पुढारीत मुलाखती सुरू पण युनिट हेडचा मनमानीपणा उघड

औरंगाबाद - दैनिक पुढारीमध्ये 'मेगा भरती'साठी अखेर मुलाखती सुरू झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून वितरण,जाहिरात,प्रॉडक्शन,डी.टी.पी / कॉम्प्युटर आणि आय.टी.विभागासाठी मुलाखती सुरू आहेत.मात्र या मुलाखतीमध्ये मोठा घोळ झाल्याची चर्चा असून,पद्मश्री त्याची चौकशी करणार का,याकडे लक्ष वेधले आहे.
'पुढारी' औरंगाबादेत येणार म्हणून गेल्या दहा वर्षापासून चर्चा सुरू आहे.दोनदा प्रयोग फसल्यानंतर आता तिस-यांदा तयारी सुरू आहे.आता कोणत्याही परिस्थितीत येत्या १७ सप्टेंबर रोजी पुढारी सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
युनिट हेड म्हणून कल्याण पांडे,निवासी संपादक म्हणून भालचंद्र पिंपळवाडकर जॉईन झाल्यानंतर जाहिरात,वितरण,प्रॉडक्शन,डी.टी.पी. / कॉम्प्युटर आणि आय.टी.विभागासाठी गेल्या तीन दिवसांपासून मुलाखती सुरू आहेत.
मात्र या मुलाखतीमध्ये युनिट हेडने मोठा घोळ केल्याची चर्चा सुरू आहे.या पदासाठी दिव्य मराठीत मागे जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर अनेकांनी अर्ज केले होते.त्याची शॉर्ट लिस्ट कोल्हापूरच्या एच.आर.विभागाकडून औरंगाबाद कार्यालयात आल्यानंतर संबंधितांना फोन किंवा मेल करणे अपेक्षित असताना,लिस्टमधील केवळ मोजक्या लोकांना फोन करण्यात आला आणि ज्यांनी अर्जच केला नाही,त्या मर्जीतील आणि ठराविक जातीतील लोकांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आणि त्यांची वर्णी लागवण्याची तयारी सुरू आहे.पद्मश्रींना मात्र शॉर्ट लिस्टमधील अनेक लोक आले नाहीत,अशी खोटी माहिती देण्यात आली आहे.युनिट हेडच्या एकाधिकारशाही कारभारामुळे पुढारीचे चांगलेच 'कल्याण' होणार,अशी चिन्हे आहेत.
मुलाखतीसाठी बहुतांश लोक हे दिव्य मराठीचे होते.दिव्य मराठीची कॉस्ट कटींग पुढारीच्या पथ्यावर पडली आहे.संपादकीय भरती लवकरच होणार आहे,परंतु तिथे तरी पद्मश्री लक्ष घालणार की युनिट हेडवर विश्वास ठेवणार,हे लवकरच कळेल.