पत्रकाराची जात कोणती असते? वृत्तपत्राला जात असते का?

3 दिवसांपूर्वी मला जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या प्रतिष्ठित व्यक्तीचा, कायदेमंडळ सदस्याचा फोन आला होता... अचानक..! मला सेलिब्रिटीज, राजकारण्यांचं अप्रूप नाही की मी त्यांना भेटत-बोलत नाही!! कदाचित  मुंबईतील 8 वर्षात गावाकडले हे शेर साध्या कक्ष अधिकाऱ्यापुढे दलालीच्या फाईली घेवून लाचार उभे असलेले पाहिल्याचा परिणाम असावा!! कुणी विचारत नाही न ढुंकूनही पाहत नाही!! (काही सन्माननीय अपवाद) असो. या महोदयांनी इकडल्या-तिकडल्या गप्पा हाणल्या आणि मग सादरे प्रकरणी शोक व्यक्त केला. मग हे महोदय, मूळ मुद्द्यावर आले, "साहेब, तुम्ही इतकं जबरदस्त लिहिता यांव न त्यांव... तुमचं गाव कोणतं?" मला उद्देश् लक्षात आला. मी काही त्याला सांगितलं नाही. बनेल पठ्ठया पिच्छा सोडीना! म्हटला, "साहेब, सादरे तुमचे नातेवाईक होते का?" ... डोकंच भणाणलं...
मी म्हटलं, "अहो नात्याचा संबंध येतो कुठे?"
महोदयांचं सुरूच, "नाही, सादरेसाहेब अमुक-ढमुक 'जाती'चे होते; तुम्ही अमुक-ढमुक 'जाती'चे आहात का?"
काय बोलावं सुचेना, अवाक् झालो!! मुळात असल्या 'जाती'च्या चौकशा आयुष्यात कधीच कुणाच्या केलेल्या नव्हत्या न असल्या क्षुद्र, फालतू चौकशांना किंमत दिली होती!! सादरे कोणत्या 'जाती'चे असावेत, हा विचारही कधी मनाला शिवला नव्हता... साधारण आपल्या जिल्ह्यातील आडनावांच्या ढोबळ अनुमानानुसार अमुक-ढमुकवर्गीय असावेत, असाच समज झाला असता!!
एकीकडे त्या क्षुद्र विचारधारेच्या व्यक्तीवर संताप होत होता... दुसरीकडे म्हटलं, चला, या माणसाकडूनच 'जात'कारण समजून घेवूया!!
(उगाचंच यानिमित्ताने आता आठवलं, "दिव्य मराठी"त मला हा जातकारणाचा फटका मात्र बसला होता! "खांडेकर" -"दीक्षित" हे ब्राह्मण, त्यांना कानाखालचे सांगकामे हवे होते "पटवे"सारखे... "पटवे"महोदय हे अमळनेर तालुक्यातील पातोंडयाचे रंगारी! दिला असेल कुणी त्यांना पूर्वी त्रास!! मात्र विजय नवल पाटीलने ट्रॅक्टर एजन्सीत नोकरी दिली-सांभाळलं, रोहिदास पाटलांनी मदत केली हा मधला इतिहास विसरून पातोंडयातील लहानपणचा सूड़ विक्रांत पाटीलवर??)
मी म्हटलं, "जातीचा बराच अभ्यास दिसतोय साहेब आपला? तुम्ही कुठल्या जातीचे?"
महोदय म्हटले, अमुक-तमुक!
मी म्हटले, "आजवर कधी आपण बोललो नाही, भेटलो नाही आणि आज थेट 'जाती'ची चौकशी? काय विशेष?"
म्हटला, "सादरे प्रकरणात तुम्ही एकदम खतरनाक आणि पोटतिडकीने लिहीताय.. अगदी आतून शब्द उमटतात... जीव तीळ-तीळ तुटतो असे तुम्ही म्हणता त्या वेदना आणि तो संताप, तो धिक्कार शब्दातून अंगावर येतात, प्रकटतात!!"
मी - "साहेब, फार सुंदर मराठी हो आपलं! पत्रकार हवा होतात, चुकून राजकारणात गेला आणि आमचे बाळासाहेब (ठाकरे) नेहमी म्हणायचे राजकारण म्हणजे गजकर्ण... तुम्ही 'जात'कारण उकरून, ते खरेच हे सिद्ध केलंत हो!!"
समोरचे महोदय जरा चपापले... उसनं अवसान आणून म्हणाले, "कितीही गप्पा मारल्या जरी शेवटी 'जात' महत्त्वाचीच!!"
{{याच्या दुप्पट पोटतिडकीने 'घरकुल' प्रकरणात लिहीत होतो... तेव्हा हीच मंडळी किती खूष होती, याची आठवण देणे टाळले!!}}
मी - "ही सर्व तुम्ही राजकारणी लोकांनी केलेली घाण आहे... जेव्हा काहीच नसतं हाती तेव्हा 'जात' पुढे करायची...! तुमचं नेमकं काय काम आहे ते सांगा स्पष्ट, कशाला उगाच ही नुसतीच चर्चा.."
महोदय - "माझं काही काम नाही तसं, पण तुमचं लिखाण आवडतं म्हणून सहज आपलं..."
मी - "लिखाण आवडलं म्हणून डायरेक्ट 'जात' विचारायची?"
महोदय - "नाही! एकदम डेअरिंगबाज लिहीता तुम्ही... त्याच बातम्या होतात मग!! सगळीकडे फिरतं तुमचं लिखाण... एका अमुक-ढमुक 'जाती'च्या अधिकाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे..."
मी - "का हो, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही अधिकाऱ्याला 'जाती'चं लेबलं चिकटवायला, पत्रकाराची 'जात' विचारायला? तुमचं म्हणण काय नेमकं ते सांगा की आता माझे पेशन्स आणि चांगुलपणा दोन्ही संपत चाललंय... ठेवतो मी फोन!"
महोदय - "तुम्ही सांगता म्हणून सांगतो डायरेक्ट की हा 'आपला माणूस' असता तर एव्हढं केलं असतं का, अशी चर्चा आहे?"
मी - "व्वा, व्वा ... काय विचार आहेत साहेब आपले... आपल्यासारखे लोक बसले सगळीकडे की कल्याण होईल हो या देशाचे!! मला सांगा, 'तुमचा माणूस' म्हणजे कोण?"
महोदय - "पेपरवाले मॅनेज आहेत सर्व... NCP वाले आणि आमच्याच पक्षातील काही अमुक-ढमुक 'जाती'चे लोक करताहेत हे सर्व.. कुठल्या-कुठे संबंध जोडताहेत!!..."
मी - "मला खरंच आता कीव वाटते तुमची विचारशक्ती आणि बुद्धीची... कसे एव्हढ्या मोठ्या पदावर बसून तुम्ही इतका क्षुद्र विचार करू शकता? तुमचंच लॉजिक लावू चला .... सादरे कोण हे तुम्ही सांगितलंच ... त्यांना छळण्याचा आरोप असलेले कोणत्या जातीचे हेही सांगा? अहो ज्या NCPचं तुम्ही बोलताय त्यांचा जिल्ह्यातील एक माजी आमदार, जो नेहमी बोलतो त्यांचा 'सहयोग' कुणाला दिसतोय? आणि अजित पवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक... सर्वांच्या तोंडाला कुलूप लागलेय ना या प्रकरणात? कॉंग्रेसवाले संदीप पाटील, रवींद्र पाटील हे बोलताहेत काही? ते कोणाचे जातवाले? पारोळ्याचे चिमणराव पाटील, वसंत मोरे हे बोलताहेत काही??? ते कोणत्या जातीचे? ते सोडा... काही राजकीय पक्षातील पाटील-वाघ वैगेरे कुणी असतील 'जनसेवक'... ते कुठल्या जातीचे? ते बोलताहेत काही सादरेंसाठी? तुमच्याशी बोलायला सुद्धा मला आता लाज वाटतेय ... तुमच्या बुद्धीची तर कीव येतेच पण ज्यांनी तुम्हाला इथवर आणून पोहोचवलंय त्या समूहाचीही कीव येतेय ... कसा माणूस झेलणार ते आणखी पुढची काही वर्षे... चला बाय, ठेवतो ... पुन्हा कॉल करू नका आणि भेटूही नका कुठे!!"
या प्रकारानंतर विचार केला की, अशोक सादरे यांच्या मृत्यूपश्चात बदनामीशिवाय ही अशी क्षुद्र मनोवृत्तीची माणसे काही करूही शकत नाही.. काय असते जात एखाद्या पत्रकाराची, एखाद्या वृत्तपत्राची, असा विचार यानिमित्ताने डोक्यात आला. वृत्तपत्र मालकाला जात असते का? या क्षुद्र मनोवृतीच्या 'सो कॉल्ड' 'जनसेवकां'पेक्षा आमचा मालक कितीतरी वैचारिक पुढारलेला, माणूसपण जपलेला आणि प्रगल्भ असल्याचे नक्कीच अभिमानाने सांगता येईल!!
अशोक सादरे यांची जर "जात" पाहिली जात असेल तर त्या नालायकांना सांगावेसे वाटतेय, की सादरेंच्याच जातीचे नाही-नाही ते आरोप करताहेत... "पुण्यनगरी"च्या संपादकाची जात काय? तिथे तर सादरेंच्या समर्थनार्थ एक ओळ छापून आली तरी संपादकाला हीव भरेल, अशी स्थिती एकूण मजकुरावरून जाणवतेय... सादरे प्रकरणात "तरुण भारत"चे कव्हरेज पाहतच आहेत सर्व ... आजवर जितके "छापले" नसेल या प्रकरणात तितके सादरेंवर भंपक आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विशेष पुरवणीतून "छापले"य त्यांनी... मग "तरुण भारत"ची जात काय असावी? आणि "तरुण भारत" व इतरत्र "खास लोकाग्रहास्तव" आरोप करणारी पुरवणी तयार करणाऱ्याची जात काय असावी? 'दिव्य मराठी'ची  "घरकुल" प्रकरणात काय "जात" होती? आता सादरे प्रकरणात या पेपरची "जात" बदलली का? "लोकमत"ची "जात" आता सादरे प्रकरणात त्यांच्याशी जुळायला लागली का? मग VG पाटील हत्येप्रकरणी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रांची कोणती जात असावी? प्रतिभाताई देशाच्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा वृत्तपत्रांनी कोणती 'जात' धारण केली होती? BHR प्रकरणात काय 'जात' होती वृत्तपत्रांची? अरविंद खरात या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यावर 1010 नंबरचे ट्रक्टर घातले गेले, या प्रकरणात 'जनसेवक' दबाव आणत होते... तेव्हा वृत्तपत्रांची जात कोणती होती? या खरात प्रकरणात सारे रेतीचे महा'सागर' दडले आहे... त्यातले सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे CDR काढले तर कोण कोणत्या 'जात'कुळीचे आहे, हे सारे लक्षात येईल... 3 मे रोजींचा सर्व आरोपी तसेच नाव घेतले जातेय त्या सर्वांचा CDR तर तपासावाच; पण त्या दिवशीचे 8 किंवा त्याहून अधिक पेजेस नियमित प्रकाशित करणाऱ्या शहरातील सर्व मेनस्ट्रीम वृत्तपत्रातील सर्व क्राईम रिपोर्टर, फोटोग्राफर आणि संपादक यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड CDR जरूर तपासावेत... म्हणजे खरे 'दूध का दूध' आणि 'पानी का पानी' होईल. तेव्हा सर्वांच्या 'जात' समोर येतील. सादरे यांच्याजवळ कोण 'जाती'चे पत्रकार होते आणि किती जवळ होते आणि कशा-कशात सहभागी होते... हे सारे उघड होईल... पत्रकारच नव्हे तर जनसेवक आणि अधिकारी व सर्व लागेबांधेही उघड होतील ... कोण कुठे गायब आहे किंवा सादरे यांच्या आत्महत्येनंतर कोण, कोठे आणि किती दिवस होते, हेही तपासून पाहायला हवे...
'जनशक्ति'तील टीम पाहा - आढाव, अस्वार, चौधरी, गोसावी, वैद्य, इंगळे, जोशी, सुरवाडे, भालेराव, बडगुजर, लोखंडे, बेंडाळे, गायकवाड, गवळी, गुरव, मऱ्हे, अत्तरदे, भावसार, ठाकरे, म्हस्के, दुबे, पाटील, भदाणे ..... आता या 'जातीय'वादी बांडगुळाना म्हणावे करत बसा विश्लेषण!!! आणि एक सुद्ध 'माई का लाल' असेल तर त्याने त्याच्याकडे असलेल्या माणसांची यादी घेवून समोरासमोर चर्चेस यावे ... केव्हाही, खुले आव्हान!!
पत्रकार आणि वृत्तपत्रांच्या जातीचा असा वाह्यात विचार एखादा सडका माणूसच (प्यादं) करू शकतो. मात्र, हा सडका माणूस (प्यादं) जेव्हा हे सारे एक कोटीसाठी चाललेय, अशी अफवा पसरवतो कुजबूज आघाडीतून तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. एक कोटी....!!! लिहिताही येणार नाही धड, भोवळ येईल ऐकताच...! मग हे 'सादरें'साठी चाललेय, 'जाती'साठी चाललेय की 'कोटी'साठी? सडका विचार पसरवणारेच (प्यादे आणि त्याचा बादशहाही) कन्फ़्यूझ आहेत. मराठी पत्रकारिता यांनी एका 'नव्या उंचीवर', 'कोटी'वर नेवून ठेवलीय, याबद्दल आभार!! हे 'कोटी' देणार कोण? ज्यांनी दिवाळीत 'सोने' लुटलेय ते सादरेंच्याच 'जाती'चे दरोडेखोर की आजवर कधी स्वत:च्या खिशातून एक दमडी न काढून देणारा, फुकटच्या रेतीत ज्ञानालयाचे इमले चढविणारा अवलिया बादशहा? आणि हे 'पेड' करायचेच असेल तर ते झाड माझ्यासारख्या सामान्य पगारी नोकराच्या घरात कशाला उगवले जाईल.... मालकाकडेच 'मनी प्लांट' लावला जाईल ना ... मूर्ख लेकाचे!!! कधीकधी प्यादी बादशहाला गड्ड्यात घालतात ... अर्ध्या हळकुंडात पिवळी झालेली प्यादी.... अतिउत्साही अन नको तिथे नको तेव्हा 'निष्ठा'प्रदर्शनाला उतावीळ प्यादी... आता या प्याद्यांचे काय घ्यावे अन काय नाही ते बादशहाने विवेकाने ठरवावे... खरेतर, नागरिकशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे, की सर्व चाकर-नोकर आणि प्यादी ही कधीच एका जात-कुळीतली नकोत ... अन स्वत:च्या गोत्रातले तर कुणी 'इन सर्कल'मध्ये नकोच .... नाहीतर आपल्याच जात-गोत्राचा हा लवाजमा 'पालखी' कधी कुठे खड्ड्यात घालतो, ते कळतही नाही.... पालखीचे 'भोई' हे वेगळ्याच जात-गोत्राचे विश्वासू असावेत, हा जातकारण करणारयांना प्रामाणिक आणि नि:पक्ष सल्ला...!!
वृत्तपत्राला आणि पत्रकाराला जात नसते पण एखाद्याच्या मृत्यूतही जे हरामखोर धंदा आणि संधी शोधतात किंवा मला जो "जनसेवक" जात विचारू पाहत होता, यांची जात नक्कीच सांगता येईल... विकृत आणि हीन ही जात आहे यांची... लंपट, लोचट आणि मृताच्या मढयावरचे लोणी खाणारी ही निर्लज्ज जात आहे यांची ... नीतीमत्ता गुंडाळून ठेवलेली ही जात आहे यांची... यांना माणूस म्हणायचीही लाज वाटावी अशी माणुसकीच्या नावाला काळीमा फासणारी जात आहे यांची...
या धंद्यात असल्याची गेल्या 20-22 वर्षात प्रथमच इतकी लाज वाटतेय... कुणीतरी आदरस्थानी असलेलं, जवळचं, परिचयातलं ... असं सारं विवेकहीन, संवेदनाहीन आणि माणुसकीशून्य वाटणारं प्रत्यक्ष व्यवहारात उतरवतं तेव्हा या 'व्यवसाय'क्षेत्रात असल्याची लाज वाटते.... मुडद्याच्या जीवावर पोसली जाणारी गिधाडं झालो आहोत का आपण? व्यथित करणारा, मन सैर-भैर करणारा प्रश्न आहे .... ही माझी या गृपवरची शेवटची पोस्ट... हा ग्रुप सोडतोय आणि या 'सोशल मीडीया'चाही निरोप घेतोय ...पर्याय मिळालाच काही पोटा-पाण्याचा अन्य या वयात तर व्यथित करणाऱ्या या 'मुर्दाड' बनलेल्या पारंपरिक मीडियाचाही निरोप घेईन ... कुणी चुकून, कळत-नकळत दुखावले असेल तर कृपया माफ करावे ... कोणतीही पोस्ट ही व्यक्तिगत माझ्या स्वार्थासाठी नव्हती... केवळ एका चांगल्या अधिकाऱ्याला न्याय मिळावा, मरणोत्तर बदनामी कुणाची करण्यापेक्षा सन्मान राखला जावा, यासाठीच ही धडपड होती ... अपवाद वगळता, जळगावच्या मीडियाने एकदिलाने न्यायाची लढाई छेडली, हे कौतुक आहेच .... व्यवसाय करताना काही किमान तारतम्य, संकेत आणि नीतिमत्ता पाळली जावी, हे माणूसपणाचे लक्षण आहे .... व्यवसायाच्या, टार्गेटसच्या फालतू नादात किंवा त्या सबबीखाली इतरांची दिशाभूल करून एखाद्या जुन्या दोस्तीच्या कर्जातून उतराई होण्याच्या दडपणात अन वस्तुनिष्ठ सत्य जुमानायचेच नाही, या अट्टाहासापायी बेभान काही माणसं जर हैवान बनली असतील तर देव त्यांचं भलं करो ....
{{सोशल मीडिया या माध्यमाची जबरदस्त ताकद यानिमित्ताने पाहायला मिळाली; तुम्ही पारंपरिक प्रसिद्धीवर अंकुश आणू शकता, पार्सले गायब करू शकता, पण सत्य आणि विचार किंवा व्यक्त होणे नाही दडपू शकत!!}} 
【मेसेजेस नको असल्यास यूझर म्यूट किंवा ब्लॉक करावे किंवा विशिष्टच विषयावरील मेसेजेस हवे असल्यास रिप्लाय करावा】

- विक्रांत पाटील
कार्यकारी संपादक
जनशक्ति, जळगाव