पुण्यात लोकमत - सकाळमध्ये चांगलेच युध्द पेटले आहे.लोकमतने आपल्या अंकात वृत्तपत्र विक्रेत्यांनी लोकमतचा सत्कार केल्याचे वृत्त प्रसिध्द करताच,सकाळने लोकमतची चांगलीच पोल खोलली आहे...
पुणे
- खप वाढविण्यासाठी कट-क्लृप्त्या, आमिषे आदी सवंग मार्गांचा वापर
करणाऱ्या ‘लोकमत’चा फेकाफेकीमध्ये राज्यात कुणीही हात धरू शकत नाही, हे
वारंवार सिद्ध होत आहे. सर्व विधिनिषेध गुंडाळून ठेवून स्वत:चीच पाठ
बडवल्यानंतर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या खोट्या
प्रतिक्रियाही त्यांनी छापल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या तोंडी चुकीची
वाक्ये घालण्यात आली, असे संबंधितांनी स्पष्ट केल्याने ‘लोकमत’ची बनवेगिरी
पुन्हा उघड झाली आहे.
फुटकळ
सर्वेक्षणाचा डांगोरा पिटणाऱ्या या वृत्तपत्राने पहिल्यापासून दिशाभूल
करण्याचे काम केले. आपल्या जाहिरातीतील आकडे नेमके कशाचे आहेत, हेदेखील
त्याला तेथे स्पष्टपणे सांगता आले नाही. तसेच ‘नंबर वन’ची शहरभर
फ्लेक्सबाजी करूनही पुण्यातील आणि पुणेकरांच्या मनातील ‘सकाळ’च्या
अढळस्थानाला आपण साधा ओरखडाही लावू शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर आणि
असल्या सर्वेक्षणाला पुणेकर भीक घालत नसल्याचे कळल्यावर ‘लोकमत’ने
कटकारस्थानांचे आणखी एक पाऊल टाकले. वृत्तपत्र विक्रेता संघटनेला गळ
घालण्याचा प्रयत्न केला. संघटनेचे अध्यक्ष विजय पारगे यांच्या तोंडून आपला
गुणगौरव करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे वृत्तपत्र ‘नंबर गेम’साठी
कोणत्याही थराला जाऊ शकते हे स्पष्ट झाले.
विजय
पारगे म्हणाले, ‘‘आमची संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून पुणेकरांपर्यंत
वृत्तपत्रे पोचण्याचे काम करते. त्यामुळे कोणाची किती ताकद आहे याची
आम्हाला चांगली माहिती आहे. म्हणून पुण्यात पहिल्यापासून ‘सकाळ’ हेच
पहिल्या क्रमांकाचे वृत्तपत्र आहे हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. त्यासाठी
असल्या सर्व्हेचा आधार घेण्याची काही गरज नाही आणि वृत्तपत्रांचा खप
ठरवणारी ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन’ (एबीसी) हीच एकमेव संस्था आहे
याचीही आम्हाला माहिती आहे. पुण्यामध्ये वृत्तपत्रांच्या खपात ६० ते ६५
टक्के वाटा एकट्या ‘सकाळ’चा आहे आणि उर्वरित ३५ ते ४० टक्क्यांत इतर सारी
वृत्तपत्रे येतात.’’
‘सकाळ’च्या
जाहिरातीत ‘नंबर वन’ला पगडी घातली म्हणून ‘लोकमत’चा पोटशूळ उठला आहे कारण
त्यांच्या जाहिरातीत ‘नंबर वन’च्या सावलीला बसलेल्या व्यक्तीला पगडी घातली
आहे. पगडी कुणाला घालायची हे अस्सल पुणेकरांकडून त्यांनी शिकावे. राज्यभर
टोप्या घालण्याचे उद्योग केल्यानंतर पुण्यात ‘पगडीचे सोंग’ आणून जनतेची
दिशाभूल करण्याचा प्रयत्न येथील जनता खपवून घेत नाही, हे गेल्या १८
वर्षांतही न समजल्याने त्यांचे वाममार्गांचे प्रयोग सुरूच राहणार असल्याचे
आता साऱ्यांना माहिती झाले आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रतिक्रिया
‘पुण्याचा ध्यास, श्वास आणि मानसन्मान सकाळ’
पुण्याचा
ध्यास, श्वास आणि मानसन्मान म्हणजे सकाळ. घरातल्या छोट्यांपासून
ज्येष्ठांपर्यंत आणि विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या सर्वांचे आवडते दैनिक
म्हणजे सकाळ. दर्जेदार पुरवण्या व असंख्य उपक्रमांचा खजिना वाचकांपर्यंत
पोचविणारे एकमेव दैनिक म्हणजे सकाळ. यामुळेच ‘एबीसी’ व इंडियन रीडरशिप
सर्व्हेमध्ये सकाळने नं. १ चा किताब पटकविला आहे. कमी किंमत व भेट वस्तूंची
आमिषे दाखविणारे किती तरी दैनिके आली तरी सकाळने आपला नं. १ कायम ठेवला
आहे आणि राहील.
- दत्तात्रय पिसे, वरिष्ठ उपाध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ
पुणे
म्हणजे ‘सकाळ’ हे समीकरणच आहे व भविष्यातही राहील. गेली ८० वर्षे सकाळने
पुणेकरांच्या मनावर राज्य केले आहे व इथून पुढेही ‘सकाळ’ सदैव आघाडीवर
राहील.
- अनंता भिकुले, कार्याध्यक्ष
आज
ही पुणे शहरातील कोणत्याही विक्रेत्यांकडे त्याच्या व्यवसायात सकाळचा अंक
किती आहे याला खूप महत्त्व आहे. विक्रेत्या बांधवच्या उत्पन्नात सर्वाधिक
वाटा ‘सकाळ’चा आहे. त्यावरून ‘सकाळ’ नंबर वन आहे. हे वेगळे सांगण्याची गरज
नाही. सकाळ हा नंबर १ आहे आणि भविष्यातही राहणार यात काही शंका नाही.
- अरुण निवंगुणे, सचिव
जनसामान्यांशी
नाळ असलेले एकमेव वृत्तपत्र असल्याने ‘सकाळ’ कायमच पुण्यात आघाडीवर आहे
आणि राहील. इथूनपुढे वाचकांची पहिली पसंती सकाळच राहील.
- राम दहाड, सहसचिव
‘सकाळ’
गेली ८० वर्षे पुणेकरांच्या हृदयात बसला आहे. पुण्यात बाहेरून आलेले
नागरिकही प्रथम ‘सकाळ’चीच मागणी करतात. हा माझा गेली कित्येक वर्षांचा
अनुभव आहे. त्यामुळे ‘सकाळ’ला कधीच कोणत्या स्कीमची गरज लागली नाही.
- प्रमोद परुळेकर, माजी अध्यक्ष
पुणे
शहरात वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या माध्यमातून काम करताना विविध
प्रसंगात सकाळचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याचे अनुभवले. सकाळचे स्थान
अबाधित आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही तज्ज्ञांची गरज नाही.
- रमेश बोराटे, माजी अध्यक्ष
पुण्यामध्ये अजूनपर्यंत सकाळला पर्याय नाही व भविष्यातही पर्याय निर्माण होऊच शकत नाही.
- वैजनाथ कानडे, माजी उपाध्यक्ष
कोणत्याही
शहराचा एक चेहरा असतो. पुण्याचा चेहरा हा ‘सकाळ’ आहे हे सांगण्यासाठी
कोणत्याही आकडेवारीची गरज नाही. ‘सकाळ’ला धक्का पोचवण्याचे स्वप्न अनेक
वृत्तपत्रांनी पाहिले; पण ते स्वप्नच राहिले आहे.
- संजय भोसले, खजिनदार
वृत्तपत्र
व्यवसाय करताना विविध वाचकांशी संवाद साधता येतो. वाचकांचे सकाळवर असलेले
प्रेम सर्वाधिक आम्हाला पाहता येते. इतर कोणत्याही दैनिकाबद्दल एवढी निष्ठा
वाचकांमध्ये दिसत नाही. सकाळ कायम पुण्यासाठी नंबर वन दैनिक आहे, याबद्दल
तिळमात्र शंका नाही.
- सुनील बरके, उपाध्यक्ष
सकाळ
पेपर वाचल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. वाचक वर्षानुवर्षे सकाळ वाचत
असल्यामुळे त्यांना स्कीमचा पेपर दिला तरी ते आमच्याकडे सकाळ पेपरचीच मागणी
करतात. माझ्या आणि इतर विक्रेत्यांच्या मराठी पेपरच्या तुलनेत सकाळचा शेअर
६० टक्के आहे व इतर मराठी दैनिक मिळून ४० टक्के आहेत आणि राहणार. म्हणून
सकाळच आमच्यासाठी नंबर १ आहे.
- सचिन मुंगारे, उपाध्यक्ष
पुणे
व पिंपरी-चिंचवडमधील असंख्य वाचकांच्या मनात उतरलेले दैनिक म्हणजे सकाळ
होय. आणि याची जाणीव आम्हाला वाचकांकडून वेळोवेळी होते. समाजातील
तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोचलेले आणि त्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले
दैनिक म्हणजे ‘सकाळ’.शहरात नवीन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पसंती सकाळच
असते.
- प्रवीण माने, उपाध्यक्ष
आमच्या
हडपसर भागात ग्राहकांची पहिली मागणी सकाळच असते व बाहेरगावांहून आलेल्या
ग्राहकांनी पुण्यात चांगला पेपर कोणता विचारले असता, आम्हीही ‘सकाळ’चेच नाव
सांगतो. पुणे म्हणजेच सकाळ.
- दिनकर कापरे, उपाध्यक्ष
गेली
२५ वर्षे वृत्तपत्र विक्री व्यवसायात आहे. तेव्हापासून आजतागायत सकाळच नं.
१ आहे आणि तो राहणार हे निर्विवाद सत्य आहे. सत्य मांडणी, शुद्ध लेखणी व
संस्कारक्षम ‘सकाळ’ने वेळोवेळी जनतेचे हित जोपासले आहे म्हणूनच सकाळ नं. १
आहे.
- वसंत घोटकुले, संघटक
‘सकाळ’
पुण्याचा आत्मा आहे. दिवसाची सुरवात ‘सकाळ’नेच होते. ‘सकाळ’ची लेखणी बातमी
नेहमीच दर्जेदार असते. ८५ वर्षांची परंपरा लाभलेला आणि समाजाशी नाळ जोडलेला
‘सकाळ’ ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपले एक नंबरचे स्थान टिकवून आहे.
- राजकुमार ढमाले, सल्लागार
नवनवीन
विचार, कल्पना मांडणारे ‘सकाळ’ हे पुण्यातले एकमेव वर्तमानपत्र.
पुण्याच्या संस्कृतीशी नाळ जोडलेली असल्याने ‘सकाळ’ कायमच आघाडीवर आहे आणि
राहील. संस्कारक्षम लेखनशैली हे सकाळचे वैशिष्ट्य आहे.
- आनंद निबांळकर, विभागप्रमुख, कॅम्प विभाग
‘सकाळ’
म्हणजे पुण्याचा श्वास आहे. सकाळी उठल्यावर चहाबरोबर ‘सकाळ’च हवाय.
‘सकाळ’चे उपक्रम मग ते नैसर्गिक आपत्तीतील मदत असो, की बस डे, तनिष्का
गट... हे सर्व कौतुकास्पद आहे. पुणे वृत्तपत्र विक्रेत्या संघाच्या सर्व
विक्रेत्यांचा अपघाती विमा उतरवणारे सकाळ हे एकमेव दैनिक आहे.
- चैतन्य गणपुले, विभागप्रमुख, अप्पा बळवंत चौक
सकाळ
म्हणजे परिवारातील कर्त्या व्यक्तीप्रमाणे आहे. सर्व स्तरातील बातम्या
निर्भीडपणे मांडणारे व्यासपीठ म्हणजे ‘सकाळ’. पेपर वाचल्यावरच समाधान मिळते
व ‘सकाळ’च १ नंबरचे दैनिक आहे, यात तिळमात्र शंका नाही.
- जितेंद्र मोरे, विभागप्रमुख, बोपोडी विभाग
पुण्यात
‘सकाळ’ कायमच निर्विवादपणे १ नंबर आहे. इतर दैनिकांच्या स्कीम सकाळच्या
वाचकांना सांगितल्या तरी ते सकाळचीच मागणी करतात हा माझा कित्येक वर्षांचा
अनुभव आहे.
- संतोष लोहार, विभागप्रमुख, चंदननगर
सकाळ कायमच पुण्यात आघाडीचे दैनिक राहिले आहे. आजही एकूण मराठी पेपरच्या संख्येत ६० टक्के वाटा हा ‘सकाळ’चाच आहे.
- वेगनाथ काळे, विभागप्रमुख, हडपसर विभाग
वृत्तपत्र
व्यवसायात आमची चौथी पिढी कार्यरत आहे. सुरवातीपासून आमच्या व्यवसायत
‘सकाळ’चे योगदान इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत खूप आहे. माझ्याकडे एकूण
मराठी वर्तमानपत्रांच्या संख्येत ‘सकाळ’च ६५ टक्के आहे. आणि उर्वरित
वर्तमानपत्रे ३५ टक्के आहेत. वाचकांचा ‘सकाळ’कडे आलेला कल पाहता,
‘सकाळ’च्या जवळपास कोणते दैनिक पोचेल असे वाटत नाही.
- यतिन चौधरी, विभागप्रमुख, वारजे विभाग