वृत्तवाहिन्यांचा दर्जा केव्हा सुधारणार ?

हल्ली मराठी पकारितेत टिकून राहिलेले 'तडफदार, तथाकथिक पत्रकार' जगात सगळ्यात जास्त आपल्यालाच कसे समजते आणि माहीत आहे असा आव आणत असतात. त्याला हिंदी चैनेलवालेही अपवाद नाहीतच. त्यामुळे प्रत्येक बातमी देताना उगाचच किंचाळत, दुसऱ्याला प्रश्न विचारून स्वतःच उत्तर देत मांडताना ते दिसतात. एकाच स्टाईलचं म्हणजे हा-ही, जो-तो अशा शब्दांचा प्रत्येकवेळी आधार घेत साचेबद्ध लिहीणं-बोलणं यावरच त्यांचा भर असतो. कोणालाही आपण त्याला अपवाद असावा असे वाटत नाही. आजच्या पत्रकारितेची ती वैशिष्ट्यच मानावी लागतील. त्यामुळे बातम्यांच्या बाजारात उतरल्यावर आपल्या बुद्धीची कुवत जिथपर्यंत आहे, तेवढंच लोकांना पाहायला-वाचायला-ऐकायला आवडतं आणि त्यामुळे आम्ही तेवढंच दाखवित-छापत-बोलत राहणार असं त्यांचं म्हणणं.

      अलीकडील एका समारंभाच्या आणि एका घटनेच्या निमित्तानं हे सर्व पुन्हा एकवार जाणवलं. एक प्रसंग राजधानी दिल्लीजवळचा.दरवर्षी भारतीय हवाईदलाचा स्थापना दिवस ८ ऑक्टोबर रोजी साजरा होतो. जगातील चौथे सर्वांत मोठे हवाईदल असलेल्या भारतीय हवाईदलाने आजपर्यंत अनेक बाबतीतआपले कौशल्य पणाला लावून आपल्या क्षमतेला जन्मान्यता मिळवून घेतलेली आहे. हवाईदलाच्या या कर्तृत्वाचा आढावा हवाईदलाच्या निमित्ताने घेतला जातो आणि शहीदांची आठवणही काढली जाते. दरवर्षी या समारंभाचे थेट प्रसारण होत असते. माझ्या माहितीप्रमाणे मराठी वृत्तपत्रांच्या सर्वच कार्यालयांमध्ये आणि पत्रकारांच्या घरात टी.व्ही. संच आहेत. पण त्यांचा वापर ठराविक वृत्तवाहिन्या आणि त्यावर किंचाळत सादर केलेल्या बातम्या ऐकण्यासाठीच प्रामुख्याने होतो. असे समारंभ बघणे हे अशा धडाडीच्या पत्रकारांना बालिशपणाचे वाटत असावे. म्हणूनच फक्त संरक्षण मंत्रालयाचा कोर्स करायचा आणि आपल्या शहरात किंवा शहराजवळच्या लष्करीतळावर जाऊन विमानं, रणगाडे, युद्धनौकांवर आपले फोटो सेशन करून घ्यायचे यावर त्यांचा भर दिसतो.त्यामुळे यंदाच्या भारतीय हवाईदल दिनी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांच्या समारंभातील भाषणातील एकच मुद्दा किंवा या समारंभात जे ग्लॅमरस क्षण होते, तेवढ्यापुरतेच वृत्तांकन मराठी प्रसारमाध्यमांकडूनझाले. सचिन तेंडुलकरची उपस्थिती आणि हवाईदलात महिलांना लढाऊ विमाने उडविण्यासाठी परवानगी देण्याचे हवाईदल प्रमुखांचे वक्तव्य एवढ्याच बाबी काय त्या या पत्रकारांना समजण्यासारख्या होत्या.

      आता एक सामान्य नागरिक म्हणून मला काय वाटले किंवा अपेक्षित होते? भारतीय हवाईदलाच्या शक्तीची जगातील प्रमुख देश दखल घेत आहेत. सचिनची उपस्थिती आणि महिला वैमानिकांना लढाऊ विमान उडविण्याची परवानगी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या होत्याच, पण त्याबरोबरच हवाईदल प्रमुखांनी आपल्या भाषणात असे स्पष्ट केले होते की, भारतीय हवाईदल आता ‘व्यूहात्मक हवाईदल’ झाले आहे. अशा प्रकारे प्रथमच भारतीय हवाईदलाला ‘व्यूहात्मक हवाईदल’ म्हटले जाऊ लागले आहे.तसेच भारतीय हवाईदलाला आता आशिया-प्रशांत क्षेत्रातील घडामोडींवरही सतत लक्ष ठेवावे लागत आहे, असेही हवाईदल प्रमुखांनी त्यावेळी म्हटले होते. ही दोन्ही वक्तव्ये भारतीय हवाईदलाची कार्यक्षमतेची साक्ष देणारी होती. पण हे पत्रकारांना समजलेच नाही. त्यामुळे बातम्यांमध्ये त्यांचा उल्लेखही झाला नाही.

      त्याचबरोबर प्रेक्षकांच्या समोर उभ्या असलेल्या सुखोई विमानावर ब्रह्मोस बसविलेले होते. त्याचेही महत्त्व न समजल्यामुळे त्याबाबतही बातम्यांमध्ये समावेश झाला नाही.

      अन्य घटना म्हणजे सीरियातील 'इरा'च्यादहशतवादी केंद्रांवर रशियाने सुरू केलेले हल्ले ही आहे. एखाद-दुसऱ्या मराठी वृत्तपत्राचा अपवाद सोडल्यास अन्य मराठी प्रसारमाध्यमांची तर इकडे ढुंकूनही पाहिले नाही. सगळ्या जगाचे लक्ष त्या घटनाक्रमाकडे लागले असताना आमच्या या माध्यमांना दखल घेण्याइतकेही याचे महत्त्व वाटले नाही. आता यावर या पत्रकारांचे उत्तर तयार असेलच की, लोकांना काय पडलंय त्याचं, इकडं इतके बाकीचे महत्त्वाचे विषय आहेत इ.इ. पण मग इतकं असं असताना हे पत्रकार - मराठी माणसाला आवडत नाही, त्याला त्याचं काय पडलयं, आम्हीच कसे सर्वज्ञानी आणि हुशार आहोत असा दावा तरी का करतात माहीत नाही आम्हाला सामान्य वाचक-दर्शकांना.दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बातम्या दिल्याच तर त्या देताना अमेरिका आणि युरोपीय माध्यमांमधून जे प्रसारित होतं ते सगळं बरोबरच आहे, हे मानण्याचाही धोका ही माध्यमे उचलताना कायम दिसतात. कारण असे विषय समजण्याची क्षमता आजच्या मराठी पत्रकारितेत नाही हे खेदानं म्हणावं-पाहावं-अनुभवावं लागत आहे. सामान्य नागरिकांना जगात काय चाललयं ते जाणून घेण्याची असलेली इच्छा मी स्वतः पाहत आहे, पण मग हे पत्रकार मराठी माणसाला आवडत नाही असा दावा कशाच्या जोरावर करतात माहिती नाही. त्यांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये महत्त्व कोणत्या बातमीला तर अमेरिकेत म्हणे ५२ वर्षांच्या पुरुषाने केला २६ वर्षांच्या तरुणीशी विवाह. आता अमेरिकेतली बातमी म्हटल्यावर ती महत्त्वाची असणारच ना.

      सगळेच साचेबद्ध झाल्यामुळे वाचक-दर्शक कंटाळलेत. त्यामुळंच कितीही खटाटोप केला तरी वृत्तपत्र, वाहिन्यांच्या रिडरशीप आणि टीआरपीवर फारसा फरक पडत नाही आहे. पण ऐकेल कोण.


- एक सामान्य नागरिक