बेरक्याचे वृत्त खरे ठरले,दिव्यमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले !

 औरंगाबाद - बेरक्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.मराठवाड्यातील जालना,बीड आणि उस्मानाबाद कार्यालयातील प्रत्येकी पाच म्हणजे एकूण पंधरा जणांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला आहे.त्यात उपसंपादक,डीटीपी ऑपरेटर,प्रुफ रिडर आणि फोटोग्राफर आणि निष्क्रिय रिपोर्टर यांचा समावेश आहे.
औरंगाबादेत दिव्य मराठी सुरू होवून पाच वर्षे झाली,परंतु परभणी,हिंगोली,नांदेड आणि लातूर या चार जिल्ह्यात अंकच सुरू झाला नाही.उर्वरित जालना आणि बीड हे औरंगाबाद आवृत्तीशी तर उस्मानाबाद हे सोलापूर आवृत्तीशी जोडण्यात आले होते.
मजिठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आणि वाढत चाललेला तोटा यामुळे भोपाळशेठनी कर्मचारी कपात करण्याचे धोरण राबवले आहे.दिव्य मराठीत कॉस्ट कटिंग होणार हे वृत्त बेरक्याने यापुर्वीच दिले होते.
त्यानुसार जालना,बीड आणि उस्मानाबाद कार्यालयातील प्रत्येकी पाच जणांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पुर्वी ब्युरोच्या मार्फत निरोप देण्यात आला होता,आता मात्र थेट संबंधितांना निरोप देण्यात आला आहे.त्यात उपसंपादक,डीपीटी ऑपरेटर,प्रुफ रिडर,फोटोग्राफर आणि निष्क्रिय रिपोर्टर यांचा समावेश आहे.
आता कोणत्याही जिल्हा कार्यालयात उपसंपादक,डीटीपी ऑपरेटर,प्रुफ रिडर,फोटोग्राफर राहणार नाही.रिपोर्टरनी आपल्या बातम्या स्वत: टायपिंग करून त्या मुख्य कार्यालयात पाठवायच्या आहेत.तेथे उपसंपादकांनी पेज तयार करायचे असा दंडक भोपाळशेठनी घातला आहे.मुख्य कार्यालयात मोजके आर्टीस्ट राहणार आहेत.हे आर्टीस्ट फक्त जाहिराती तयार करतील.फार तर उपसंपादकांनी तयार केलेल्या पानावर शेवटचा हात मारतील.उपसंपादकांनीच पेजीनेशन करायचे आहे.
या निर्णयामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ब्युरोची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे.त्याचबरोबर त्यांचा रूबाब आता कमी होणार आहे.मराठवाड्यात काही ठिकाणी ब्युरो संस्थानिक बनले होते,त्यांना आता चाप बसणार आहे.
या निर्णयामुळे दिव्य मराठीच्या प्रत्येक जिल्हा कार्यालयात खळबळ उडाली आहे.भविष्यात काही जिल्हा कार्यालय बंद करण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.आता एक - एक पत्ते कोसळण्यास सुरूवात झाली आहे.
दिव्य मराठीच्या कॉस्ट कटिंगमुळे दिव्य मराठी अर्धा खाली होणार आहे.दुसरीकडे पुढारी येवू घातल्यामुळे दिव्य मराठीतून कमी झालेल्या कर्मचा-यांना संधी मिळू शकते.