उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची मुजोरी,गुन्हा दाखल

उस्मानाबाद  - मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि उस्मानाबाद लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना अश्लिल शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणा-या राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत डोके यांच्याविरूध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.दरम्यान,या शिविगाळ आणि धमकीचा महाराष्ट्रातील पत्रकारांनी एकजुटीने निषेध आणि धिक्कार केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून डोके यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर यांना नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी अवैध बांधकाम प्रकरणी अपात्र ठरवले होते.त्यानंतर उस्मानाबादच्या जिल्हाधिका-यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर केली.त्यानंतर राजेनिंबाळकर हे औरंगाबाद खंडपीठात गेले असता,उस्मानाबाद नगराध्यक्षपद निवडणुकीला औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली.त्यामुळे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदु राजेनिंबाळकर यांना दिलासा मिळाला.यावर आधारीत सुनील ढेपे यांनी गोफणगुंडा 
'गोफणगुंडा' लिहिला होता.(सुनील ढेपे यांचे गोफणगुंडा हे सदर असून,ते उस्मानाबाद जिल्ह्यात लोकप्रिय आहे.)
हा गोफणगुंडा वाचून राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत डोके यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पत्रकार सुनील ढेपे यांना फोन केला आणि अत्यंत खालच्या पातळीवर अश्लिल शिविगाळ केली,तसेच यापुढे लिखाण केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.त्याची ऑडियो क्लीप रेकॉर्ड करण्यात आलेली आहे.
संपत डोके यांच्या या शिविगाळ आणि धमकी प्रकरणी पोलीस अधीक्षकांना तातडीने व्हॉटस् एॅपवरून क्लीप पाठवण्यात आली आणि ई-मेल करून लेखी तक्रारही करण्यात आली.त्यानंतर सायंकाळी संपत डोके यांच्याविरूध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात भादंवि ५०४ आणि ५०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान,मंगळवारी दिवसभर महाराष्ट्रातील अनेक व्हॉटस् एॅप गु्रप आणि फेसबुकवर पत्रकार सुनील ढेपे यांना शिविगाळ करणा-या राष्ट्रवादीचे नगरसेवक संपत डोके यांचा निषेध आणि धिक्कार करण्यात आला.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने निवेदन पाठवून डोके यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पत्रकार सुनील ढेपे यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिविगाळ करणा-या संपत डोके यांच्यावर राष्ट्रवादी काय कारवाई करणार,याकडे लक्ष वेधले आहे.