आकडे छापल्याबद्दल "पुढारी व तरुण भारत" वर गुन्हा

पणजी - गोव्यात चाललेल्या मटक्‍यावर बडगा उगारताना गोवा पोलिसांनी "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या दणक्‍याने मटक्‍याचे आकडे छापण्याचे वृत्तपत्रांचे कृत्य चव्हाट्यावर आले आहे. या वृत्तपत्रांसह काही मटका ऑपरेटर तसेच एक अनोळखी मंत्री, काही राजकारणी, पोलिस अधिकाऱ्यांवरही उच्च न्यायलयाच्या पणजी खंडपीठाच्या आदेशानुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु झाला असून संबंधित वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांकडेही चौकशी होईल असे या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वेश कर्पे यांनी सांगितले.
गोव्यात राजरोस मटका जुगार चालत असतानाही पोलीस कारवाई करीत नाहीत. राजकीय पाठबळ आणि हप्तेशाहीमुळे जुगारचालकांना भय उरलेले नाही. शिवाय, वृत्तपत्रांमधून मटक्याचे आकडे प्रसिद्ध होत असल्याने या जुगाराचा प्रसार वेगाने होण्यास हातभार लागत आहे. मटक्याच्या जुगारामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले असून, तरुणपिढीही यात ओढली जात आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी माहिती हक्क कार्यकर्ते आणि वीज खात्याचे कर्मचारी काशिनाथ शेट्ये (रा. रायबंदर-गोवा) यांनी उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात एप्रिल २0१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल केली होती.
या याचिकेची दखल घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. त्यानुसार ११00 मटका बुकी, 'कल्याण', मीलन, स्टार, आदी नावाने मटक्याचे रॅकेट चालविणारे गुजरातमधील मटकामालक, निनावी राजकारण्यांसह 'पुढारी' आणि 'तरुण भारत' या वृत्तपत्रांवर भा.दं.वि. कलम १0९, १२0 (बी), (३४), गोवा-दमण-दीव जुगार विरोधी कायदा कलम ३, ४, ११ (२) १२ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

 मटक्‍याच्या चक्रात अनेक संसार धुळीला मिळाल्याच्या घटना घडल्या आहेत. या संपूर्ण बेकायदा धंद्यावर पूर्ण नियंत्रण पोलीस ठेऊ शकलेले नाहीत त्याचबरोबर काही वृत्तपत्रे मटक्‍याचे आकडे प्रसिध्द करुन याचा प्रसारच करीत असतात. सामान्य, गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात माती कालवण्याचाच उद्योग मटक्‍याच्या प्रसारातून होतो. त्याविरोधात गोव्यात दाखल झालेल्या गुन्ह्याने मटका चालवणारे, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसोबतच मटक्‍याचे आकडे प्रसिध्द करणाऱ्या वृत्तपत्रांना चपराक बसली आहे. या दोन्ही वृत्तपत्रांनी मटक्‍याचे आकडे प्रसिध्द केल्याचा गुन्हा गोवा दमण दीव जुगार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार नोंद झाला आहे.

"पुढारी‘ आणि "तरुण भारत‘सह 1100 मटका बुकींच्या विरोधात पणजी पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. गुन्हा अन्वेषण शाखेने या दोन वृत्तपत्रांसह यात गुंतलेल्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मटका जुगार चालवणाऱ्या काहींची नावेही यात समाविष्ट आहेत. यामध्ये मिलन मटका ऑपरेटर गुजरात, कल्याण मटका ऑपरेटर गुजरात, गुजरातमधील मुख्य ऑपरेटर, स्टार ऑपरेटर गुजरात, तसेच बुधो उर्फ पारेख गोवा यांचा समावेश आहे. थिविम येथील किरण नावाच्या राजकीय नेत्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे.

गोव्यातील आरटीआय कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये, डॉ. केतन गोवेकर, संजय सरमळकर, रुई फेरेरा, सोनिया सातर्डेकर, डेस्मंड अल्वारेस यांनी गोव्यातील मटका जुगाराविरोधात पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाकडे धाव घेतली. या जनहित याचिकेत गेल्या दहा वर्षातील मटका जुगार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती दिली होती. गोव्यात राजरोस चालणाऱ्या मटक्‍यावर पोलिस कारवाई करत नाहीत, उलट राजकीय पाठबळ आणि हप्तेखोरीमुळे जुगाराला बळच मिळते वृत्तपत्रातून मटक्‍याचे आकडे प्रसिध्द होत असल्याने त्याचा वेगाने प्रसार होतो तसेच यात तरुण पिढीही ओढली जाते याकडे काशिनाथ शेट्ये व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेत लक्ष वेधण्यात आले होते. त्यांनी मटक्‍याचा व्यवहार कसा चालतो तसेच "पुढारी‘ व "तरुण भारत‘मधून आकडे कसे प्रसिध्द होतात याचीही माहिती दिली होती.

खंडपीठाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर याचिकेतील माहितीवर आधारीत गुन्हा दाखल करण्याचे तसेच त्यावर पुढील तपास करण्याचे आदेश दिले. दर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा प्रगती अहवाल न्यायालयास सादर करावा असेही आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा शाखेच्या रायबंदर-पणजी कार्यालयात गुन्हा नोंद झाला आहे. भादंवि कलम 109, 120 (बी), (34), गोवा-दमण- दीव जुगारप्रतिबंधक कायदा 1976 च्या कलम 3, 4,11 (2) 12 (1) (अ) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात गोव्यातील राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचाही उल्लेख असल्याने खळबळ उडाली आहे. तर "पुढारी‘ आणि "तरुण भारत‘ या वृत्तपत्रांवरही गुन्हा नोंद झाल्याने आकडे प्रसिध्द करण्याचे प्रकार चर्चेत आला आहे. यावर पोलिस पुढे काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक विश्‍वास कर्पे यांनी "पुढारी‘ व "तरुण भारत‘मध्ये छापलेल्या आकड्यांची माहिती घेण्यासाठी वृत्तपत्रांच्या व्यवस्थापनांस काही दिवसात बोलावण्यात येईल असे आज येथे सांगितले. या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या कागदपत्रांची पडताळणीही केली जाईल असेही त्यांनी सांगितले. जुगाराच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी पोलीसांचे पथक गुजरात तसेच मुंबईतही जाण्याची शक्‍यता आहे. पोलीसांनी गोव्यातील मटका बुकींकडेही चौकशी सुरु केली आहे. दिवसभरात सुमारे 100 बुकींकडे अशी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र पोलिस कारवाई करणार काय?
बेटिंग ही समजाला लागलेली कीड आहे. गरीबांचे घरदार उध्वस्त करणाऱ्या या बेकायदा धंद्याच्या विरोधात निर्णायक कारवाई होत नाही याला कंटाळूनच गोव्यातील माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यानी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने दखल घेतल्याने पोलीसांना "पुढारी‘, "तरुण भारत‘सह अनेकांवर गुन्हे दाखल करणे भाग पडले आहे. मटका जुगार गोव्यात आहे तसाच महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकातही राजरोस सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तरी गोव्यातील पोलिसांनी मटक्‍यावर हातोडा उगारला आहे. यातून महाराष्ट्राचे पोलिस काही शिकणार का? असा सवाल विचारला जात आहे. मटका आणि त्याचे आकडे प्रसिध्द करणे हा महाराष्ट्रातही सर्रास चालणारा प्रकार आहे. त्यावर पोलिसी बडगा उगारला जाणार का याकडे लक्ष असेल.

याप्रकरणात मटका जुगार माफिया आणि पोलिस राजकारणी यांच्यातील लागोबांधे तपासले जावेत तसेच "पुढारी‘ व "तरुण भारत‘मधील मटका आकड्यांची, ते पुरवणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. तपासकामात ढिलाई झाल्यास सीबीआयकडे तक्रार करु
- काशिनाथ शेट्ये (या प्रकरणातील याचिकाकर्ते)

गोव्यातील मटका जुगारावर पूर्ण बंदी आणावी. जी वृत्तपत्रे आणि राजकारणी या मटका जुगाराला प्रोत्साहन देतात त्यांचाही पर्दाफाश व्हायला हवा. राजकारणी, पोलीसांच्या आशिर्वादाशिवाय दिवसाढवळ्या आणि सर्रास मटका सुरु राहणे शक्‍य नाही.
- ऍड अजितसिंह राणे (गोवा राज्यप्रमुख, शिवसेना)

महाराष्ट्रात कायदेशीर मत घेणार - दीक्षित
बेटिंग ही समजाला लागलेली कीड आहे. गरिबांचे घरदार उद्‌ध्वस्त करणाऱ्या या बेकायदा धंद्याच्या विरोधात निर्णायक कारवाई होत नाही याला कंटाळूनच गोव्यातील काही कार्यकर्त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने दखल घेतल्याने पोलिसांना "पुढारी‘, "तरुण भारत‘सह अनेकांवर गुन्हे दाखल करणे भाग पडले आहे. मटका महाराष्ट्रातही सुरू आहे आणि येथेही काही वृत्तपत्रे आकडे छापतात गोव्यातील कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात कारवाई होणार काय याविषयी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भात कायदेशीर मत घेऊन निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.



यांच्यावर गुन्हे.. 
१. मीलन मटका ऑपरेटर, गुजरात
२. कल्याण मटका ऑपरेटर, गुजरात
३. मेन मटका ऑपरेटर, गुजरात
४. स्टार मटका ऑपरेटर, गुजरात
५. सुपर मटका ऑपरेटर, गुजरात
६. बुधो ऊर्फ पारेख, गोवा ७. थिवी-बार्देस येथील किरण नामक राजकीय व्यक्ती
८. ११00 मटका बुकी
९. दैनिक तरुण भारत
१0. दैनिक पुढारी