मी मराठी LIVE ; कशी नशिबानं थट्टा आज मांडली…

मी मराठी लाइव्ह अर्थात बातमीतला मी आता मी - मी करत शेवटची घटका मोजत आहे.मी मराठी LIVE मधले सगळेच पत्रकार सध्या 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' हेच गाणं गुणगुणत आहेत. जानेवारी २०१६ चे पगार फेब्रुवारी उलटायला आला तरी मिळाले नसल्यामुळे संपादकांपासून ते चहा वाटणाऱ्या ऑफिस बॉयपर्यंत सगळ्यांचेच चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. एकीकडे मालक तुरुंगात असतानाच मालकाची गादी चालवणाऱ्या मोतेवार मंडळींनी संपादक मुकेश माचकर, सर्क्युलेशन प्रमुख रावराणे आणि अन्य मंडळी त्यांना भेटायला गेली असताना त्यांना चक्क दोन दिवस भेटच नाकारली.
फेब्रुवारी २०१५ मध्ये झोकात पदार्पण केलेल्या मी मराठी LIVE ने बाजारात चांगला जम बसवलाय खरा, पण पगार लटकण्याचे या पेपरमधील स्पीड ब्रेकर्स अगदी मार्च २०१५ पासूनच सुरू झालेत. मार्च २०१५ चा पगार तब्बल १५ दिवस लटकला. यानंतर एप्रिलचा पगार अगदी ३० तारखेलाच करून मालकांनी कर्मचाऱ्यांना खूश केले. मग मे महिन्यात फक्त संपादक आणि अन्य एक-दोन जणांचे (ज्यांना एक लाख रुपयांपेक्षा अधिक पगार आहेत, असे प्रमोद गणेशे, प्रदीप म्हापसेकर आणि मंदार जोशी हे तिघे) पगार पुन्हा उशीरा दिले. जून महिन्यात परत पगारावर गदा आली ती सहसंपादक मंडळींच्या.
 १५ हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या मंडळींना फक्त मार्च, जून २०१५ आणि जानेवारी २०१६ मध्ये झळा बसल्या. मात्र १५ हजारपेक्षा जास्त पगार असणाऱ्या सगळ्यांनाच जून महिन्यात पगार उशीरा मिळाले. तीच परिस्थिती ऐन दिवाळीतही. दिवाळीत बोनससकट पगार मिळाला, पण तो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. सगळ्यांच्या घरच्या मंडळींचे तगादे ऐकून झाल्यानंतर.
आता तर परिस्थिती इतकी वाईट आहे की, खुद्द माचकर साहेबांनी आपल्या नव्या कोऱ्या मोटारकारचे हप्ते फेडण्यासाठी पर्सनल लोन घेतले आहे. एवढ्या तरुण, तडफदार (दुर्दैवाने तडफदार फक्त बोलताना, बायलाइन लेखात यांचा अनेकदा पुणेरी पुणेकर होतो…) संपादकावर प्रहारनंतर सलग दुसऱ्यांदा ही वेळ यावी, हे दुर्दैवच.  
मध्यंतरी कॉस्ट कटिंगची पुडी त्यांनीच सोडली. विशेष म्हणजे कोणत्याही कंपनीत अशा घोषणा कंपनीच्या एचआर टीमकडून इमेलवर केल्या जातात. पण इथे एकएक महाभाग आणि महामुनींचे राज्य असल्यामुळे पुणेरी टेचाखेरीज काहीच सिस्टिमॅटिक चालत नाही. माचकरांनी वरिष्ठ संपादकीय मंडळाला जानेवारीच्या पगाराची बोंब असल्याचे सांगताक्षणीच सगळे सावध झाले खरे, पण एखाद-दोन अपवाद वगळता, या मंडळांमध्ये सगळे सदस्य सावरकर, खांडेकर, नानल आदी टाकाऊ मालच असल्यामुळे त्यांना दुसरी नोकरी मिळणार तरी कुठे, अशी परिस्थिती आहे.

सध्या फक्त या मंडळातील संजय सावंत व निनाद सिद्धये या दोघांनी मी मराठी LIVE ला  रामराम करत दुसरी वाट धरली आहे. बाकीच्यांची मात्र खरोखर बोंब आहे. सावरकर-खांडेकर दुक्कल मी मराठीमध्ये आणण्यासाठी राणेंनी माचकरांना “बरे झाले; पीडा गेली” पुरस्कार दिल्याचे समजते. या दोघांवर प्रहारमध्येही अनेकदा चर्चा झाली आहे.

माचकरांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या शेवटच्या भाषणात, पगार २५ फेब्रुवारीला होतील आणि मालकांना पेपर बंद करायचा नाहीए, अशा दोन घोषणा केल्या असल्या तरी, बहुतेक मंडळी पगार मिळाल्यानंतर कल्टी मारण्याच्या बेतात असल्याने माचकर आणि त्यांचे विद्वान लंगोटी मित्र मिळून मी मराठी LIVE ला ALIVE कसा ठेवणार, हाच प्रश्न आहे.