डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्रकाराचा मृत्यू


- गंभीर जखमी असूनही उपचार झाला नाही
- मेयो रुग्णालयातील संतापजनक प्रकार
नागपूर : अपघातानंतर उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टर व संबंधित परिचारिकांनी वेळेवर योग्यरित्या उपचार न केल्यामुळे एका तरुण, तडफदार पत्रकाराचा आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. हा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे घडला. गंभीर रुग्णाला वेळेवर आणि योग्य उपचार रुग्णालयात मिळणार नसतील तर देवाचा दर्जा असलेल्या डॉक्टरांचा उपयोग काय] असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
चंद्रशेखर गिरडकर (४३) रा. पारशिवनी असे या मृतक प्रत्रकाराचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या काम आटोपून गावाकडे परत जात असताना पंचशील चौकात एका भरधाव टँकरने गिरडकर यांच्या दुचाकीस धडक दिली. यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारासाठी तत्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या उजव्या पायाला जबर मार लागला होता. दरम्यान त्यांचे पाय व छातीचे एक्स-रेही काढण्यात आले. यात त्यांच्या पायाचे हाड मोडल्याचे स्पष्ट झाले, तर छातीतील हड्डीला किरकोळ मार असल्याचे सांगण्यात आले. अधिक उपचारार्थ त्यांना कॅज्युअल्टीत दाखल करण्यात आले. यावेळी गिरडकर यांनी छातीतही दुखत असल्याचे डॉक्टरांना सांगितले. परंतु, याकडे डॉक्टरांनी लक्षच दिले नाही. पोटाच्या खाली मार लागल्याने रक्त जमा झाले होते. मात्र, याकडेही डॉक्टरांनी दुर्लक्ष केले.
डॉक्टरांकडून वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला. दरम्यान, त्यांची प्रकृती बिघडली. घाबरलेल्या डॉक्टरांनी कृत्रिम श्वासोच्छवास लावला. परंतु, प्रकृती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच डॉक्टरांनी त्यांना अतिदक्षता विभागात हलविले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अखेर आज पहाटेच्या सुमारास गिरडकर यांची प्राणज्योत मालवली.
उपचारावरून दोन डॉक्टरांमध्ये बाचाबाची!
गिरडकर यांना मध्यरात्री उपचारार्थ दाखल केले असता त्यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) उपस्थित नव्हते. गिरडकर यांच्यावर निवासी डॉक्टरांनीच उपचार केला. दरम्यान, आॅर्थोचे डॉक्टर आले आणि पाहणी करून निघून गेले. नंतर ‘सीएमओ’ आले. ‘सीएमओ’ने विचारणा केली असता आॅर्थोच्या डॉक्टरांनी आपले काम केल्याचे सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर अतिदक्षता विभागात रुग्णास हलविल्यात आले. परंतु, हाताबाहेर रुग्ण गेल्यावर अतिदक्षता विभागातील महिला डॉक्टर चांगल्याच भडकल्या. मात्र, आॅर्थोच्या डॉक्टरांनी मी आपले काम केले असून, सीएमओना विचारा, असे सांगत हात झटकले. दोन डॉक्टरांमध्ये झालेल्या बाचाबाचीतील वेळ उपचारात खर्च झाला असता तर कदाचित गिरडकर वाचले असते, असे बोलले जात आहे. याशिवाय कॅज्युअल्टीमधील परिचारिकांनीही उपचारात मदत केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मेयोत धागासुद्धा नाही; दुर्देवी स्थिती
उपचारासाठी फक्त कापूस व सलाईनच पुरविण्यात आली. जखमेवर ंटाके लावण्यासाठी मेयोत धागासुद्धा नव्हता. टाके लावण्यासाठी धागा बाहेरून आणण्यास भाग पाडले. मेयोत टाके लावण्यासाठी धागासुद्धा असू नये, अशी दुर्देवी परिस्थिती रुग्णालयात आहे. मृत्यूस जबाबदार डॉक्टरांची चौकशी करून कारवाईची मागणी केली जात आहे.