मराठी सेवा विभागाचे उद्घाटन

पुणे -  ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून पत्रकारिता करणे हि आजची गरज असून, भारतीय वृत्त संस्थेच्या मराठी सेवा विभागाची स्थापना ही एक नवसर्जन असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि पत्रकार अभय टिळक यांनी व्यक्त केले.
भारतीय वृत्त संस्थेच्या मराठी सेवा विभागाचे उद्घाटन कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक संजय तांबट आणि कायदेतज्ञ असीम सरोदे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने संचालक ज्ञानेश्वर राउत, निलेश खरमरे, ओंकार दीक्षित उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या वतीने मुकुल पोतदार यांनी संस्थेची भूमिका मांडताना सांगितले कि, सध्या ग्रामीण आणि महत्वाच्या आंतराष्ट्रीय विषयांवर खूपच कमी प्रमाणावर वार्तांकन होत असल्याचे चित्र आहे. यामुळे मुख्य प्रसारमाध्यमांपर्यंत ग्रामीण भारतातील स्थानिक आणि आंतराष्ट्रीय घडामोडींसह इतर सर्व महत्वाच्या बातम्या पोहचवण्याचे काम संस्था करणार आहे. 
भारतीय वृत्त संस्थेची स्थापना दि. १ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्यात करण्यात आली असून, संस्थेच्या मराठी वृत्त सेवा विभागाचे उद्घाटन युवा दिनाचे औचित्य साधून दि. १२ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. संस्था लवकरच दृक श्राव्य मध्यम सेवा देखील सुरु करणार आहे. आंतराष्ट्रीय विषयांवर वार्तांकनासाठी संस्था काही परदेशातील संस्थाशी भागीदारी करार करत आहे.   

संपादकीय निवेदन  
श्रमिक पञकारीतेच्या क्षेञामध्ये गेली काही वर्ष नोकरी करताना विविध अनुभव आले. त्यामुळे कुठेतरी ही भावना निर्माण झाली किहीतरी वेगळे करावे. पण नेमके काय ? 

त्यामुळे हा प्रयोग सुरु करण्यापूर्वी आम्ही केलेल्या अभ्यासामध्ये हे जाणवले कि, जगभरामध्ये अविकसित व ग्रामीण भागाचे तुलनेने खूपच कमी वार्तांकन केले जाते. त्यामुळे स्वाभाविकच ग्रामीण भाग मुख्य प्रवाहापासून दूर राहतो. म्हणून मग वृत्तसंस्था स्थापन करून प्रामुख्याने ग्रामीण व कृषी अर्थव्यवस्था या विषयावर विशेष भर देऊन काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. असे असले तरी एक वृत्तसंस्था म्हणून अभिप्रेत असलेल्या इतर महत्वाच्या विषयांवर ही संस्था काम करत आहे.    

बर मग हा विचार व्यक्त केल्यानंतर पहिला प्रतिसाद असा कि, हे कशासाठी ? नवीन प्रयोग, मग गुंतवणूक किती आहे ? मालक कोण ?, आधीच आहेत ना मोठमोठ्या संस्था, इ. हे सगळे खरे आहे. त्याजोडीला इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. मग या सगळ्या प्रश्नाचं काय ?

ही वस्तुस्तिथी आहे कि, आज वर्तमान पत्र व्यवसायासमोर अनेक प्रश्न आहेत. मात्र या जीवघेण्या स्पर्धेच्या पत्रकारितेत श्रमिक पत्रकारांचे आयुष्य नेमके कुठल्या पातळीवर आले आहे, हा प्रश्न देखील आहेच. 

असो. आम्ही हा प्रयोग स्वबळावर स्वतंत्रपणे करत आहोत. आम्ही आर्थिक दृष्ट्या नक्कीच बलाढ्य नाही. पण कुठल्याही प्रसार माध्यम संस्थेची सर्वात मोठी ताकद ही विश्वासार्हता, सर्वसामावेशक-परिपूर्ण-तठस्थ वार्तांकन असते. भारतीय वृत्त संस्था देखील याच निकषांवर काम करून शिखर गाठेल. हे काम करताना आमच्याकडून चुका होऊ शकतात, मात्र आमच्या भूमिकेमध्ये सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करतो.