‘मैत्रेय’ ग्रुपच्या वर्षा सत्पाळकरांना कोठडी

राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘मैत्रेय’ ग्रुपच्या मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक वर्षा सत्पाळकर (४३, रा़ विरार, ठाणे) व जनार्दन परुळेकर (रा़ पालघर) यांच्यावर सरकारवाडा पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे़ त्यापैकी सत्पाळकर यांना मुंबईहून अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता ८ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान या अटकेविरोधात मैत्रेयच्या एजंटांनी जिल्हा न्यायालयात गोंधळ घातला होता़.

मैत्रेय गु्रपमधील गुंतवणूकदार भारत शंकरराव जाधव (संभाजी चौक, जाधववाडी ) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मैत्रेय कंपनीचे संचालक वर्षा मधुसूदन सत्पाळकर (४३, रा़ विरार, ठाणे) व जनार्दन अरविंद परुळेकर (रा़ पालघर) यांनी सप्टेंबर २०११ पासून गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे जास्त रकमेचे व परताव्याचे आमिष दाखवून ३ लाख ५९ हजार ७४० रुपयांची गुंतवणूक करून घेतली़ तसेच मुदत संपल्यानंतरही गुंतवणुकीची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम परत न करता तिचा अपहार केला़.
‘मैत्रेय’च्या राज्यभरात १०७ शाखा असून लाखो गुंतवणूकदारांनी विविध योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ दरम्यान, कंपनीने मुदत संपलेल्या काही गुंतवणूकदारांना धनादेश दिले असून ते न वटता परत येत आहेत़ या कारणावरून होलाराम कॉलनीतील ‘मैत्रेय’च्या कार्यालयात मंगळवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास गुंतवणूकदारांनी गोंधळ घालून फलकाची तोडफोडही केली होती़ रिअल इस्टेटमधील मंदीमुळे गुंतवणूकदारांची रक्कम देण्यास उशीर होत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते़.
नाशिक पोलीसांनी गुरुवारी मुंबई येथून सत्पाळकर यांना अटक केली़ त्यांना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ दरम्यान, सत्पाळकर यांना अटक केल्याच्या निषेधार्थ मैत्रेयह्णच्या एजंटांनी जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ घालून तीव्र घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले़ तसेच काही एजंटांनी माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की व मारहाण केल्यामुळे तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़.