माकपच्या ठेकेदार चौधरीचा पत्रकारावर प्राणघातक हल्ला

नाशिक - आपल्या भ्रष्टाचाराचे बिंग फोडले म्हणून चवताळलेल्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य आणि ठेकेदार सुभाष चौधरी याने आज "सकाळ'चे उंबरदे येथील बातमीदार हिरामण चौधरी व त्यांच्या भावावर लोखंडी पहारीने प्राणघातक हल्ला केला. यात हिरामण यांना मुकामार लागला असून, त्यांचे भाऊ माधव गंभीर जखमी झाले आहेत. पैशांच्या गुर्मीत वागणारा ठेकेदार चौधरी हाच तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असल्याने त्याच्या दबावात येऊन सुरगाणा ठाणेदार सुरेश पारधी यांनी या प्रकरणी फिर्यादही दाखल करून घेतली नाही. 
सुरगाणा तालुक्‍यातील उंबरदे येथील बातमीदार हिरामण चौधरी यांनी पळसनचा जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी ग्रामविकासाच्या विविध कामांचे कंत्राट स्वतः घेऊन निकृष्ट कामे करतो आणि त्याच्या नावावर बिले काढतो, अशा बातम्या देऊन सत्य उजेडात आणले आहे. यामुळे बावचळून गेलेल्या सुभाष चौधरीने बातमीदाराचा मानसिक छळ केला. घरात भांडणे लावली. एवढे करूनही आपल्या भानगडीच्या बातम्या बंद होत नसल्याचे पाहून आज सुभाषने उंबरदे गावात आपल्या टोळक्‍यासह जाऊन बातमीदार आणि त्याच्या भावावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. सकाळी साडेनऊच्या सुमारास बातमीदार हिरामण यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्यावर त्यांना वाचवायला आलेल्या मोठ्या भावावर बोलेरो गाडीतून लोखंडी टॉमीने डोक्‍यावर प्रहार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माधव यांना सोडून हल्लेखोर सुभाष चौधरी साथीदारांसह पळून गेला. 
चिंतामण गोविंदा पवार, मनोहर जाधव, हेमराज भोये, खंडू गवळी यांचाही या हल्ल्यात समावेश होता. जखमींना तत्काळ सुरगाणा आरोग्य केंद्रात नेल्यावर ठाणेदार सुरेश पारधी यांनी ठेकेदार चौधरीच्या दबावात फिर्याद घेण्यास नकार दिला. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या सर्व कामांची कंत्राटे घेऊन अनेक कामे कागदावर पूर्ण करणारा त्यातून गब्बर झालेला सुभाष हाच तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष असून, दर आठवड्याला पोलिसांना ओली पार्टी देणाऱ्या सुभाषचा एवढा दबदबा आहे, की फिर्याद घेऊन येणाऱ्याला हा मुजोर पोलिसांसमक्ष मारहाणही करतो, असे बोलले जाते. दरम्यान, जखमी माधव मंगळू चौधरीच्या डोक्‍यातून रक्तस्राव झाल्याने त्यांना सायंकाळी नाशिकला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
या घटनेची पत्रकार संघटना आणि "सकाळ'ने गंभीर दाखल घेतल्याने रात्री उशिरा हिरामण यांच्या वडिलांच्या जबाबावरून ठेकेदार चौधरी विरुद्ध सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गुंजाळ यांना या प्रकरणी लक्ष घालून चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
------------
"सकाळ'चे बातमीदार हिरामण चौधरी यांना भावासह झालेल्या मारहाणीची तत्काळ दखल घेतली असून, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन गुंजाळ यांना लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचा दोष आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 
- संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक