कोल्हापूरच्या पत्रकारितेत ‘कास्टिंग काऊच’, मॅडम’च्या भानगडीने गाजतेय ऊह… आह… आऊच…

कोल्हापूरचा "मानबिंदू" डागाळला; 
"वसंत" ऋतूपूर्वीच पत्रकारितेतील कास्टिंग काऊच उघडकीस!!

कोल्हापूर  – एरवी दुसर्‍यांच्या भानगडी बाहेर काढून त्यावर उपदेशाचे डोस देणार्‍यांमध्ये सर्वांत आघाडीवर असल्याचे मिरविणार्‍या पत्रकारितेला राजर्षी छत्रपती शाहूंच्या पुरोगामी नगरीत व्यभिचाराचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. दीड दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत एक वलय लाभलेल्या ‘राजा’वर एका ‘मॅडम’ने गेल्या आठवड्यात चक्क बलात्काराची केलेली तक्रार व झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे एकीकडे सर्वत्र खळबळ उडाली आहे; तर दुसरीकडे ‘पत्रकारितेत आम्ही बाप माणूस आहोत. आमच्याविरोधात कोण छापणार,’ अशा अविर्भावात असलेल्या आणि आजवर ‘स्वच्छ प्रतिमा’ म्हणून मिरविणार्‍यांच्या विकृत चेहर्‍यांचीही चर्चा यानिमित्ताने रंगू लागली आहे.
पत्रकारितेतील भावी पिढीला योग्य मार्गदर्शन करून आदर्श समाज घडविण्याऐवजी नको तेथे फुलणारा ‘वसंत’ या ऋतूतील स्वयंघोषित विद्वान ‘बीसी’ आणि मराठीतल्या ‘बीबीसी’च्या ‘असल्या’ चाळ्यांमुळे त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या पत्रकारितेवर कसा ‘विश्‍वास’ ठेवायचा? असा प्रश्‍न प्रामाणिक पत्रकारांसह सर्वसामान्य कोल्हापूरकरांना पडला आहे. यामध्ये कोणाच्याही दबावाखाली न येता, सायबर सेलद्वारे पारदर्शी, सखोल, निष्पक्ष आणि प्रामाणिकपणे पोलिसांनी तपास केल्यास या प्रकरणाची व्याप्ती मोठी आणि ‘राजा’ म्हणजे एक हिमनगाचे टोक असल्याचे समोर येईल, अशी इतर पत्रकारांमध्ये खुलेआम व खमंग चर्चा सुरू आहे. एकंदरीत जनमानसात कोल्हापूरच्या पत्रकारितेची विश्‍वासार्हता टिकवायची असेल, तर अशा विकृतांचा कसलाही मुलाहिजा न बाळगता त्यांचा बुरखा फाडून व्यभिचारमुक्त पत्रकारिता रुजविण्याचे शोधपत्रकारितेसह आज सर्वच पत्रकारांसमोर आव्हान आहे. तत्त्वनिष्ठ आणि स्वाभिमानी पत्रकारांमुळे आजपर्यंत छत्रपती शाहूंच्या या नगरीत ताठ मानेने सुरू असलेल्या निर्भीड पत्रकारितेला आज वाढती स्पर्धा व व्यवसायाच्या गर्तेत मालकांच्या समोर केवळ ‘हांजी हांजी’ करणार्‍या तथाकथितांमुळे ग्रहण लागल्याचे चित्र आहे. अनेक अन्यायी व भ्रष्ट प्रकरणे बाहेर काढून समाज घडविण्यार्‍या, तसेच बेदरकारांवर अंकुश ठेवणार्‍या पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करून आज अनेक गैरप्रवृत्ती यामध्ये शिरल्या आहेत. वरिष्ठ पत्रकार म्हणून समाजात मान-सन्मान मिळवून घेणार्‍या तथाकथितांनी मात्र वेळीच अशा अपप्रवृत्तींना रोखण्यात जाणीवपूर्वकच (त्यांचेही हात दगडाखाली असल्याने) दुर्लक्ष केल्याचे परिणाम आज जाणवत आहेत. त्यात इतरांच्या गैरकारभारावरून सळो की पळो करून सोडणारे पत्रकार व चार ते पाच पत्रकारांच्या दावणीला बांधलेल्या त्यांच्या ‘क्लब’ नामक संघटनेचे अस्तित्व म्हणजे केवळ स्वतःच्या दैनिकासाठी तीन ते चार पदे घ्यायची, पुढे पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्याऐवजी स्वतःला मिरवून स्वार्थच साधायचा आणि मर्जीतील कोणालाही गुपचुप ओळखपत्रे द्यायची, असेच राहिले आहे. याच लागेबांध्यांतून महिलेला पत्रकार करण्याचा कारनामाही समोर आला होता. सध्या अशाच एका राज्यस्तरीय दैनिकाच्या स्थानिक कार्यालयातील ओळखपत्रावरून येथील पत्रकारितेतील समोर आलेली अनैतिकता आणि व्याप्तीने समस्त पत्रकारवर्गच हादरलो. अनेकजण संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत.
पेशाने शिक्षिका असलेल्या एका ‘मॅडम’ला पत्रकार करण्याचे आमिष दाखवीत, पैसे घेऊन तिला एका ‘लोकप्रिय’ वृत्तपत्र समूहाच्या येथील विभागीय कार्यालयात त्या दैनिकाचे ओळखपत्र दिल्याचे प्रकरण गेल्या महिनाभरापासून गाजत आहे. सुरुवातीस नोकरीच्या आमिषाने ही फसवणूक असेल असे वाटत होते. पण, त्या ‘मॅडम’ने मात्र थेट बलात्काराची तक्रारच पत्रकारितेतील ‘राजा’वर केली. ऐन संक्रांतीलाच कोल्हापूरच्या पत्रकारितेला यानिमित्ताने तडा गेला. याला राजाचा बोलका स्वभाव नडल्याचे वाटत असतानाच, मॅडमने पत्रकारांचा कसा वापर केला आणि पत्रकारही मॅडमचा कसा कसा वापर करायचे, याचा धक्कादायक गुंता समोर येऊ लागला आहे. आपण कसलेही पैसे घेतले नाही आणि ओळखपत्रही दिले नाही, अशी स्पष्ट कबुली देणार्‍या राजाविरोधात त्या दैनिकाच्या व्यवस्थापनाने पोलिसांत प्रथम तक्रार दिली तेही दुसर्‍याच हद्दीतील पोलीस ठाण्यात. तेथून पुन्हा पहिल्या पोलीस ठाण्यात, नंतर ती तिसर्‍या पोलीस ठाण्यात तक्रार गेली आणि फसवणुकीऐवजी थेट बलात्काराच्याच गुन्ह्यात राजाला रातोरात अटक केली.
आजपर्यंत काही वादग्रस्त पत्रकारांच्या समर्थनार्थ येथील पत्रकार राजकारणी ते पोलिसांच्याही विरोधात एक झाले. मात्र, राजासाठी मात्र पत्रकारांचा ‘क्लब’ कधी एकत्र आला नाही. त्याची वस्तुस्थितीही संघटनेच्या एकाही पदाधिकार्‍याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. एकीकडे हा गुन्हा दाखल करून विषय अन्यत्र वळविण्यासाठी यामधील म्होरके व्यस्त होते; तर दुसरीकडे स्वतःच्या दुचाकीवर एका साप्ताहिक प्रेसचे नाव लावून बिनधास्त फिरणार्‍या या मॅडमना याबाबत विचारण्याचे धाडस ‘क्लब’च्या एकाही पदाधिकार्‍याने दाखविले नाही. त्यात सध्या ज्या ‘लोकप्रिय’ दैनिकाचे ओळखपत्र त्या मॅडमना दिल्याचे प्रकरण चर्चेत आहे, त्या दैनिकात जाहिरात गोळा करण्यासाठी तिचा मग वापर कोणी व कोणाच्या सांगण्यावरून केला? तिला एका महिन्याचे ऑनलाइन वेतन दिल्याची चर्चा असताना, मग त्या ओळखपत्रावरून एवढा हंगामा का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
याच दैनिकाच्या संपादकीय विभागातील मातब्बराने या मॅडमच्या संपर्कात आपला ‘वसंत’ फुलविला. या ऋतूत अनेक वरिष्ठांनीही आपली तहान भागवून घेतल्याची चर्चा आता लपून राहिली नाही. या दृढ संबंधांच्या चर्चेने आज पत्रकारितेवरील ‘विश्‍वासच’ उडाल्याचे चित्र आहे. ओळखपत्राच्या चौकशीसाठी संबंधित पत्रकाराच्या सह्यांचे नमुने पोलिसांनी घेतले; पण लघवीला आल्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यातून त्याने काढता पाय घेतल्याची जोरदार उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.


‘मॅडम’च्या विमान प्रवास पॅकेजचा प्रायोजक कोण?
खासगी शाळेत आठ-दहा हजार वेतनावर काम करणार्‍या या ‘मॅडम’च्या घरचे सामान भरून देण्यासह तिला घेऊन फिरणार्‍या त्या पत्रकारांची चर्चा सुरू आहे. तर, गेल्या काही दिवसांपूर्वी मॅडमनी कोल्हापूर-पुणे मोटारीतून आणि पुणे-बंगळुरू-उटी असा विमान प्रवास केला होता. आठवडाभराच्या या तिच्या ‘सहली’चे ‘प्रायोजकत्व’ कोणत्या पत्रकाराने केले? कोणता पत्रकार तिच्यासोबत होता, हे शोधण्याचे आव्हान आता ‘शोधपत्रकारां’वरच आहे.


साभार
सामना