पत्रकारांना विचार करायला लावणारे एक पत्र...

सर्व पत्रकार बांधवांस,
सप्रेम नमस्कार ....
पत्रास कारण की, काल वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला मंत्र्याने दिलेली उद्दाम वर्तणूक पाहिली. मंत्री चुकलेच, पण माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
संबंधित मंत्री जे काही बोलले तो प्रसंग चुकीचा असला तरी त्यांनी जे काही सांगितले ते मात्र अजिबात चुकीचे नाही. *तुम्ही टीआरपीसाठी काहीही करू शकता* असे मंत्रयांचेच नाही तर सामान्य माणसांचेही म्हणणे आहे.
26/11 च्या हल्ल्यात तुम्ही जे वागलात ते आम्ही पाहिले. कालच्या *महाड दुर्घटनेत तुम्ही प्रतिक्रिया घेण्याच्या नावाखाली जो काही धुडगूस घालत होता तेही आम्ही पाहिले*. तुम्ही बीबीसी वगैरे बघत नसाल कदाचित. त्यामुळे *गांभीर्य वगैरे प्रकारांशी तुमचा काहीही संबंध आलेला नाही*. परवा फ्रान्सच्या नाईस शहरात दहशतवादी हल्ला झाला. मी एकही मृतदेह माझ्या टीव्हीच्या पडद्यावर पहिला नाही, रक्त नाही आणि *झीट आणणारा बूमधारी सर्वज्ञांचा कर्कश कोलाहलही नाही*. तो मला 9/11 लाही दिसला नव्हता.
एक लक्षात घ्या, *तुम्ही पत्रकार आहात न्यायाधीश नाहीत*. तुमची बदललेली भाषा कळते आम्हाला. "याना शिक्षा करा," "याना फासावर लटकवा," "यांची चामडी सोला," "यांचे राजीनामे घ्या" असले तुमचे मथळे. आणि भाषा अशी की, सगळे ज्येष्ठ तुमच्यासोबत शाळेत गोट्या खेळत होते. अजून शेंबूड पुसता येत नाही अशी तुमची अँकर माजी मुख्यमंत्र्यांना थेट नावाने हाक मारते. "जी", "सर" असली आदरार्थी विशेषणे फक्त तुमच्या टुकार संपादकांसाठी आहेत, असा तुमचा समज असेल तर तसे एकदा जाहीरच करून टाका.
तुम्ही जनहितार्थ असाल तर तसेही काही नाही. *पक्ष व व्यक्ती बघून तुमचा आवेश ठरतो*. रोज उठून लोकांना ढुशा देणारा "बोधामृतफेम" संपादक स्वतःच लिहिलेला अग्रलेख दुसऱ्या दिवशी चक्क मागे घेतो. डुकराचे कार्टून छापणारं वृत्तपत्र जाहीर माफी मागतं. एका वृत्तपत्राचा आणि वाहिनीचा मालक चार महिने जेलात आहे. दुसऱ्या वाहिनीचा मालक कोळसा घोटाळ्यात आहे. *एक आमदार लाईव्ह टेलिकास्ट मध्ये संपादकाने कशी पाकिटे घेतली त्याचा उद्द्धार करतो*. एक पत्रकार, पत्रकारांवरच सेन्सॉरशिपची मागणी करतो, दुसरी पत्रकार त्याला शिव्या देते, एक दीड शहाणा गोमांस खातानाचा फोटो फेस बुकवर टाकतो, एका इंग्रजी दैनिकाचा पत्रकार फेसबुकवर हिंदुत्ववाद्यांची अर्वाच्च्य शब्दात आई-बहीण काढतो, आणि गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तुमच्या संघटना दबाव आणतात तेव्हा तुमची निषेधाची तोंडे का बंद होतात?? *तेव्हा कुठे जातो तुमचा ताठ कणा आणि बाणा*??
तुम्ही गप बसलात तरी *सोशल मीडिया नावाचा तुमचा बाप जिवंत आहे हे लक्षात ठेवा*.
*मेहता चुकलेच. पण पत्रकाराचा प्रश्न काही फार बरोबर होता असेही नाही. "लोकांच्या मनात तुमच्याबद्दल रोष आहे" हा आपत्कालीन स्थितीतला प्रश्न आहे का?* आपत्कालीन स्थिती प्रशासनाने हाताळायची आहे, त्यासाठी नियंत्रण कक्ष असतो. तिथे काय स्थिती आहे, हे एकाही चॅनेलने दाखवली नाही. एखाद्या माणसाला शोधायचे आणि त्याला ठोकून काढायचे, *हे धंदे बंद करा. गांभीर्य ओळखा*.
*मंत्री आजपर्यंत खासगीत तुम्हाला शिव्या घालत होते, आज जाहीर घालू लागलेत.*
खांडेकर म्हणाले "देवा, या देशाला नेत्यांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येणार आहे." लोक म्हणतात, "देवा, या देशाला पत्रकारांपासून वाचव असे म्हणण्याची वेळ येऊन गेली आहे"
आणि *हा प्रसंग तुम्ही तुमच्या कर्माने स्वतःवर आणला आहे*, हे वेळीच लक्षात घ्या, नाहीतर *जी काही छाटकभर इज्जत आणि विश्वासार्हता शिल्लक राहिली आहे तीपण गमावून बसाल*.
-----------------------------------------

अर्थात फॉरवर्डेड... 

-----------------------------------------
● मुंबईतील मंत्रालय पत्रकारांच्या "रायटिंग जर्नालिस्ट्स" या ग्रुपवर आलेली ही पोस्ट.....