बेरक्यामुळे जळगाव तरुण भारतला नाशिकमध्ये लागला ब्रेक ...

तीर्थस्थळ नाशिकमध्ये येवू घातलेल्या जळगाव तरुण भारतच्या नाशिक आवृत्तीला ब्रेक लागला आहे. काल नाशिक येथे जळगाव तरुण भारतचे काही पदाधिकारी व नाशिकमधील संघ, भाजपचे पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. तीत सध्या नाशिक येथे येणाऱ्या मुंबई तरुण भारतचा अंक, त्याची स्थिती आणि अर्थकारण तसेच जळगाव तरुण भारतची संभाव्य नाशिक आवृत्ती, अंक वाढ व खर्च यावर गंभीरपणे चर्चा झाली. पहिल्या टप्प्यात किमान ५ हजार वर्गणीदार व्हावेत अशी अपेक्षा जळगावहून आलेल्या पदाधिका-यांनी व्यक्त केली. मात्र, अशा प्रकारे नोंदणीला वेळ हवा, इतर सोबत हवेत असा मुद्दा नाशिककरांनी मांडला. त्यामुळे सध्या आहे तिच स्थिती कायम ठेवून मुंबई तरुण भारतच कायम सुरु ठेवायचे ठरले.
जळगाव तरुण भारतच्या चोपडा, जैन व नाशिकमधील स्थानिक सल्लागार ओसवाल या त्रिकुटाने नाशिक तरुण भारतसाठी कर्मचारी भरतीची जाहिरात लोकमतला दिली होती. हे त्रिकुट करीत असलेली घाई जळगाव व नाशिकच्या संघ परिवाराच्या लक्षात आली आहे. चोपडा, जैन व ओसवाल त्रिकुटाने ५ जुलै या कालिदासदिनाचा मुहुर्तही नाशिक तरुण भारत प्रकाशनासाठी निश्चित केला होता. त्या अगोदर ५ जून ही सुध्दा तारीख चर्चेत होती. शिवाय, चोपडा हे स्वतःच संपादक म्हणून डिक्लरेशन देण्याच्या तयारीत होते. मात्र, जळगावहून आलेले अमळकर, कुरंभट्टी व रत्नाकर पाटील आदींनी स्थानिक लोकांशी बोलून अखेरीस नाशिक तरुण भारत प्रकल्प गुंडाळला.
जळगाव तरुण भारत अद्याप धुळे व नंदुरबार जिल्हा आवृत्ती सुरु करु शकलेले नसताना नाशिकमध्ये खर्च वाढवून कशासाठी नाशिक आवृत्तीचा घोळ घालत आहे असे नाशिक परिवाराचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक असा ४ जिल्ह्यांचा खप दाखवून नागपूर असोशिएटच्या नफ्यात टक्केवारी वाढवायचा हा प्रयत्न असल्याचे समजते.
बेरक्याने या प्रकरणी वास्तव वृत्त देवून नाशिकच्या पत्रकार व इतरांना सावध केल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. मुंबई व नाशिकचे थेट नाते असल्यामुळे मुंबईचाच तरुण भारत नाशिकला हवा असे परिवाराचे म्हणणे आहे.
(चोपडा, जैन व ओसवाल यांनी कर्मचारी वेतन तक्ता कसा ठरविला होता याची माहिती लवकरच)