४२० महेश मोतेवारला तीन दिवसांची पोलीस कोठडी

उमरगा - लोकांचे जीवन समृध्द करतो म्हणून स्वत:चे जीवन समृध्द करणा-या ४२० महेश मोतेवारला उमरगा कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान सीबीआयने मोतेवारच्या समृध्द जीवन या चिटफंड कंपनीच्या ५८ कार्यालयावर छापे मारून झाडाझडती सुरू केली आहे.त्याचबरोबर पुण्यातील मुख्य कार्यालय सिल केले आहे.दरम्यान,मोतेवारच्या अटकेमुळे गुंतवणुकदारांत खळबळ उडाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्यात उमरगा कोर्टाच्या आदेशानुसार महेश मोतेवारवर सन २०१२ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.येणेगूरच्या रेवते अ‍ॅग्रो प्रा.लि.ही दुध डेअरी महेश मोतेवारने ८० लाखास विकत घेली होती,परंतु त्यामुळे तिघांची फसवणूक झाली होती.फसवणूक झालेल्या तिघांनी उमरगा कोर्टात रेवते आणि महेश मोतेवारवर दावा दाखल केला होता,त्यानंतर उमरगा कोर्टाच्या आदेशानुसार महेश मोतेवारवर भादंवि ४२० सह अनेक कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता,परंतु मोतेवारला फरार घोषित करण्यात आले होते.तो गेल्या दोन वर्षात एकदाही कोर्टात हजर झाला नाही.
हे प्रकरण मिडियाने उचलून धरले होते.त्यानंतर उस्मानाबादच्या दौ-यावर आलेल्या गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी मोतेवारच्या अटकेचे संकेत दिले होते.त्यानंतर मोतेवार यास सोमवारी उस्मानाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीसांनी पुण्यात अटक करून उस्मानाबादला आणले आणि नंतर मुरूम पोलीसांच्या हवाली केले होते.सोमवारची रात्र मोतेवारनी मुरूम पोलीस ठाण्यात काढली होती.
मोतेवार यास मंगळवारी उमरगा कोर्टात हजर करण्यात आले असता,न्यायाधिश एच.आर.पाटील यांनी ३१ डिसेंबरपर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दुध डेअरी खरेदी करण्यासाठी मोतेवार यांनी ८० लाख रूपये कुठून आणले तसेच त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याने पुढील तपासासाठी पोलीसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती.त्याचबरोबर सीबीआयने आजच मोतेवारच्या कंपनीवर धाडी मारल्याचे न्यायाधिशांना सांगण्यात आले.एकंदरीत परिस्थिती पाहून कोर्टाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.यावेळी कोर्टात पोलीस अधीक्षक अभिषक त्रिमुखे हे जातीने हजर होते,हे विशेष.

काय आहे प्रकरण ?

उमरगा तालुक्यातील येणेगूर येथील शिवचंद्र रेवते, सरोज रेवते पुणे येथील प्रमोद पुजार यांनी येणेगूर येथे रेवते अॅग्रो प्रा.लि. हा डेअरी प्लॅन्ट चालू केला होता. यामध्ये भागीदारी करून घेण्यासाठी तात्यासाहेब शिवगोंडा पाटील, रामगोंडा उर्फ बाळासाहेब शिवगोंडा पाटील संजय शिवगोंडा पाटील (रा. नागाव ता.वाळवा जि.सांगली) यांच्याकडून डिसेंबर २००४ ते जुलै २००५ दरम्यान २७ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम घेतली. भागीदारीचा करारही करण्यात आला.त्यानंतर संजय पाटील यांची भागीदारी रद्द करून त्यांना लाख रुपये परत देण्यात आले. परंतु, वरील तीन आरोपींनी पाटील बंधुंचा रेवते अॅग्रोमध्ये हिस्सा असताना सदरील कंपनी समृद्ध जीवनचे महेश माेतेवार यांच्याबरोबर विक्रीचा करार करून तसेच नोटरीही केली. हा संपूर्ण व्यवहार इतर भागीदार पाटील बंधू यांच्या परस्परच झाल्याने त्यांनी या व्यवहारास आक्षेप घेऊन उमरगा न्यायालयात दावा दाखल केला. यामध्ये मोतेवार याला सदरील कंपनीचे इतर तीन जन भागीदार असल्याची माहिती असूनही त्यांनी हा व्यवहार केल्याने त्यांनाही यामध्ये आरोपी क्र. करण्यात आले. त्यावेळी रेवते दांम्पत्य पुजाराने अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला मुरूम पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले होते. परंतु, महेश मोतेवार फरारच असल्याने याची पोलिस दप्तरी नोंद झाली होती. चार दिवसांपूर्वी याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा समोर आणल्यानंतर हालचाली होऊन चारच दिवसात माेतेवारला पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिष खेडकर, उपनिरीक्षक भास्कर पुल्ली कर्मचाऱ्यांया पथकाने ताब्यात घेऊन उस्मानाबादला आणले.