पत्रकारांनो, तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे...

काळ बदलला, तसे पत्रकारितेत बरेच बदल झाले. कागदावर बातम्या लिहिणारे संगणकावर बातम्या टाइप करू लागले. पत्रकार हा शब्द मोठा व्यापक आहे, यात संपादकापासून तर गावातील वार्ताहर समाविष्ट होतो. तूर्त आपण कार्यालयातील संपादकीय विभागाबद्दल बोलू या ...
पत्रकारितेत जेही नवीन तंत्रज्ञान आले, ते बदल अर्थात फॉलो करण्याचे काम संपादकीय टीमवर येऊन पडते. सध्याच्या काळात बातमीदार स्वतःची बातमी स्वतः टाइप करतात, उपसंपादक संगणकावरच ती संपादित करतात, हे बदल संपादकीय विभागाने आत्मसात केले आहेत. आता त्यापुढे पाऊल ठेवण्याचे दिवस आले आहेत. अर्थात हा बदल लोकमतने बहुतांश प्रमाणात आणि काही प्रतिस्पर्धी दैनिकांनी अंशतः यापूर्वी अवलंबला आहे. पण बदलत्या काळात तो सर्व दैनिकांच्या संपादकीय विभागात दिसला तर नवल वाटायला नको. हा बदल म्हणजे, संपादकीय विभागातील कर्मचाऱ्यानी स्वतः संगणकावर पान लावायचे. गोष्ट वाटायला एकदी साधी आहे, पण हे येत नाही म्हणून दिव्य मराठीतील अनेकांच्या हातात नारळ मिळणार आहे आणि भविष्यात जवळपास सर्वच मोठ्या दैनिकांत हा पायंडा पडणार आहे. लोकमतमध्ये पान लावता ज्याला येते, त्यालाच प्राधान्य असते. दिव्य मराठीने गेल्या दीड महिन्यापासून आपल्या संपादकीय कर्मचाऱ्याना संगणकावर पान लावणे शिकवण्यासाठी प्रशिक्षण सुरू केले आहे. पुढच्या काही दिवसांत कोणत्याही क्षणी या कर्मचाऱ्यावर स्वतःचे पान स्वतः लावण्याची जबाबदार पडू शकते. लोकमत आणि दिव्य मराठी यांनी पूर्णपणे हा बदल केल्यानंतर सकाळ, पुण्यनगरी हीच दैनिके उरतात जिथे वृत्तपत्राचे पान डिझायनर लावतात. दिव्य मराठीने हे प्रशिक्षण सक्तीचे केल्यापासून जुनी मंडळी ज्यांनी मोठ्या कठीणतेने बातम्या टाइप करण्याचे शिकले होते, त्यांना हादरे बसू लागले आहेत. अनेकांनी शनिवारी, रविवारी झालेल्या पुढारीच्या मुलाखतींना हजेरी लावली आणि तिथे मोठा पगार, मोठे पद अशा अपेक्षा आळवायला सुरुवात केली. अर्थात पुढारी लगेचच संपादकीय विभागानेच पाने लावावीत, हा आदेश काढणार नाही. त्यामुळे त्यांना आता पुढारी सोईचा वाटू शकतो. पुढारीच्या मुलाखतीला आलेल्या एकूण उमेदवारांपैकी जवळपास ८० टक्के उमेदवार हे सांजवार्ता, आनंदनगरी, लोकपत्रसारख्या लोकल दैनिकांतून आले होते. त्यात संधी द्यायची झाली तरी किती जणांना देणार, हा प्रश्नच आहे. कारण प्रतिस्पर्धी दैनिकांच्या तुलनेत आवृत्ती काढण्यासाठी अनुभवी, गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ पुढारीला लागणार आहे. त्यामुळे दिव्य मराठी, लोकमतमधील या अनुभवींचा त्यांना फायदा होऊ शकतो. अनुभवसंपन्न असले तरी, केवळ तंत्रज्ञानाच्या सोबत न चालल्यानेही नामुश्की त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार आता पत्रकारांनी केवळ मराठी टायपिंग  एवढेच न शिकता क्वॉर्क एक्स्प्रेस, इनडिझाईन आदी सॉफ्टवेअर लिलया हाताळणे शिकले पाहिजेत. त्यावर पानमांडणी तर यायलाच हवी, पण वेगवेगळ्या गोष्टी शिकून पान कसे आकर्षित करता येईल, याबाबतही मेहनत घ्यायला हवी. हे बदल आताच अंगिकारले नाहीत, तर असून हुशारी आहे घरी असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. औरंगाबादमध्ये बोटावर मोजण्याइतपत पत्रकार संगणक हाताळण्यात सराईत आहेत. ही संख्या वाढायला हवी. दिव्य मराठीने सक्ती केली म्हणून पान लावणे शिकल्यापेक्षा आपल्या गुणवत्तावाढीसाठी जे गरजेचे आहे, हा दृष्टीकोन ठेवला पाहिजेत. सकाळने हा प्रयोग दोन-तीनदा अवलंबला आहे, पण शिकलो तर आपल्यालाच पान लावायला सांगतील म्हणून अनेकांनी या प्रयोगाला प्रतिसाद दिलाच नाही. मोजक्याच कर्मचाऱ्यानी या प्रयोगाचा लाभ घेतला आहे.जे पत्रकार काळा बरोबर चालणार नाहीत, ते चांगली बातमी लिहिता येऊनही या क्षेत्राच्या बाहेर पडतील आणि कालबाह्य होतील, तेंव्हा आजच सावध व्हा !
- बेरक्या