जालन्याच्या पाच पत्रकारांची सहपरिवार विमानाने सहल!


भाजप प्रदेशाध्यक्षांनी घडविली सहल!  

वृत्तपत्राच्या मुळ धोरणाला बगल देत वर्षभर भाजप आणि प्रदेशाध्यक्षाच्या बातम्यांना भरभरून प्रसिध्दी देणार्या जालना येथील नामांकित दैनिकांच्या पाच पत्रकारांची सहपरिवार सहल प्रदेशाध्यक्षांनी विमानाने नुकतीच घडवून आणली आहे. या 5 दिवसाच्या सहलीमध्ये जागोजागी फिरण्यासाठी वातानुकुलीत गाड्यांची आणि मुक्कामासाठी फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली होती. या सहलीची अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असली तरीदेखील शहरामध्ये जोरदार चर्चा असून, मुख्य कार्यालयाला आजारपण.. आणि नातेवाईकांच्या लग्नाची खोटी कारणे सांगून रजा मंजूर करून सहलीवर गेलेले पत्रकार चांगलेच गोत्यात आले आहेत. 
या सहलीमध्ये 'मानबिंदू'चा जालना येथील जिल्हा प्रतिनिधी आणि भोकरदन येथील तालुका वार्ताहर, या दोघासह 14 राज्यात 56 आवृत्या असणार्या ग्रुपच्या 'भव्य मराठी', राज्यात सर्वाधिक खपाचा उच्चांक गाठणारे दैनिक आणि 'पुण्य' या दैनिकांचे जिल्हाप्रतिनिधी सहभागी झाले होते. 'मानबिंदु'चा तालुका वार्ताहर हा प्रदेशाध्यक्षांचा खास माणूस असल्याने त्याच्यावरच या चौघा पत्रकारांच्या चोख व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच, या चौघांच्या आवडी-निवडीही चांगल्याच माहिती असल्यामुळे त्याला या सहलीत पाठविण्यात आले होते. या सर्व पत्रकारांना सहपरिवार औरंगाबादहून विमानाने मुंबई येथे पाठविले होते. तेथून विमानाने दिल्ली, आग्रा, वैष्णोदेवी आणि परत मुंबई अशी सहल घडवून आणण्यात आली आहे. 5 दिवसाची सहल आटोपून ही मंडळी नुकतीच जालना शहरात परतली आहे. हे चौघेही आपल्या रजेची वेगवेगळी कारणे सांगत असले तरीही संबधित दैनिकांच्या व्यवस्थापनाला हा सर्व प्रकार समजला आहे. त्यामुळे या पत्रकारांना खुलासे करताना नाकीनऊ येणार आहे.  
राज्य पातळीवर चार प्रमुख दैनिकात मोठी स्पर्धा असतानादेखील या वृत्तपत्राचे प्रतिनिधी मात्र जालना येथे हातमिळवणी करून ग्रुप रिपोर्टींग करून सारख्याच बातम्या छापतात. अशा अनेक सारख्या बातम्या या चौघाच्या नियमित प्रसिध्द होतात. 
जालना शहरात पत्रकारामध्ये खूप मोठी गटबाजी आहे. 'लाॅबी'चे राजकारण करून जातीयवाद केल्या जात आहे. शहरातील 'लाॅबी'चा एक गट मागे सक्रीय झाला होता. एका ज्येष्ठ पत्रकाराच्या मार्गदर्शनात दररोज बैठका होत. मात्र या गटातील मोठ्या दैनिकांचे 3 जण वरचढ ठरले आणि त्यांनी स्वतंत्रपणे लाॅबीच्याच नेत्यांना जवळ करून आपली पोळी भाजून घेतली आहे. या 3 जणांनी सोबतीला लाॅबीबाहेरचा सर्वाधिक खपावाला प्रतिनिधी घेतला आहे. या खपावाल्याने एमआयडीसीच्या अनेक बातम्या अनेकदा रिपीट छापून वर्गणी जमा करून मंदिर व घर टोलेजंग बांधले आहे. या चौघांची युती जालना शहरात चांगलाच चर्चेचा विषय आहे.