काळाची गरज ओळखून औरंगाबाद न्यूज 24x7 ची सुरुवात : प्रा. प्रतिभाताई अहिरे

औरंगाबाद - संगणक क्रांतीमुळे जग जवळ आले, पण शेजारी काय घडते हे आपल्याला माहीत नसते. देश-विदेश, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी टीव्ही, वेबसाईट्समुळे सर्वांना कळतात, पण आपल्या शहरातल्या मोठ्या घटना सोडल्यानंतर बाकी गोष्टी दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रातच कळतात. त्यामुळे स्थानिकची अशी न्यूज वेबसाईट ही औरंगाबादकरांसाठी काळाची गरज होती. ती ओळखून औरंगाबाद न्यूज 24x7 सुरू झाली, ही निश्‍चितच कौतुकाची बाब आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील ताराबाई शिंदे अभ्यास केंद्राच्या संचालिका प्रा. प्रतिभाताई अहिरे यांनी या नव्या उपक्रमाचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या.
प्रतिभाताईंच्या हस्ते www.aurangabadnews24x7.com वेबसाईट आणि अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. शुक्रवारी, दि. 24 फेबु्रवारीला सकाळी महाशिवरात्रीचे निमित्त साधून हा सोहळा सिडको एन 4 स्थित औरंगाबाद न्यूजच्या कार्यालयात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री. भालचंद्र पिंपळवाडकर, उद्योजक लक्ष्मीरमण वाडकर उपस्थित होते. विश्‍वबातमीचे व्यवस्थापक श्याम ढगे, औरंगाबाद न्यूजचे स्थानिक प्रतिनिधी अमोल देवकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी प्रतिभाताई म्हणाल्या, की डिजीटल इंडियाच्या प्रवाहात सामील होऊन औरंगाबाद न्यूजच्या टीमने स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. औरंगाबाद न्यूजमुळे ताज्या बातम्या लगेचच मिळत असल्याने दुसर्‍या दिवशी वाट पाहण्याची गरज राहणार नाही. भविष्यात सर्वच गोष्टी ऑनलाइन शक्य होणार आहेत, औरंगाबाद न्यूजने योग्य वेळ साधली असे म्हणावे लागेल, असे त्या म्हणाल्या. भालचंद्र पिंपळवाडकर यांनीही वेबसाईटला शुभेच्छा देताना, औरंगाबादकरांचा या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळेल, असे सांगितले. लक्ष्मीरमण वाडकर यांनीही सर्वोतोपरी औरंगाबाद न्यूजला सहकार्य करण्याचे आश्‍वासन देत ही वेबसाईट औरंगाबादकरांच्या कौतुकास पात्र ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. औरंगाबाद न्यूज 24x7 ही वेबसाईट डेस्कटॉप आणि स्मार्टफोन या दोन्हींसाठी उपलब्ध असून, स्मार्टफोनवर गुगल प्ले स्टोअरमध्ये अ‍ॅपही उपलब्ध असेल. सर्व प्रकारच्या स्थानिक ताज्या बातम्या काही मिनिटांत वेबसाईटवर वाचायला मिळतील. औरंगाबाद न्यूजच्या व्टिटर, फेसबुक अकाऊंट आणि पेजला सध्या नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या वेळी देवकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला विश्‍वबातमी आणि औरंगाबाद न्यूज परिवारातील सर्व सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.