‘सकाळ’ चा दररोजचा खप 13,37,901

पुणे - समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना उत्तरे शोधत उद्याच्या जगाचा वेध घेणाऱ्या ‘सकाळ’वर महाराष्ट्रातल्या वाचकांनी सर्वाधिक खपाचे दैनिक असल्याची मोहोर उमटवली आहे.

‘ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्‍युलेशन’ने (एबीसी) जुलै ते डिसेंबर २०१५ या काळात प्रत्यक्ष विक्री झालेल्या प्रतींच्या आधारे केलेल्या अहवालानुसार ‘सकाळ’च्या सर्व आवृत्त्यांचा एकत्रित खप महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मुद्रित माध्यमांच्या संदर्भात जाहिरात आणि प्रकाशन क्षेत्रांमध्ये ‘एबीसी’चे निष्कर्ष आणि आकडेवारी विश्वासार्ह आणि अधिकृत मानली जाते.

नवीन उत्सुक वृत्तपत्रे व घाऊक पुरवण्यांच्या भाऊगर्दीत ‘सकाळ’ने १३ लाख ३७ हजार ९०१ प्रतींचा खप नोंदवला आहे. सकारात्मक परिवर्तनाचे व्यासपीठ बनलेल्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या शिरपेचात या अहवालाने लोकमान्यतेचा आणखी एक तुरा खोवला आहे.

‘एबीसी’च्या आकडेवारीनुसार ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचा दररोजचा खप ६.०४ लाख प्रतींपेक्षा अधिक आहे. पुणे व मुंबई या महानगरांतील ‘सकाळ’चा खप दररोज ७,३०,७७१ प्रति इतका आहे. राज्याच्या अन्य भागांतल्या उदयोन्मुख शहरांमधील वाचकांनाही ‘सकाळ’ला आपलेसे केले आहे, हेसुद्धा ‘एबीसी’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

वृत्तपत्रांच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या ‘सकाळ’ने साडेआठ दशकांच्या वाटचालीत सामाजिक बांधिलकी केवळ जोपासलीच नाही, तर गेल्या काही वर्षांत राज्यभरातील नागरिकांच्या सहभागाने या बांधिलकीच्या जाणीवेला व्यापक स्वरूप दिले आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’, ‘सकाळ रिलीफ फंड’, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ या माध्यमांतून वाहतुकीच्या समस्येवर उत्तर शोधणारा ‘पुणे बस डे’, महिलांना सशक्त व्यासपीठ देणारे, ‘तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान’, तरुणाईला नेतृत्वगुणांची ओळख करून देणारे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने जाणारी ‘पाणी परिषद’, ग्रामविकासाच्या स्वप्नांना विचारविनिमयातून प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न करणारी ‘सरपंच परिषद’ असा हा प्रवास आहे. लोकभावनेशी जोडले जाणे, हे ‘सकाळ’च्या सर्व उपक्रमांचे अंगभूत वैशिष्ट्य ठरले आहे. सकाळची समाजबदलासाठीची ही सक्रियता मराठी मनाला भावल्याचेच ‘सकाळ’ महाराष्ट्रात ‘नंबर वन दैनिक’ बनल्याचे सिद्ध होते.
Sakal