पत्रकार आणि राजकारणी यांनी समाजहितासाठी एकत्र यावे - उद्धव ठाकरे

ठाणे  - ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांनी समाजासाठी केवळ लेखणी चालविली नाही तर संयुक्त महाराष्ट्रासारख्या चळवळीत अग्रणी म्हणून मोलाची भूमिका बजावली. आपल्या तरुणपणी रणदिवे यांनी केलेल्या कार्याचा आदर्श आजच्या पत्रकारांनी ठेवला पाहिजे तसेच पत्रकार आणि राजकीय नेत्यांनी समाज हितासाठी वेगवेगळ्या भूमिका न मांडता एकत्र येऊन समाजोद्धाराची नवी सुरुवात केली पाहिजे असे आवाहन सामनाचे संपादक आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले. 
मराठी पत्रकार परिषद, ठाणे शहर दैनिक व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आज दिनू रणदिवे यांना सपत्नीक येथील गडकरी रंगायतन येथे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी श्री ठाकरे बोलत होते.  याप्रसंगी राज्यातील अन्य ज्येष्ठ पत्रकारांचा देखील  विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात दुष्काळ आणि माध्यमांची भूमिका या विषयावर परिसंवादही पार पडला. या कार्यक्रमास मुंबई व ठाणे, कल्याण तसेच राज्यातील इतर भागातूनही मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते  
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घातला. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, पत्रकारांनी विधायक टीका जरूर करावी मात्र हे करतांना रणदिवेंसारख्या पत्रकारांचा आदर्शही घ्यावा. पत्रकार असो किंवा कुणीही, सर्वांनी आपल्या मर्यादा सांभाळून काम केल्यास प्रश्न उद्भवणार नाहीत. आपल्या लहानपणापासून घरात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वातावरण होते तो प्रभाव आजही माझ्यावर कायम असून पुढील पिढीलाही या चळवळीचा इतिहास कळावा म्हणून मुंबईला संयुक्त महाराष्ट्राचे दालन उभारले आहे. या दालनात दिनू रणदिवे यांचे लिखाण आणि त्यांचे अनुभवही संग्राह्य ठेवले जातील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र तोडण्याची भाषा करु नका!

मराठी माणसाला आपली राजधानी मिळवायला मोठा संघर्ष करावा लागला. असंख्य हुतात्म्यांनी बलिदान दिले. तो संघर्ष बघितल्यानंतर महाराष्ट्र तोडण्याची भाषा ऐकायला येते तेव्हा हृदय पिळवटून जाते. अरे, कशासाठी हे सारं? सोन्यासारखा हा आपला महाराष्ट्र आहे. आपण सारे एकत्र आहोत. मराठी माणसांनी रक्ताचं पाणी करून मुंबई मिळवलीय. विदर्भाचा विकास करायचा तो जरूर करा. मात्र कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र तोडण्याची भाषा करू नका, नाहीतर पुढच्या अनेक पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले.
गडकरी रंगायतन येथे पत्रकार दिनाचा शानदार सोहळा आज आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर चळवळीत स्वत: भाग घेतलेले ९१ वर्षांचे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे हे उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मानचिन्ह व ९१ हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष सत्कार करण्यात आला. रणदिवे यांच्या कार्याचा गौरव करीत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माझ्या रक्तात भिनलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे हे या चळवळीचे शिल्पकार, तर शिवसेनाप्रमुखांनी आपल्या ओजस्वी व्यंगचित्रातून हा लढा आणखीनच पेटवला. दुर्दैवाने या लढ्याबद्दल आस्था असलेली ही कदाचित माझी शेवटची पिढी असेल, पण या धगधगत्या इतिहासाचा वारसा जपण्याची नितांत गरज आहे.
पंचम जॉर्जला मुंबई जशी आंदण म्हणून मिळाली तशी मराठी माणसाला मिळालेली नाही. दिनू रणदिवे यांनी त्या काळात संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेमधून शब्दांचे फटकारे ओढले. रणदिवे हे केवळ कॉमेंटेटर नव्हे तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील खंदे शिलेदार होते. त्यांनी स्वत: त्यात भाग घेतला. मोरारजी देसाई, स. का. पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर त्यावेळी अत्याचार केला. १०६ नव्हे तर त्याहूनही अधिक हुतात्मे झाले असे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, लालबाग, परळ, दादर हा तर धुमसता निखारा होता. गिरणी कामगार या लढ्यात उतरला नसता तर संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झालाच नसता. हा तेजस्वी इतिहास गाठीशी असतानाही महाराष्ट्र तोडण्याची भाषा काहीजण करतात तेव्हा संताप होतो. राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री हे विदर्भातील आहेत. एवढेच काय, पण मोठी खातीही विदर्भाच्याच वाट्याला. त्यामुळे विदर्भाचा विकास जसा करायचा असेल तसा करा. जिथे कमी पडत असेल तिथे शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहील. मात्र महाराष्ट्र तोडण्याची भाषा तुम्ही करू नका अशा शब्दांत त्यांनी कानपिचक्या दिल्या.
रणदिवे यांचा आदर्श ठेवा
पत्रकार व राजकारणी याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपली सडेतोड मते मांडली. ते म्हणाले, पत्रकार व राजकारणी यांनी एकमेकांच्या सीमा पाळाव्यात. राजकारण्यांच्यादेखील चुका होत असतात. अशावेळी तुम्ही जरूर टीका करा, पण अन्यायाने मारू नका. काहीही असले तरी पत्रकारांवर कोणत्याही परिस्थितीत हल्ले होता कामा नयेत. पत्रकारदेखील समाजाचा महत्त्वाचा घटक असून त्यांनी दिनू रणदिवे यांसारख्या ज्येष्ठ पत्रकारांचा आदर्श ठेवायला हवा. वृत्तपत्र म्हणजे एक तेज आहे, पण हातात शस्त्र आहे म्हणून त्याचा वापर करू नका. कोणालाही रक्तबंबाळ करण्यात अर्थ नाही. वृत्तपत्रांनी आपल्या ताकदीचा उपयोग समाज, राज्य व देशासाठी करावा. पत्रकार व राजकारणी यांनी देशाच्या विकासासाठी एकत्र काम करणे आवश्यक असून सगळ्यांना एकाच दिशेने जायचे आहे. मग वेगवेगळ्या वाटा कशासाठी? पत्रकार व राजकारणी चांगल्या कामासाठी एकत्र येऊन चांगली सुरुवात होणार असेल तर शिवसेना एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे. हा एकोपा असाच राहिला तर ‘अच्छे दिन’ नाही पण ‘चांगले दिवस’ नक्कीच येतील असे सांगताच उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला


महाराष्ट्र तोडण्याची भाषा करु नका!
दिनू रणदिवे यांना सन्मानापोटी देण्यात आलेली ९१ हजारांची रक्कम थेट त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात येत असून त्याचे कारण सांगतांना निवेदक मिलिंद भागवत म्हणाले की, आपल्याला पुरस्कार आणि सन्मान म्हणून मिळालेल्या रक्कमा समाजातील पिडीत आणि गरजूंना देऊन टाकण्याची रणदिवे यांनी जुनी सवय आहे. ही रक्कम देखील ते कुणाला तरी देऊन टाकतील म्हणून थेट त्यांच्या बॅंकेत ती जमा करण्याचा निर्णय पत्रकार संघाने घेतला.

शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांनी लढण्याचं बळ दिलं – दिनू रणदिवे
वयाच्या ९१ व्या वर्षीदेखील ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा तोच कणखर बाणा व तोच भारदस्त आवाज आजही पत्रकार दिनाच्या निमित्ताने उपस्थित पत्रकार व ठाणेकरांना अनुभवण्यास मिळाला. रणदिवे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर रणदिवे यांनी त्यास उत्तर देताना आपली मते ठामपणे मांडली. प्रबोधनकार व शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी त्यांनी जागवल्या. ते म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी मी व अशोक पडबिद्री यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे साप्ताहिक काढले होते. २४ तासांत तयारी केली. या अंकामध्ये चांगले कार्टून हवे होते. त्यासाठी मी पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी गेलो. त्यांना अंकाची माहिती दिली व त्यात तुमचे व्यंगचित्र हवे अशी विनंती केली. बाळासाहेबांनीही त्यास कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. पहिल्या अंकापासून आम्ही त्यांचे व्यंगचित्र ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिके’त छापले. त्याचा परिणाम असा झाला की, आमच्या पत्रिकेचा खप ५० हजारांवर गेला. मात्र आठवा अंक प्रकाशित होताच प्रबोधनकारांना अटक झाली. न्यायमूर्ती तेंडुलकर यांनी अशा वृद्ध माणसाला पकडून तुम्ही का आणले, असा संतप्त सवाल सरकारला केला व त्यांची सुटका झाली. शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांमध्ये एवढी जबरदस्त ताकद होती की त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला खर्‍या अर्थाने लढण्याचे बळ मिळाले. दर आठवड्याला त्यांचे व्यंगचित्र पत्रिकेत छापून यायचे. मात्र त्यांनी एक पैसाही कधी घेतला नाही, असे रणदिवे यांनी सांगितले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मला अटक झाली तेव्हा काही वेळ मी ठाण्याच्याच तुरुंगात होतो अशी माहिती त्यांनी दिली. सध्याच्या पत्रकारांनी व तरुणांनी समाजासाठी काहीतरी योगदान द्यावे असे आवाहनदेखील त्यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांनी सांगितले की वृत्तपत्रांचे स्वरूप बदलत असून आता संपादकांच्या वरती प्रोडक्ट मेनेजर आले असून ते सर्व काही ठरवीत आहेत. त्यांना देखील वृत्तपत्रांचे आणि पत्रकारितेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. आज संपादकांना वाचकाने काय वाचले पाहिजे ते ठरविण्याचा अधिकार उरला नसून विश्वासार्हता वाढविण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
प्रारंभी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आपल्या भाषणात ज्येष्ठ पत्रकारांसाठी इतर काही राज्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायदा प्रत्यक्षात अस्तित्वात यावा यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा केली. आपल्या प्रास्ताविकात अध्यक्ष संजय पितळे यांनी ठाणे पत्रकार  संघाच्या उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी पत्रकार राहुल लोंढे यांनी लिहिलेल्या “ दुष्काळाच्या झळा” या पुस्तकाचेही उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दैनिक वृत्तानंदचे संपादक मधुकर मुळक यांनी याप्रसंगी दुष्काळग्रस्तांसाठीचा मदतीचा धनादेशही सुपूर्द केला तर सकाळचे पुरस्कारप्राप्त पत्रकार तुषार खरात यांनी देखील त्यांच्या पुरस्काराच्या रकमेत ५ हजार रुपयांची भर घालत ही रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी देत असल्याचे जाहीर केले.

पत्रकारांचा सन्मान
पत्रकार दिनाच्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये चंद्रमोहन पुपाला( दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार),श्री.अरूण खोरे (आचार्य अत्रे पुरस्कार )श्री.मोरेश्‍वर बडगे( गं.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार ) कमलेश सुतार ( पा.वा.गाडगीळ पुरस्कार )श्रीमती प्रणाली कापसे ( सावित्रीबाई फुले पुरस्कार) तुषार खरात( स्व.प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार ),सुनील ढेपे ( नागोरावजी दुधगावकर पुरस्कार ) वसंतराव कुलकर्णी ( भगवंतराव इंगळे स्मृती पुरस्कार ) विकास महाडिक ( दत्ताजीराव तटकरे स्मृती पुरस्कार ) आणि ठाणे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हयातील ज्येष्ठ पत्रकारास दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार सुधीर कोर्‍हाळे यांना देण्यात आला. तर उत्कृष्ट जिल्हा पत्रकार संघासाठी दिला जाणारा रंगाण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार भंडारा जिल्हयास दिला गेला.
या कार्यक्रमास खा. डॉ श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, ठाण्याचे महापौर श्री. संजय मोरे, भिवंडीचे महापौर तुषार चौधरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी विकास काटे, तुषार राजे,  राहुल लोंढे, नारायण शेट्टी, श्रीकांत खाडे, मिलिंद लिमये, कपिल राऊत, दिलीप शिंदे,विकास महाडिक , दीपक शेलार, सिराज बेग, श्रीराम भिडे यांनी  प्रयत्न केले.