कायदा,पेन्शनसाठी फेब्रुवारीत मुंबईत महोमार्चाचे आयोजन

नांदेड - पत्रकार संरक्षण कायदा,आणि पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने फेब्रुवारीत मुंबईत महामोर्चा काढण्यात येत असून या मोर्चात राज्यातील पाच हजारांवर पत्रकार सहभागी होणार आहे.या मोर्चात सर्वशक्तीनिशी सहभागी होण्याचा निर्धार मराठी पत्रकार परिषदेच्या काल नांदेड येथे झालेल्या बैठकीत व्यक्त कऱण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख होते.तत्पुर्वी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्षांचा मेळावा 25 डिसेंबर रोजी नांदेड येथे होत असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्यांवर यावेळी प्रकाश टाकला जाणार आहे.मेळाव्याचे उद्दघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.कालच्या बैठकीस राज्याच्या 32 जिल्हयातून 70 वर प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील 350 तालुका पत्रकार संघ परिषदेशी जोडलेले आहेत.ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या समस्य उग्रपणे समोर येत असून हल्ले,खोटे गुन्हे,तसेच अन्य प्रश्‍न ग्रामीण पत्रकारांना भेडसावत आहेत.या प्रश्‍नांवर चर्चा करून या प्रश्‍नांना सामोरे कसे जायचे यावर निर्णय घेतला जाणार आहे.या मेळाव्यासाठी मुख्यमंत्र्यांन निमंत्रित करण्यात येणार आहे.राज्याभरातून एक हजारांवर प्रतिनिधी मेळाव्यास उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.
 25 डिसेंबरच्या मेळाव्याच्या निमित्तानं 23 तारखेला पत्रकार एकता रॅली काढण्यात येणार आहे.पुणे येथून ही रॅली निघेल.नगर,औरंगाबाद,जालना,परभणी मार्गे ही रॅली 24 ला संध्याकाळी नांदेडला पोहोचेल.या रॅलीत दोनशेवर पत्रकार सहभागी होणार आहेत.परिषदेच्या बैठकीस प्रत्येक विभागात एक मेळावा घेऊन कानून पे चर्चा म्हणजे पत्रकारांसाठीच्या कायद्याची माहिती पत्रकारांना देण्यात येणार आहे.
पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शन योजना सुरू करण्यात सरकारकडून होत असेलेली टाळाटाळ यावर बैठकीत सर्वच सदस्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.या विरोधात मुंबईत फेब्रुवारी 2017 मध्ये पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने महामोर्चा काढण्यात येणार आहे.मोर्चात राज्यभरातून किमान पाच हजार पत्रकार सहभागी होतील अशी समितीची योजना आहे.समितीच्या या मोर्चात परिषद शक्तीनिशी सामिल होईल असा ठराव एकमुखाने घेतला गेला.
ज्येष्ठ पत्रकार या श्रेणीत ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणार नाही असा जाचक निर्णय अधिस्वीकृती समितीने केला आहे.त्याबद्दल उपस्थित सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.या विरोधात समितीच्या बैठका जेथे जेथे असतील तेथे समितीसमोर निदर्शने करण्याचा निर्णयही घेतला गेला.तसेच अधिस्वीकृती समितीची बैठक दिल्ली येथे होणार आहे.कार्यक्षेत्राबाहेर ही बैठक घेऊन सदस्यांना त्यांच्या खर्चाने दिल्लीस येण्यास भाग पाडले जात आहे.त्याबद्दलही उपस्थितांनी नाराजी व्यक्त करून परिषदेच्या सदस्यांनी या दिल्ली बैठकीवर बहिष्कार टाकावा असा निर्णयही बैठकीत घेतला गेला आहे.महासंचालकांनी यासंदर्भात लक्ष घालून दिल्लीत होणारी बैठक रद्द करून ती महाराष्ट्रातच घ्यावी अशी मागणीही यावेळी केली गेली.
मराठी पत्रकार परिषदेचं मुख्यालय मुंबईत असले तरी परिषदेची मुंबईत शाखा नाही.त्यामुळे मुंबई शाखा तातडीने सुरू कऱण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.3 डिसेंबर हा परिषदेचा स्थापन दिवस आहे.या दिवशी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरं घेतली जाणार आहेत.तसेच परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा 3 डिसेंबर रोजी नागपूर येथे घेण्याचा निर्णयही बैठकीत घेतला गेला आहे.
6 जानेवारीला ओरोस येथे बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकाचा भूमीपूजन सोहळा होत असून या सोहळ्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी उपस्थित राहावे असे बैठकीत नक्की करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि परिषदेच्या पाठपुराव्यामुळे ओरोस येथे बाळशास्त्री जांभेकरांचे स्मारक होत आहे.त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अभिनंदनाचा ठरावही बैठकीत करण्यात आला.तसेच ऑनलाईन निवडणूक घेऊन राज्यात वेगळा प्रयत्न करणार्‍या शिरूर तालुका पत्रकार संघाचेही अभिनंदन बैठकीत केले गेले.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आयोजित 2 ऑक्टोबरच्या निर्धार मेळाव्याना राज्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या संघटना तसेच पत्रकारांनी सहकार्य केले त्यांच्या आभाराचा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.
बैठकीस एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी,माधव अंभोरे,विभागीय सचिव विजय जोशी,हेमंत डोर्लीकर,राजेंद्र काळे,शरद पाबळे आणि 22 जिल्हयांचे अध्यक्ष तसेच अन्य जिल्हयातील परिषद प्रतिनिधी उपस्थित उपस्थित होते.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले,नांदेडचे परिषद प्रतिनिधी प्रदीप नागापूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.बैठकीनंतर नांदेड जिल्हयातील पत्रकरांची तालुका निहाय बैठक घेऊन एस.एम.देशमुख त्यांच्या समस्या समजून घेतल्या.