भामट्या राज गायकवाडविरूध्द अखेर राज्यात पहिला गुन्हा दाखल

पंढरपूर - शेळी पालनच्या नावाखाली राज्यातील आणि शेजारील कर्नाटक राज्यातील अनेक गोरगरीब लोकांना गंडा घालणारा जागृती अ‍ॅग्रो फुडस्चा भामटा राज गायकवाडविरूध्द अखेर राज्यात गुन्हे दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यात राज गायकवाडसह पाच जणांविरूध्द बुधवारी रात्री ११ वाजता फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
शेळी पालन उद्योग दाखवून पाच हजार ते १० लाख भरा आणि वर्षभरात दामदुप्पट घ्या,असे आमिष दाखवून जागृती अ‍ॅग्रो फुडस् या चिटफंड कंपनीने राज्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गोरगरीब जनतेची फसवणूक केलेली आहे.या कंपनीचा मालक राज गायकवाड असून,पत्नी जाई गायकवाड,भाऊ भास्कर गायकवाड,सलिम खंडायत आदी संचालक आहेत.
वर्षेभरानंतर जेव्हा दुप्पट रक्कम मिळाली नाही,तेव्हा कर्नाटक राज्यात ७ पोलीस ठाण्यात २७ गुन्हे दाखल झालेले आहेत.राज्यात अनेक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत,परंतु गुन्हे दाखल झालेले नव्हते.पहिला गुन्हा करकंब पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री ११ वाजता दाखल झालेला आहे.राज गायकवाडसह पाच जणांना आरोपी करण्यात आलेले आहे.भादंवि ४२०,४०६,४६७,४६८,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.त्यापैकी तीन जणांना पोलीसांनी अटक केल्याचे सांगण्यात येतेय.
जागृती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यालय सांगली येथे आहे.तेथे रोज पैसे भरण्यासाठी लोकांची गर्दी होत असे.दीपावलीमध्ये बीदर पोलीसांनी राज गायकवाड यास अटक केली होती.साडेचार ते पाच महिने हा भामटा जेलची हवा खावून जामिनावर बाहेर आलेला आहे.जेलमधून सुटका झाल्यानंतर आपण पोलीसांना कसे मॅनेज केले,आपले लागेबांधे कसे आहेत,असे हा भामटा सांगत सुटला होता.
याच भामट्याने काळे धंदे लपवण्यासाठी जानेवारी २०१५ मध्ये नवजागृती चॅनल काढले होते,मात्र सहा महिन्यातच चॅनल बंद करून,कर्मचा-यांचा तीन महिन्याचा पगार बुडवला होता.त्याविरूध्द येरवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल आहे,परंतु पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
करकंब पोलीसांच्या कारवाईनंतर आता तरी राज्यातील पोलीस राज गायकवाड आणि कंपनीविरूध्द गुन्हा दाखल करून बेड्या ठोकणार का,याकडे लक्ष वेधले आहे.




संपूर्ण बातमी वाचा