सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर देणार शेतकऱ्यांना प्रशिक्षण

मुंबई - प्रतिकूल वातावरणावर मात करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणाऱ्या मशाव या इस्रायली शेतीपद्धतीचे प्रशिक्षण राज्यातल्या पावणेतीन लाख शेतकऱ्यांना देण्यासाठी सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी), राज्य सरकारचा कौशल्य प्रशिक्षण विभाग, इस्राईलमधील हिब्रू विद्यापीठ आणि पॅलेडियम ग्रुप यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
इस्राईलमधील शेतकरी ज्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करतात, त्या पद्धतीचे प्रशिक्षण राज्यातील शेतकऱ्यांना मिळावे व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा या कराराचा उद्देश आहे. या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्या वेळी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास प्रशिक्षण प्रधान सचिव दीपक कपूर, पॅलेडियम ग्रुपच्या प्रमुख बार्बरा स्टॅन्कव्होविका, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, डिलिव्हरिंग चेंज फोरम ऍडव्हायझरीचे संचालक बॉबी निंबाळकर आणि "एसआयएलसी'चे विश्वस्त महेंद्र पिसाळ उपस्थित होते.
या करारानुसार राज्यातील दोन लाख 80 हजार शेतकऱ्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणाचा फायदा विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना घेता येणार आहे. भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणातून तयार होणाऱ्या प्रतिनिधींची त्यांच्या त्यांच्या भागात इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तयारी करून घेतली जाणार आहे. या शेतकरी प्रतिनिधींना अभ्यास साहित्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाइन तयार करण्यात येणार आहे. याशिवाय शेतकरी कुटुंबातील 40 हजार मुले आणि कृषी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचे शेतीशी संबंधित वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून सातत्याने कार्यक्रम घेतले जाणार आहेत. शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत तंत्रज्ञानाचा उपयोग करायला हवा. परदेशांतील प्रगत शेतीची उदाहरणे आपण नेहमी देत असतो. तंत्रज्ञानाची जोड देऊनच शेती विकसित करता येईल, त्यासाठीच 'एसआयएलसी'सोबत शेतकरी प्रशिक्षणाचा उपक्रम राबविला जाणार आहे.
- संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्यविकास मंत्री
इस्राईलसारख्या देशात प्रतिकूल वातावरणात तेथील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगाची बाजारपेठ काबीज केली आहे. त्यांच्याप्रमाणेच जगभरात विकसित असलेले तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांची सांगड घालून नफ्याची शेती करणे आवश्‍यक आहे. "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'ने असे अभ्यासक्रम तयार केले आहेत.
- डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका, सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर
हवामान, बी- बियाणे, खते, माती परीक्षण आदींचे सल्ले; तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पिकांची काळजी कशी घ्यावी, पाण्याचे नियोजन कसे करावे याबाबतचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच होईल.
- बार्बरा स्टॅन्कव्होविका, प्रमुख, पॅलेडियम ग्रुप
सामंजस्य करारात काय आहे?
- इस्राईलच्या शेतीच्या धर्तीवर दोन लाख 80 हजार शेतकऱ्यांचे तीन दिवसांचे प्रशिक्षण, विदर्भ- मराठवाड्याला प्राधान्य
- प्रशिक्षण कार्यक्रम स्थानिक विभाग आणि पीकपद्धतीनुसार
- प्रशिक्षित शेतकऱ्यांना अभ्यास साहित्य देऊन त्यांनी गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे अपेक्षित
- चाळीस हजार कृषी विद्यार्थ्यांचे दोन महिन्यांचे वैयक्तिक प्रशिक्षण आणि एक महिन्याची इंटर्नशिप