रंगीत छपाईत ‘सकाळ' शिखरावर

पुणे - सकाळ वृत्तपत्र समूहाच्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रंगीत छपाईतील गुणवत्तेसाठी जगातील पहिल्या ५० दर्जेदार वृत्तपत्रांमध्ये ‘सकाळ’चा समावेश झाला आहे. या पुरस्कारामुळे ‘सकाळ’चा समावेश ‘इंटरनॅशनल न्यूज पेपर कलर क्वाॅलिटी क्‍लब २०१६-१८’मध्ये झाला आहे.

जागतिक पातळीवर गुणवत्तेचे निर्धारण करण्यासाठी वृत्तपत्रांना सल्ला व सेवा देण्यासाठी ‘वॅन इफ्रा’ संस्थेची १९६१मध्ये स्थापना करण्यात आली. यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान घेतलेल्या या स्पर्धेत ‘सकाळ’ने रंगीत छपाईतील गुणवत्तेसाठी हा मानाचा पुरस्कार पटकावला असून, उत्कृष्ट छपाई करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ‘सकाळ’चीही वर्णी लागली आहे. पुरस्काराचे वितरण २१ सप्टेंबर रोजी कोलकाता येथे होणाऱ्या ‘वॅन-इफ्रा परिषदे’त होणार आहे.
‘सकाळ’ने हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळवला आहे. या आधी २००८ मध्ये ‘सकाळ’ला हा पुरस्कार मिळाला होता. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होते.
मुद्रित माध्यमांच्या छपाईच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी १९९४ पासून ‘इफ्रा’च्या ‘इंटरनॅशनल न्यूजपेपर कलर क्वालिटी क्‍लब’च्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्पर्धा घेण्यात येते. या पुरस्कारामुळे आता ‘सकाळ समूहा’ला क्‍लबचे दोन वर्षांचे सदस्यत्व मिळाले असून, जागतिक स्तरावर इतर वृत्तपत्रांशी स्पर्धा करण्याची संधी या निमित्ताने ‘सकाळ’ला मिळाली आहे. गुणवत्तावाढ आणि फेरमुद्रणाची गुणवत्ता वाढविणे हे कलर क्‍लबचे उद्देश आहेत. या क्‍लबचे सदस्यत्व हे एका अर्थाने वृत्तपत्रांच्या गुणवत्तेवर जागतिक स्तरावर शिक्कामोर्तबच ठरते.

या वर्षी २०१६ ते २०१८ या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत जगातील १३० मुद्रित नियतकालिकांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेसाठी ‘सकाळ’ने जानेवारी ते मार्चदरम्यानचे अंक सादर केले होते. सहभागी वृत्तपत्रांनी पाठविलेल्या अंकांची तज्ज्ञांच्या समितीमार्फत बारकाईने तपासणी होऊन जागतिक स्तरावर विजेते जाहीर केले जातात. अंकात छापल्या जाणाऱ्या संपादकीय मजकुरापासून ते डिजिटल स्वरूपातील जाहिरातीपर्यंत सर्वांचे विशिष्ट पद्धतीने मानांकन केले जाते.

‘वॅन इफ्रा’चा जागतिक पातळीवरील पुरस्कार जाहीर
अशी झाली निवड

 जानेवारी ते मार्च या कालावधीतील अंकांची तपासणी
छपाई पद्धती, छपाईचा दर्जा, रंगांचा समन्वय, छायाचित्र आणि आलेखांचा दर्जा आदी गोष्टींची पाहणी करण्यात आली
आंतरराष्ट्रीय ज्युरींकडून अंकातील इतर घटकांचीही तपासणी
 जगातील १३० वर्तमानपत्रांचा सहभाग, त्यातून पहिल्या ५०मध्ये स्थान