मटकाबंदीनंतरच 'सोलापूर तभा' ला मराठवाडयात परवानगी

'नागपूर तभा' ने मराठवाडयातील कार्यालये गुंडाळली!
औरंगाबाद - संघाला आपल्या मुखपत्रात पाने भरून छापून येणारा मटका आवडलेला नाही. मटका बंद करण्याची अट पूर्ण केल्यानंतरच सोलापूर तरुण भारतला मराठवाडयात पाय ठेवण्यास संघाने परवानगी दिली आहे. त्यानंतरच मराठवाडयातील औरंगाबाद, जालना, नांदेड येथील नागपूर तरुण भारतची कार्यालये या महिन्यात गुंडाळण्यात आली आहेत.
रा. स्व. संघाचे मुखपत्र असलेल्या 'तरुण भारत'चा गेल्या 10 वर्षापासून मराठवाड्यात टिकाव लागेनासा झाला आहे. देवगिरी, सोलापूर आणि नागपूरच्या 'तरुण भारत'ने मराठवाडयात हातपाय हलविण्याचा काहीवेळा प्रयत्न केला; मात्र तो अपयशी ठरला. मागच्या 10 वर्षात देवगिरी त. भा. दोनवेळा सुरू झाला व पुन्हा बंद पडला. 1990 मध्ये औरंगाबाद येथून देवगिरी प्रतिष्ठानने सुरू केलेला देवगिरी त. भा. डबघाईला आल्यावर 2005 साली लक्की ड्रॉ काढून वाचविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, परिवारातील लोकांनीच तिकीटे न घेतल्यामुळे टार्गेट पूर्ण झाले नाही आणि देवगिरी बंद पडला. त्यावेळी अनेक कर्मचार्याँचे पगार, पीएफचे पैसे बुडवून व्यवस्थापन नामनिराळे झाले. त्यानंतर 2007 मध्ये सोलापूरचे जिल्हा दैनिक असलेल्या 'सोलापूर त.भा.' ने  मराठवाड्यात घुसखोरी करून जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद येथे जिल्हा कार्यालये सुरू केली. बहुतेक जुना - अनुभवी कर्मचारी वर्ग मिळाल्याने ही कार्यालये बऱ्यापैकी सुरू होती. त्यातच परिवाराला न जुमानता मोठया प्रमाणात 'मटका' छापल्या जात असल्याने सोलापूर त. भा. ला मागणीही बरी होती.
त्याचदरम्यान, 2009 च्या विधानसभा तोंडावर येताच भाजप नेत्यांनी निवडणुकीत मदत व्हावी म्हणून 4 वर्ष बंद असलेला 'देवगिरी त. भा.' पुन्हा संभाजी राजे मिडिया प्रा. लि. कंपनीच्या अधिपत्याखाली सुरू केला. संभाजी राजे मिडियाच्या मंडळीने मराठवाडयात सुरू असलेली सोलापूर त.भा.ची  कार्यालये बंद करण्याचा खूप अट्टाहास केला. संघाकडूनही दबाव आणण्यात आला. तरीही सोलापूर बंद न झाल्यामुळे कर्मचारी फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले. मराठवाडयात बहुतेक जिल्ह्यात दोन्ही तरुण भारतची दोन -दोन कार्यालये सुरू झाली आणि एकाच नावाची दोन वृत्तपत्र चोखंदळ वाचकाच्या हाती पडू लागली. त्यामुळे सुरुवातीस खूप गोंधळ निर्माण झाला अन् तो लोकांच्या नंतर अंगवळनी पडला. तसे पाहिले तर दोन्ही त.भा.चे सर्क्यूलेशन जेमतेमच! दोन्हीचे गठ्ठे एकत्र केले तर एखाद्या साप्ताहिकाच्या एक दिवसाच्या अंकापेक्शाही कमीच! सोलापूर त.भा. फक्त मट्क्यामुळे ओळखल्या जात होता. त्यातच अक्कलकोट येथून येणारी सरकारी बस बंद झाल्याने जालना, बीड येथे येणाऱ्या अंकावर मोठा परिणाम झाला आणि 2013 ला सोलापूर त. भा. चे जालना कार्यालय बंद झाले. जालना कार्यालयातील कर्मचार्याँचे 4 महिन्याचे पगार सोलापूर त. भा.ने दिलेले नाहीत. त्यांचे धनादेश बाऊन्स झालेले आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणूका झाल्यानंतर औरंगाबादचा देवगिरी त.भा. पुन्हा दुसऱ्यादा बंद पडला. त्यानंतर संधी साधून सोलापूर त.भा.ने औरंगाबादला अलीकडे आपले पुन्हा कार्यालय थाटले आहे.  काही दिवसांनीच नागपूर त.भा.नेही मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व अन्य काही जिल्ह्यात कार्यालये थाटुन मराठवाडयाची स्वंतत्र 4 पाने सुरू केली. गेल्या 6 महिन्यापासून मराठवाड्यात अकोला येथून नागपूर त.भा. येत असतांना महिनाभरापुर्वी सोलापूरच्या 3 विश्वस्तांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संघांच्या पदाधिकार्याँची नागपूर मुक्कामी भेट घेतली. त्यांनी मराठवाड्यात सुरू झालेला नागपूर त.भा. बंद करण्याची आणि सोलापूर त.भा. सुरू ठेवण्याची मागणी मंजूर करवून घेतली. मात्र, यावेळी संघाने सोलापूर त.भा.मधील मट्क्याचे आकडे कायमस्वरूपी बंद करण्याच्या अटीवरच मराठवाडयात सोलापूरकरांना पाय ठेवण्याची परवानगी दिली आहे. संघाच्या अटी आणि शर्थीनुसार सोलापूर त.भा.ने या महिन्यापासून मट्क्याचे आकडे बंद केले आहेत. त्यानंतर नागपूर त.भा.ने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व इतर  सर्व कार्यालये बंद केली आहेत.