एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध

'बातम्यांसाठी पत्रकारांना पाकिटं द्यावी लागतात' हे एकनाथ खडसे यांचे वक्तव्य धक्कादायक,आणि तमाम पत्रकारांची बदनामी करणारे असल्याने त्याचा एकमुखानं धिक्कार झाला पाहिजे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद या वक्तव्याचा निषेध करीत आहे.एकनाथ खडसें कोणत्या पत्रकारांना पाकिटं दिली?कोणत्या पत्रकारांनी त्यांना ती मागितली? त्या  पत्रकारांचा नामोल्लेख न करता हवेत वार केल्याने त्यांचे वक्तव्य तमाम पत्रकारांची बदनामी करणारे ठरते.एकजात सर्वच पत्रकारांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून समाजमन त्यांच्याबद्दल कलुषित कऱण्याचा एकनाथ खडसे यांना कोणताही अधिकार नाही.त्यामुळे त्यांनी ज्या पत्रकारांना बातम्यांसाठी पाकिटं दिली अशा पत्रकारांची नावे जाहीर करावीत किंवा आपले वक्तव्य मागे घेत पत्रकारांची माफी मागावी अशी मागणीही पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने केली आहे.काल जळगाव येथे एका मासिकाचे प्रकाशन करताना एकनाथ खडसे यांनी बातम्यांसाठी पत्रकारांना पाकिटं द्यावी लागतात ती आपणही दिल्याचा आरोप केला आहे.या संबंधीच्या बातम्या आज बहुतेक दैनिकांनी ठळकपणे दिल्या आहेत.