मुंबई- माझी व्यंगचित्रे आजपर्यंत माझ्यापर्यंतच
सीमित राहिली. आता लवकरच ती व्यंगचित्रं तुमच्यासमोर येतील असे सांगत राज
ठाकरे यांनी 'मराठा' वृत्तपत्र सुरु करण्याचे संकेत दिले. आपल्याला माहित
असेलच की राज ठाकरेंच्या मनसेने साहित्यिक, संपादक प्र. के. अत्रे यांनी
सुरु केलेल्या 'मराठा' वृत्तपत्राचे हक्क नुकतेच घेतले आहेत. या
वृत्तपत्राचे पुनरूज्जीवन करण्याचे संकेत राज यांनी मुंबईतील रूईया
कॉलेजमध्ये एका परिसंवादादरम्यान आज दिले.
मुंबईतील रूईया महाविद्यालयातील पत्रकारिता विभागातील विद्यार्थ्यांशी
राज ठाकरे यांनी आज संवाद साधला. त्यावेळी राज यांनी विविध मुद्यांवर परखड
भाष्य केले. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, वेब मिडिया ते सोशल मिडिया आदींवर
मतं मांडताना माध्यमांतील बदलांचा व येत असलेल्या नव नव्या आव्हानांची
माहिती दिली.
राज म्हणाले, तंत्रज्ञान रोज बदलत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रावर
त्याचा चांगला-वाईट परिणाम होत आहे. माध्यमांत तर फार मोठे बदल झाले आहेत,
होत आहेत. वर्तमानपत्राची स्थिती बिकट बनत चालली आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियात
फार लोकांची गरज नाहीये. तेथून लोक कमी केले जात आहेत. सतत बदलत राहणा-या
माध्यमांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे व आपल्याला
तंत्रज्ञानाप्रमाणे अपडेट केले पाहिजे असा सल्ला राज यांनी विद्यार्थ्यांना
दिला.
यावेळी विद्यार्थ्यांनी राज यांनी काही प्रश्न विचारले. त्याची सडेतोड
उत्तरे राज यांनी दिली. हिंदुत्त्ववादाबाबत तुमचा स्टॅड काय आहे? असा सवाल
विचारला असता राज म्हणाले, मी हिंदु आहे. मी काही धर्मांतर केलेले नाही.
त्यामुळे हिंदुत्त्वासाठी उभा राहणारच असे सांगत मुस्लिम संघटना रझा
अॅकॉडमीने जेव्हा मुंबईत मोर्चा काढला होता तेव्हा सर्वप्रथम माझ्या
पक्षाने व मी विरोध केला होता. त्या त्या वेळी मी माझी भूमिका स्पष्ट केली
आहे असे राज यांनी सांगितले.
तुमच्या पक्षाच्या झेंड्यात हिरवा कशाचे प्रतिक आहे असा सवाल एका
विद्यार्थ्यांने विचारल्यानंतर राज म्हणाले, हिरवा रंग खरं तर
सकारात्मकतेचे प्रतिक आहे. मात्र मी माझ्या पहिल्याच भाषणात सांगितलं होतं
की हा हिरवा रंग मुसलमानांसाठी आहे. पण जे मुसलमान भारताचा विचार करतात
त्यांच्यासाठीच तो हिरवा वापरला आहे असे सांगण्यास राज विसरले नाहीत. तुमची
व्यंगचित्र जनतेपर्यंत पोहचली नाहीत ती तुमच्यापर्यंत सीमित राहिली असे
विचारले असता राज म्हणाले, होय हे खरं आहे. पण लवकरच माझी व्यंगचित्र एका
माध्यमातून तुमच्यासमोर येतील असे सांगत मनसेने कायदेशीर हक्क घेतलेल्या
'मराठा'चे पुनरूज्जीवन करणार असल्याचे संकेत दिले.