खाव्या लागल्या होत्या.तरीही अथकपणे त्याचीं लेखणी आग ओकत होती.संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेच्या माध्यमातून सरकारला सोलून काढण्याचं काम त्यांनी केलं .त्यांची रोख-ठोक भूमिका आणि महाराष्ट्राबद्दलचं निस्सीम प्रेम यामुळं संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेवर वाचकांच्या उडया पडायच्या.तेव्हा या पत्रिकेचा खप 50,000 एवढा होता.दिनू रणदिवे हाडाचे पत्रकार जसे होते तसेच ते हाडाचे कार्यकर्तेही होते."पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपलीच पाहिजे" असाही त्यांचा आग्रह होता.आहे .  ती जपताना प्रसंगी पत्रकारांनी रस्त्यावर उतरायचीही तयारी ठेवली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्यांनी आयुष्यभर प्राणपणाने जपली."रस्त्यावर उतरणं पत्रकारांचं काम नाही" असं म्हणणार्‍या आजच्या कातडीबचाव पत्रकारांनी दिनू रणदिवेंचं संघर्षमय आयुष्य पाहिलं पाहिजे."टेलिफोन पत्रकारिता"ही त्यांना मान्य नव्हती.घटनास्थळावर जाऊन घटना अनुभवून त्याचं वार्ताकन करणं त्यांना आवडायचं.त्यामुळं एखादा मोर्चा असेल,एखादं आंदोलन असेल किंवा संप, उपोषण असेल तर ते घटनास्थळावर जाऊन ते कव्हर करीत.सामान्य माणूस हा रणदिवे यांच्या पत्रकारितेचा आत्मा होता.सामांन्यांची दुःख पाहून ते व्यथित होत आणि त्यांच्या लेखणीतून त्यांच्या वेदना व्यक्त होत.त्याबाबतचा  एक किस्सा त्यांनी सांगितला.तो आजच्या मंडळींना फारसा महत्वाचा वाटणार नाही पण एका बातमीचा परिणाम ( आजच्या भाषेत इफेक्ट ) काय होऊ शकतो ते माहिती करून घेण्यासाठी तो किस्सा महत्वाचा आहे.  एका रात्री ड्युटी संपवून घरी जाण्यासाठी रणदिवे  ऑफीसमधून बाहेर पडले.  फुटपाथवर कुडकुडत पडलेले काही माणसं त्यांना दिसली..कडाक्याच्या थंडीमुळं त्यांची चाललेली तगमग त्यांनी पाहिली.त्यांच्यातला संवेदशील मनाचा पत्रकार मग जागा झाला आणि त्यांनी व्हीटी ते दादर पर्यत रात्रभर पायपीट करीत किती लोक अशा अवस्थेत रात्र काढत आहेत हे अनुभवलं.ही पायपीट चालू असताना अचानक एक कुत्रं आलं आणि त्यांनं रणदिवेंच्या पायाचा चावा घेतला.ते तसेच घरी आले,कुत्रा चावल्याचं पत्नीला कळल्यास ती काळजी करीत बसेल म्हणून त्यांना कुत्रं चावल्याचं  कळू नये म्हणून हातपाय न धुता किंवा कपडे न बदलता ते  तसेच झोपले.दुसर्‍या दिवशी त्यांच्या पत्नी शाळेत गेल्यानंतर ते डॉक्टरांकडे गेले तर जखम वाढलेली होती.त्रासही सुरू झाला होता.पण तशाही अवस्थेत रात्रीच्या अनुभवावर आधारित मोठी स्टोरी त्यानी तयार केली. ती दुसर्‍या दिवशी छापून आल्यावर  रस्त्यावर रात्र काढणार्‍यांना ब्लॅकेट देणार्‍यांची रीघ लागली. हा किस्सा  सांगतानाचा त्यांच्या चेहर्‍यावर आजही समाधान आणि आनंद जाणवत होता. दुसरा असाच किस्सा त्यांनी सांगितलां.ते म्हणाले,रात्रीच्या वेळेस प्रवास कऱणार्‍यांना पोलिस त्रास देत असत.त्याच्या तक्रारी येत पण डोळ्यांनी पहावं म्हणून मी एक रात्र  दादरच्या स्थानकावर  जागून काढली आणि डोळ्यांनी जे पाहिलं ते लोकांसमोर मांडलं.रणदिवे सांगतात,नंतर लोकांना होणारा त्रास बंद झाला.ऑन दि स्पॉट रिपोर्ट म्हणत कल्पनेच्या भरार्‍या त्यानी कधी मारल्या नाहीत.दिनू रणदिवेंची बातमी म्हणजे केवळ सत्य आणि सत्यच असायचं.त्यांच्या बातमीवर आणि कथनावर लोकांचा विश्‍वास असायचा. "रणदिवे म्हणजेच विश्‍वासार्हता " अशी तेव्हा त्यांची ख्याती होती.
आम्ही हे सारे किस्से मनलावून एकत असतानाच त्यांच्या वयोवृध्द पत्नी सविताताईंचा प्रश्‍न काय घेणार ? कॉफी,सरबत? खरं म्हणजे त्यांना कोणताही त्रास देण्याची आमची तयारीच  नव्हती.पण काही केल्या त्या ऐकनात.त्यामुळं आम्ही सरबत घेतलं.त्यानंतर बर्‍याच गप्पा झाल्या.गप्पा मारताना मनात एक प्रश्‍न सारखा घुटमळत  होता, एकाकीपणे हे दाम्पत्य जीवन कसं जगत असेल? .त्यावर रणदिवे  म्हणाले,डबा येतो.दुधही घरी येते.  पण भाजी, औषध आणायला मलाच जावं लागतं.त्यावेळचे त्यांचे चेहर्‍यावरचे भाव आमच्य ह्रदयाला विदीर्ण करून गेले.उत्पन्नाचं कोणतही साधन नसलेल्या रणदिवेंचं पैश्याचं कसं भागत असेल ? हा आणखी एक प्रश्‍न. पण तो प्रश्‍न विचारण्याचं धाडस झालं नाही.सामांन्यांसाठी आयुष्य झोकून दिलेल्या आणि आयुष्यभर निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेल्या रणदिवे यांना विस्मृतीआड लोटण्याचा कृतघ्नपणा खरं तर समाजानं करायला नको होता.परंतू तेवढा वेळ आता ना समाजाकडं आहे ना सरकारकडं.त्यामुळे असे अनेक रणदिवे महाराष्ट्रात जीवन कंठीत आहेत. अर्थात केवळ समाजाला दोष देत बसण्यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे ते आपण करू असा आम्ही निर्धार केला.त्यातून एक लाखाची थैली दिनू ऱणदिवे यांना अर्पण करून त्यांच्या कार्याबददल आपण कृतज्ञता व्यक्त करू असं आम्ही ठरविलं आहे. 3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीनं त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला जात आहे. त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा निधी त्यांना अर्पण करण्याची योजना आहे. मराठी पत्रकार परिषद 25 हजार रूपये देत आहे.नांदेडचे पत्रकार संजीव कुलकर्णी आणि प्रफुल्ल मारपकवार प्रत्येकी अकरा हजार रूपये देणार आहेत. आ.निलमताई गोर्‍हेही मदत करीत आहेत.उर्वरित रक्कम उभी करायची आहे. समाजासाठी आयुष्य झोकून देणार्‍यांना किंवा निष्ठेनं पत्रकारिता करणार्‍यांच्या मनात  हेच काय प्रामणिकपणाचं फळ असा प्रश्‍न उपस्थित होऊ नये,चांगुलपणावरचा लोकांचा विश्‍वास उडू नये यासाठीच हा सारा अट्टाहास.
सरकारची पत्रकार कल्याण निधी नावाची व्यवस्था आहे.या समितीनं ज्या पत्रकारांना मदत केली त्यांची यादी आणि नावं पाहिली तर कपाळाला हात लावण्याची वेळ येईल.समितीला दिनू रणदिवे दिसणार नाहीत  कारण त्यांच्याकडं अधिस्वीकृती नाही ना. नियम सांगतो अधिस्वीकृती नसणार्‍यांंना मदत देता येत नाही.म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांच्याकडे अधिस्वीकृती नाही असा हा भंपक मामला आहे.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीला माझी विनंती आहे की,भंपकपणाचे नियम  बदलावेत आणि दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकारांना मदत कऱण्यासाठी पुढं यावं.असं होईल का माहित नाही पण आपण मात्र रणदिवे यांच्यासाठी काही तरी करू...त्यासाठी आपलीही मदत आम्हाला हवी आहे..प्लीज..
दिनू रणदिवे यांच्यासारख्या किमान शंभर पत्रकारांची यादी माझ्याकडे आहे.ज्यांनी आयुष्यभऱ निष्ठेने पत्रकारिता केली मात्र आज त्यांची अवस्था दननीय झाली आहे.या वयोवृध्द तपोवृध्द आणि ऋुषीतुल्य पत्रकारांसाठी पेन्शन योजना तयार करावी अशी मागणी वीस वर्षांपासून आम्ही करीत आहोत.सरकार ढिम्म आहे."सरकारकडं पेन्शन मागणं म्हणजे सरकारकडं भीक मागणं" असं काही पत्रकारांना वाटतं.ज्यांची मुलं परदेशात आहेत आणि ज्याचंं सारं भागलंय त्यांना अशी पोपटपंची करायला काहीच जात नाही.ते असं बोलतात कारण त्यांनी दिनू रणदिवे यांची भेट घेतलेली नसते.त्यांनी थोडं आपल्या विश्‍वातून बाहेर यावं म्हणजे जगाचं वास्तव त्यांना कळेल.

 एस.एम.देशमुख