उन्मेष गुजराथी यांच्यावर भ्याड हल्ला


ज्येष्ठ पत्रकार व दैनिक 'कर्नाळा'चे संपादक उन्मेष गुजराथी यांच्यावर बुधवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी पनवेल येथील खांदा कॉलनीच्या सिग्नलजवळ अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केला. गुजराथी यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. 
गुजराथी हे रात्री १ वाजता ऑफिसचे कामकाज आटोपून घरी परतत असताना दोघांनी हा हल्ला केला. हे दोन हल्लेखोर यामा एफझेड या काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले होते. गुजराथी यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. 

असा  होता प्लॅन :
गुजराथी यांची वॅग्नर गाडी रिपेअरींगला दिली होती, त्यामुळे ते ऑफिसमधल्या आर्टिस्टच्या टू व्हीलरवरून घरी जात असत. याची पूर्वकल्पना या हल्लेखोरांना आधीपासूनच होती. त्यांच्या गाडीची नंबर प्लेट, निघण्याची वेळ, जाण्याचा मार्ग हा त्यांना पूर्ण माहित होता, हे हल्ल्यातील तपशिलावरून स्पष्ट होते. या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा ऑफिसपासूनच पाठलाग सुरु केला होता. पनवेलच्या हायवेवरून खांदा कॉलनीच्या सिग्नलजवळ त्यांच्या गाडीला दोन अज्ञात हल्लेखोरांनी गाडीला मागून धडक देवून पाडण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांच्या मागे एक डंपर भरधाव वेगाने येत होता. गुजराथी यांची गाडी पलटी करून मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने त्यांना चिरडण्याचा प्लॅन असल्याची शक्यता आहे, मात्र सावध असलेल्या गुजराथी यांनी चालकाला त्वरित सूचित करून गाडी सावरण्यास सांगितले. हा प्रयत्न उधळून लावला, अर्थात तोपर्यंत हल्लेखोर डाव्या बाजूकडील रस्त्याने गाडीची  नेमप्लेट पिशवीने झाकत पळून जाण्यात यशस्वी ठरले. 

अशी आहे पार्श्वभूमी : 

बेरक्याच्या हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्याचा हात असल्याचा संशय आहे. हा नेता जवळपास सर्वच नामांकित पत्रकार संघटनांना जाहिराती, कार्यक्रमासाठी आर्थिक साहाय्य करत असतो. दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकित छोट्या- मोठ्या पत्रकार संघटना  त्याच्याहस्ते पुरस्कार वाटतात .  किमान तीस- पस्तीस जणांहून अधिक पत्रकारांना हे पुरस्कार खिरापतीसारखे मिळतात. असे भुरटे पुरस्कार घेण्यासाठी पत्रकारही वर्षभर त्याची हाजीहाजी करण्यात धन्यता मानतात. यामुळे बहुतांशी पत्रकार संघटना या नेत्याच्या गैर कारभाराविरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत नाही. त्याच्या विरोधात गेल्यास सुपारी देऊन अट्रोसिटी, खंडणी किंवा विनयभंगासारख्या गंभीर प्रकरणात नाहक अडकवले जाते. यामुळे कोणतीही पत्रकार या नेत्याच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत नाही. अर्थात यामुळेच सर्व पत्रकार संघटना मूग गिळून गप्प आहेत.