'एबीपी माझा'वरील चर्चा पत्रकारांच्या डोळ्यात अंजन घालणारी...

एबीपी माझावर मंगळवारी रात्री ९ वाजता माझा विशेषमध्ये लोकमतवर झालेला हल्ला आणि त्यानंतर माध्यमं दुटप्पी झाली आहेत का ? ही चर्चा रंगली होती.त्यात ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत,पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख,जळगावच्या दैनिक जनशक्तीचे संपादक विक्रांत पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे हे सहभागी झाले होते.लोकमतचे समुह संपादक दिनकर रायकर यांनाही चर्चेसाठी निमत्रित करण्यात आले होते,परंतु ते जाणीवपुर्वक आले नाहीत.
लोकमतच्या मंथन पुरवणीमध्ये एका लेखात ग्राफिक डिझाईनमध्ये अनावधाने चूक झाली आणि त्यानंतर एका विशिष्ठ समुदायाने लोकमतच्या जळगाव,नांदेड,खामगावसह अनेक कार्यालयावर हल्ले केले,लोकमतच्या विरूध्द ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले.त्याच दिवशी लोकमतने माफी मागितली.त्यानंतरही दुस-या दिवशी अंकातही माफी मागितली तरी लोकमतच्या अंकाची ठिकठिकाणी होळी करण्यात आली.
या हल्लाबाबत काही अपवाद वगळता कोणत्याच वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या नाहीत.खुद्द लोकमतनेही यासंदर्भात बातम्या दिल्या नाहीत.बेरक्याने मात्र तातडीने बातमी दिली होती.या घटनेचा पत्रकार संघटनांनी साधा निषेध केला नाही.हा विषय घेवून ही चर्चा रंगली होती.
भारतकुमार राऊत यांच्या मते लोकमतने माफी मागायची की नाही,हा त्यांचा प्रश्न आहे पण ग्राफिक डिझाईन करणा-या कर्मचा-यावर नाहक कारवाई करण्यात आली,हे दुर्देव आहे.निखिल वागळे यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्लाबाबत लोकमत आक्रमक होते,आता का गप्प बसले,असेही ते म्हणाले.
विक्रांत पाटील यांच्या मते,लोकमतने माफी मागण्यास घाई केली.जो समाज शांत आहे,तेथे माध्यमे आक्रमक आणि जो समाज अशांत तेथे माध्यमे शांत असतात.माध्यमे सोयीनुसार भूमिका घेतात.मालकांचा धंदेवाईकपणा आडवा येत आहे.
एस.एम.देशमुख यांच्या मते लोकमतवरील हल्लाचा पत्रकार हल्ला कृती समितीने निषेध केला पण तो आक्रमकरित्या झाला नाही,हे कबूल केले.
अभय देशपांडे यांच्या मते हल्लेखोर कोण आहेत,हे पाहून निषेध केला जातो आणि वृत्तपत्रातील व्यावसायिक स्पर्शा आणि असुया त्यास कारणीभूत असल्याचे म्हणाले.
एकंदरीत चर्चा साधक बाधक झाली.लोकमतचा प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही,हे दुर्देव...
लोकमतनेच स्वत: शेपूट घातले तर इतरांनी काय करावे...हा मुद्दा बरोबर असला तरी म्हातारी मेल्याचं दु:ख नाही,काळ सोकावतोय,हे नक्की....
अनावधाने झालेल्या चुकीबद्दल थेट माध्यमावर हल्ले करण्याचे सत्र घातकच...आता पत्रकारांनी संघटीत होण्याची गरज...
पण कोणाच्या नेतृत्वाखाली संघटीत व्हायचे हा इगो पॉर्इंट आलाच...