राम तू 'अबोल' का ?

राम खटके जिल्हा प्रतिनिधी असताना दैनिक यशवंतच्या वर्धापनदिनाचा क्षण.मुख्य संपादक प्रा.मोतीपवळे यांना शुभेच्छा देताना मी.यावेळी राम आणि बाजूला ओमप्रकाश मोतीपवळे दिसत आहेत.
राम खटके साडेतीन वर्षापुर्वी दिव्य मराठीत उस्मानाबाद सिटी रिपोर्टर म्हणून ज्वाईन झाला.त्यापुर्वी तो लातूरहून प्रकाशित होणा-या दैनिक यशवंतचा उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी होता.यशवंतचे संपादक ओमप्रकाश मोतीपवळे हे माझे खास मित्र.मी लातूरला १९९० मध्ये एम.ए.करत असताना,दैनिक यशवंतमध्ये वृत्तसंपादक होतो.मोतीपवळे घराण्याशी माझे कौटुंबिक संबंध.माझ्या शिफारशीनुसारच राम यशवंतमध्ये ज्वाईन झाला होता.
रामची आर्थिक परिस्थिती मी जाणून होतो.त्यामुळे त्याला शक्य तितकी मदत करत होतो.नळदुर्गमध्ये दरवर्षी भरणा-या श्री खंडोबा यात्रेचा विशेषांक काढण्यास मी त्यास मदत करत होतो.त्यामुळे रामला जाहिरातीच्या माध्यमातून काही रक्कम मिळत होती.नोकरी करत तो पत्रकारितेची डिग्री पुर्ण करत होता.यशवंतचे ऑफीस जनता बँकेसमोरील नगर परिषदेच्या गाळ्यात आहे.तेथील इंटरनेट कनेक्शन ब-याच वेळा बंद असे.त्यामुळे रामला मी हक्काचा माणूस वाटत असे.त्यामुळे तो रात्रीचे एक वाजले तरी घरी येत असे आणि गुरू तुम्हाला त्रास देतो,एवढे पेज ईमेल करा,असे म्हणत असे.कधी झोपलेला असलो तरी डोळे चोळत 
त्यास हाक ऐकूण उठत असे आणि पान पाठवत असे,पण कधीच नकार दिला नाही.
मी त्याच्या ऑफीसमध्ये दिवसातून एकदा तरी जात असे आणि तासभर बसत असे.नाही गेलो तर त्याचा नक्कीच फोन येत असे,गुरू आज का आला नाहीत,म्हणून विचारत असे.किमान आजची विशेष बातमी काय,म्हणून विचारत असे.यशवंतमध्ये त्यास मानधन कमी होते पण मान जास्त होता.
पण तो जसा दिव्यमध्ये लागला तसे त्याचे येणे कमी झाले आणि बोलणेही कमी झाले.सकाळी साडेदहा वाजता तो ऑफीसला जात असे आणि रात्री ११ वाजेपर्यंत तो काम करत असे.कधी वाटेत भेटला तरी पाच मिनीटाच्या आत निघत असे.गुरू गरबडीत आहे,नंतर बोलू असे म्हणत असे.कधी पत्रकार परिषदेत भेटला तरी मोजकेच बोलत असे.
रोज तासन्तास बोलणारा राम असे मोजकेच बोलत असल्याचे पाहून मला कधी कधी वाईट वाटत असे.पण त्याला कसले तरी टेन्शन आहे,याची जाणीव मला झाली होती.तो मलाच नाही तर सर्व जवळच्या मित्रांबरोबर असेच वागत असे.तो पुर्वीप्रमाणे मनमोकळे का बोलत नाही,याची कारणे मला समजली होती.परंतु मी आताही त्याचा उहापोह करणार नाही.पण परिस्थितीमुळे तो गांजून गेला होता,हे नक्की होते.रोज बारा तास काम करणा-या रामबरोबर दिव्य प्रशासन कोडगेपणाने वागत आहे.त्याचा वेगळा पंचनामा केलेला आहे.
राम हा सभ्य, सरळ आणि साधा तरूण. काळाने त्याच्यावर मोठा आघात केला आहे.जसा तो अबोल झाला आहे,तेव्हापासून जीवाची घालमेल सुरू आहे.गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामवर कोसळलेले हे संकट माझ्यासह अनेक मित्रांवर आघात आहे.देवाने त्याच्यावर कृपादृष्टी ठेवून त्यास ठणठणीत बरे करावे,हीच प्रार्थना.

संपादक
उस्मानाबाद Live
www.osmanabadlive.com