बाळासाहेब भापकर यांना अटक

मुंबई- गुंतवणुकदारांच्या असंख्य तक्रारीनंतर अखेर चिटफंड घोटाळ्याप्रकरणी साईप्रसाद प्रॉपर्टी लिमिटेडचे सर्वेसर्वा बाळासाहेब भापकर यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणातील  आणखी पाच जण फरार आहेत.
सेबीच्या तक्रारीनंतर भापकर यांना अटक करण्याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. साईप्रसाद ग्रुप कंपनीच्या सहा राज्यातील कार्यालयावर काल छापेमारी झाली. याशिवाय १५ बँकातील १९२ अकाऊंट सील करण्यात आलेत. साईप्रसाद कंपनीविरोधात देशभर पाच गुन्हे दाखल आहेत.
साई प्रसाद ग्रुपच्या कंपनीनं अनेक गुंतवणुकदारांना गंडा घातल्याचा आरोप आहे. वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आमिष दाखवलं. याशिवाय जमिनी देण्याचा दावाही कंपनीनं केला. मात्र लोकांना मोबदला काही मिळाला नाही. त्यामुळे सेबीनं चौकशी केली आणि ही कारवाई करण्यात आली आहे.
भापकर यांच्या पत्नीला यापूर्वीच चिंचवड येथून छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. वंदना भापकर असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. तेव्हापासून बाळासाहेब भापकर व मुलगा शंशाक भापकर हे दोघे फरार होते. त्यापैकी बाळासाहेब भापकर यांना आज अटक करण्यात आली असून, मुलगा शशांक अद्याप फरार आहे.